डोन्ट बिलीव एव्रिथिंग यू थिंक – जोसेफ नूयेन l Don’t Believe Everything you think – Joseph Nguyen l Self-help book review

पुस्तक डोन्ट बिलीव एव्रिथिंग यू थिंकलेखक जोसेफ नूयेन
प्रकाशन मंजुळ पब्लिकेशन समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या १६८ मूल्यांकन ५ / ५

मला एक गोष्ट सतत विचार करायला भाग पाडते की मला नेमकं दमायला का होतंय? शारीरिक कष्ट तर थकवतातच पण मन का शांत नाहीये? आपण म्हणतो ना की स्वतःला इतकं थकवा, इतकं काम करा की रात्री आपोआपच झोप लागेल, आणि या गोष्टीवर आपण सर्वच विश्वास ठेवतो. पण खूप थकूनही झोप येत नाही तेव्हा विचार येतो की नेमकं काय होतंय आपल्याला? म्हणजे डोंगर उखरून शेवटी उंदीरच भेटत असेल तर मग निश्चिंत राहणार कसं? मग सुरू होतं एक चक्र! विचारांचं घातक चक्र, जे तुमची मानसिक शांतता पूर्णतः हिरावून घेतं. तुम्ही कितीही सुखी असला तरीही तुमचे विचार तुम्हाला त्या त्या क्षणात आनंदी राहू देत नाही, आणि बाहेरील गोष्टी नाही तर तुमचे विचारच तुमच्या दुखा:चं कारण बनतं. हीच गोष्ट मला शिकायला भेटले जोसेफ नूयेन यांच्या डोन्ट बिलीव एव्रिथिंग यू थिंक या इंग्रजी पुस्तकातून.

खरं सांगायचं तर आपण सध्या ज्या जगात जगत आहोत ते स्पर्धायुग आहे, इथे सतत कोण जिंकेल याची धाकधूक असते आणि सतत भिती असते आणि यामुळे आपण अतिविचार करतो. हेच विचार तुमच्या दुखा:चं कारण बनतात, आणि तुमचं आयुष्य नरकासमान बनवतात. तर आपण या गोष्टीतून बाहेर पडू शकतो का? तर हो, नक्कीच. मी याला स्वीकृती देत आहे कारण या पुस्तकात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही अतिविचार न करता आवश्यक त्या गोष्टीवरच लक्ष केंद्रित करता.

तर आता आपण जाणून घेऊयात या पुस्तकाच्या आशयाबद्दल आणि मुख्य विषयाबद्दल:-

या पुस्तकात तुम्हाला प्रामुख्याने हे सांगितलं आहे की तुमच्या दुखा:चं कारण ही बाह्य परिस्थिति नसून तुमचे आंतरिक विचार आहेत. तुम्ही एखाद्या गोष्टीचा एवढा विचार करता की होणारी गोष्ट ही व्यवस्थित होत नाही. लेखक आपल्याला या पुस्तकात हेच सांगतात की अतिविचार करण्यापेक्षा मुख्य समस्या आणि त्याच्या समाधनावर लक्ष द्या. तुमचे विचारांचे चक्रच तुम्हाला सतत त्रास देत असते, त्यामुळे तुम्हाला ही या गोष्टीची जाणीव व्हायला हवी की तुमचे विचारच तुमच्या दुखा:चं कारण आहे.

आता आपण जाणून घेऊयात या पुस्तकाची वैशिष्ट्ये:-

पुस्तकाची भाषाशैली: जेव्हा केव्हा मी इंग्रजी पुस्तक वाचायला घेतलं असेल तेव्हा एक विचार मनात नक्की यायचा की मी हे पुस्तक पूर्णपणे वाचू शकेल का नाही? कारण पुस्तकाची भाषा अवघड असेल, तर ते पुस्तक पूर्ण वाचण्यात आणि त्याचा अर्थ समजण्यात अडचणी निर्माण होतात. पण या पुस्तकाचं तसं नाहीये, लेखकाने अतिशय सोपी भाषा वापरली आहे, आपल्या मेंदूबद्दल, विचार करण्याच्या पद्धतीबद्दल लेखकाने खूप सोप्या भाषेत सांगितलं आहे. एक दोन बैठकीत हे पुस्तक संपेल इतके हे पुस्तक वाचायला आणि समजायला सोपे आहे.

मुद्देसूद लेखन:- बरेच लेखक काय करतात की मुद्दे सोडून बोलतात, ज्यामुळे पुस्तकाचा मुख्य आशय बाजूला राहून पुस्तक वाचायचा कंटाळा येतो. या पुस्तकाचं हे एक वैशिष्ट्य आहे की लेखकाने मुद्देसूद लेखन केलेले आहे. कोणत्याही गोष्टीला पाल्हाळ न लावता लेखन केल्यामुळे लेखन रटाळवाणे वाटत नाही, आणि मुख्य मुद्दा वाचकाला सहज समजतो.

कमी पाने पण अर्थ मोठा:- या पुस्तकाचं जसं एक वैशिष्ट्य आहे की लेखकाने मुद्देसूद लेखन केलेले आहे, त्याच प्रमाणे लेखकाने जास्त पाने लिहिण्यापेक्षा कमी पानात आपल्याला खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला कमी वेळात जर हे पुस्तक वाचायचं असेल तरी तुम्हाला ते सोपं जातं.

उदाहरणे:- लेखकाने यात एक गोष्ट आवर्जून केली आहे की वाचकांना गोष्टी समजाव्या म्हणून उदाहरणे दिलेली आहेत. सर्व महत्वाच्या गोष्टी उदाहरणाने समजावल्या आहेत, जेणेकरून वाचक लेखकाने शिकवलेल्या नवीन गोष्टी सहजरीत्या समजून घेऊ शकतो. याशिवाय लेखक तुम्हाला काही गोष्टी स्वतः करायला लावतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या समस्या ही समजतात आणि त्यावर लेखकाने दिलेले उपायही तुम्हाला कळतात.

सोपे उपाय:- या पुस्तकाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला यात जे काही उपाय सांगितले आहेत ते अतिशय सोपे आहेत. अवघड मार्गाऐवजी सोपे उपाय सांगितले आहेत, त्यामुळे सततचे अतिविचार जे तुमचं जीवन हैराण करतात त्यातून सुटका करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

आता आपण जाणून घेऊयात की या पुस्तकातुन कोणत्या ३ मुख्य गोष्टी शिकायला मिळतात

१) येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विचार करायची गरज नसते, तसेच त्यावर विश्वास ठेवण्याची ही गरज नसते:- बहुतांश लोकं काय करतात की येणाऱ्या प्रत्येक विचाराला खरं मानतात, ज्यामुळे त्यांच्या चिंतेत आणखीन भर पडते. यामुळे आपल्याला कितीही सकारात्मक राहायचं असलं तरी आपण राहू शकत नाही. या पुस्तकातून आपल्याला हीच गोष्ट शिकायला भेटते की आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्यावर अतिविचार करायची गरज नाही कारण यामुळे ती समस्या सुटणार तर नसते यासोबतच या चिंतेमुळे तुमच्या डोक्यात येणारे विचार हे खरे असतीलच असे नाही. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक विचारावर ही विश्वास ठेवायची गरज नसते.

२) तुमच्या दुखा:चं मुळ कारण तुमचे विचार आहेत:- या पुस्तकाचा मुख्य आशयच हा आहे की घडणाऱ्या घटना या तशाही घडणारच आहेत, पण तुम्ही त्या गोष्टी कशा स्वीकारता यावर ही तुमचं दु:ख अवलंबून आहे. तुम्ही अतिविचार करून, एखाद्या गोष्टीची सतत नको एवढी चिंता करून स्वतःला आणखीन दु:खी बनवता. एकूणच तुमच्या दुखा:चं मुळ कारण हे तुमचे विचार आहेत. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा कितपत विचार करायचा आणि स्वतःला किती त्रास द्यायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे असं लेखक आपल्याला शिकवतात.

३) अतिविचार करणे म्हणजे समस्येचे समाधान शोधणे नाही:- आपल्यापैकी बहुतांश लोक काय करतात की समस्येचं समाधान शोधण्याऐवजी समस्येचा अतिविचार करतात. बहुतेक लोकांना असं वाटतं की समस्येचा अतिविचार करणं म्हणजे त्याचं समाधान शोधणे होय. आणि हाच गैरसमज दूर करण्याचं काम हे पुस्तक करतं की तुम्ही कितीही अतिविचार किंवा चिंता केली तरीही समस्येचं समाधान शोधण्यासाठी प्रयत्न करणे यातच खरा अर्थ आहे.

या आणि अशा अनेक गोष्टी तुम्हाला या पुस्तकातून शिकायला भेटतात.

तर हे पुस्तक कोणी वाचावं?

एक माणूस म्हणून मेंदूला सतत विचार करायला हा मानवधर्मच बनला आहे. पण आपण सतत चिंता आणि अतिविचार करून आपली मानसिक शक्ति वाया घालवतो. त्यामुळे जो कोणी सतत अतिविचार करतो, गरजेपेक्षा एखाद्या गोष्टीची जास्त चिंता करतो आणि यामुळे जो त्रस्त आहे अशा प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे. हे पुस्तक नववाचक बिनदिक्कतपणे वाचू शकतो इतक्या सोप्या भाषेत लिहिले आहे आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या अतिविचार करण्याच्या समस्येवर समाधान शोधण्यासाठी मदत करेल.

तुम्हाला जर हे पुस्तक विकत घ्यायचे असेल तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून ते विकत घेऊ शकता.

धन्यवाद!

Leave a Comment