तुपाचा नंदादीप- ग. दि. माडगूळकर l Tupacha Nadadeep – G. D. Madgulkar l Marathi Kathasangrah review

पुस्तक तुपाचा नंदादीपलेखक ग. दि. माडगूळकर
प्रकाशन साकेत प्रकाशनसमीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या १६८ मूल्यांकन ५ / ५

“स्वये श्री राम प्रभू ऐकती l कुश लव रामायण गाती ll”

गीत रामायणामधली ही एकच ओळ म्हटली तरीही डोळ्यापुढे अखंड रामायण उभं राहतं. साक्षात श्रीराम प्रभू यांचे दोन्ही पुत्र हे रामायण गात आहेत आणि आपण त्या दरबारात आहोत असा भास होतो. मनाला शांत आणि प्रसन्न करणारं हे गीत रामायण रचून ग. दि. मा. यांनी इतिहासच रचला, म्हणूनच त्यांना मराठीतील वाल्मिकी ही म्हणतात. एवढं मोठं रामायण, गीताच्या स्वरूपात रचणं काही सोप्पं नाही. अशा या मराठीतील वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव करण्यात आला, अशा ग. दि. मांच्या कथासंग्रहाबद्दल म्हणजेच “तुपाचा नंदादीप” याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण लेखकाबद्दल ही जाणून घेऊयात.

ग. दि. मा. यांचं संपूर्ण नाव गजानन दिगंबर माडगूळकर आहे. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. ग. दि. मा. यांनी साहित्य आणि चित्रपट या क्षेत्रात खूप मोठं योगदान दिलं आहे. ते एक गीतकार, लेखक होते. त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रामुख्याने कथासंग्रह, कादंबरी, नाटके, कवितासंग्रह, कादंबरी या प्रकारचं लेखन केलेलं आहे. त्यांनी एकूण १५७ पटकथा आणि २००० गाणी लिहिली आहेत. “बुगडी माझी सांडली गं” हे त्यांचं सुप्रसिद्ध गाणं आहे. ग. दि. मा. प्रामुख्याने ओळखले जातात ते त्यांनी रचलेल्या गीत रामायणामुळे. गीत रामायण कितीही ऐकलं तरी त्यातला गोडवा काही कमी होत नाही, आणि त्यांच्या या रचनेमुळे त्यांना “आधुनिक वाल्मिकी” ही म्हटले जाते. त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार, या सोबतच संगीत नाटक अकादमी हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवीत केले आहे. “बांधावरच्या बाभळी, वाटेवरच्या सावल्या” या सारखे सुप्रसिद्ध कथासंग्रह, “गीतसौभद्र” सारखी काव्यरचना “आकाशाची फळे” या सारखी कादंबरी, लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असणारं “नाच रे मोरा” हे बालगीत, आणि बाल साहित्ये ही त्यांनी लिहिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ही त्यांचं मोलाचं योगदान आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या ग. दि. मा. यांनी “तुपाचा नंदादीप” कथासंग्रह लिहिला, जो वाचकांच्या मनात विशेष जागा मिळवतो. तर आता आपण या कथासंग्रहाबद्दल जाणून घेऊयात.

“तुपाचा नंदादीप” असं समर्पक नाव त्यांनी या कथासंग्रहाला दिलं आहे. नंदादीप अष्टोप्रहर जळत असतो किंवा तेवत असतो, देव्हाऱ्यात प्रसन्नता आणि उजेड देतो. स्वतः जळतो, मात्र इतरांच्या आयुष्यात उजेड आणतो. जसा हा नंदादीप इतरांना उजेड देण्यासाठी सतत तेवत असतो, तशीच काही माणसं ही कायम इतरांच्या सुखासाठी त्याग करतात, खस्ता खातात आणि या नंदादीपा प्रमाणे अखंड तेवत राहतात. आणि ज्यांनी ज्यांनी इतरांचं आयुष्य सुखी करण्यासाठी त्याग केलेला आहे, अशा माणसांच्या कथा आपल्याला या कथासंग्रहात वाचायला मिळतात. या कथासंग्रहात एकूण १२ कथा आहेत, आणि प्रत्येक कथा ही आपल्याला काही ना काही शिकवून नक्कीच जाते. ऋणानुबंध या कथेने तर परोपकार करायला शिकवले, निर्वाण या कथेने तर समाजातील विषमतेवर घाला घालून शेवटच्या क्षणी आपण केवळ माणूस असतो हे शिकवलं, आणि मोती ही कथा वाचताना तर ग. दि. मां. नी त्याग शिकवण्यासाठीचा शिखरच गाठला. वसूली या कथेमधून माणसाच्या स्वार्थी वृत्तीचे तर अगदी जवळून दर्शन घडले, आणि तुपाचा नंदादीप या कथेने तर माझी वाचाच बसवली. प्रत्येक कथा तुम्हाला काही ना काही शिकवून जाते, हे मात्र खरे. त्याग आणि समर्पण हे या कथासंग्रहाचे मुख्य विषय आहेत, तरीही वेदना, आनंद, बेचैनी, भिती, दु:ख अशा विविध भावना या कथांमधून व्यक्त होतात. या कथांमधून ग. दि. मा. यांनी जीवनातील आलेले अनुभव, जीवनात आलेल्या त्या व्यक्तींचे अनुभव, यासोबतच काही प्रवासवर्णने, आणि या सगळ्यामधून व्यक्त होणाऱ्या भावना या अतिशय मार्मिकपणे वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. काही कथांमधून ग्रामीण जीवनाचे दर्शन होते, तर काही कथांमधून शहरी जीवनाची हलकीशी झलक ही पाहायला मिळते.

आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात या कथासंग्रहाची वैशिष्ट्ये:-

हा कथासंग्रह वाचताना माझ्या मनाला सर्वात जास्त एक गोष्ट भावली ती म्हणजे कथासंग्रहाच्या भाषेतील साधेपणा होय. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती आढळणार नाही, प्रत्येक गोष्टीचं वर्णन अत्यंत बारकाईने पण तितक्याच साधेपणाने केलेलं आहे. या कथा वाचताना आपण अक्षरशः यात गुंतून जातो. साध्या भाषेतून ग. दि. मा. आपल्याला अनेक नैतिक मूल्ये शिकवतात. या कथा अगदी वास्तववादी आहेत, या घटना आपल्या अवती भोवतीच घडत असतात, आणि त्यातून शिकण्यासारखं ही खूप काही असतं. अशाच गोष्टींचं वर्णन या कथासंग्रहात केलं आहे. या कथासंग्रहातून आपल्याला वास्तव जीवनातील, रोजच्या घडणाऱ्या घटनांचं, प्रसंगांचं, अनुभवांचं अतिशय उत्तम प्रकारे चित्रण केलेलं आहे. जसं की मी आत्ताच सांगितलं की या कथा आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या आहेत, त्यामुळे त्या वाचताना वाचक या कथांचा संबंध आपल्या आयुष्याशी सहज लावू शकतो. या कथा रटाळवाण्या नाहीत, अतिशय हलक्या फुलक्या आहेत.

या कथासंग्रहातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात, त्यातील प्रमुख गोष्टी पुढीलप्रमाणे:-

१) सुखाची परिभाषा: माणूस कायमच सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, बहुतांशी हे सुख तो स्वतःसाठी शोधत असतो. पण इतरांसाठी सुख शोधणाऱ्या माणसांना आपण मानतो. या कथासंग्रहातून आपल्याला सुखाची नवी परिभाषा शिकते. ज्या प्रमाणे नंदादीप उजेडासाठी अखंड तेवत राहतो, तसंच इतरांच्या सुखासाठी आपण त्याग आणि समर्पण करावे. त्याग आणि समर्पणातच सुख आहे हे आपल्याला यात शिकायला मिळते.

२) खरं सुख म्हणजे नेमकं काय? : या कथासंग्रहात वसूली नावाची एक कथा आहे, जी माणसाच्या स्वार्थी वृत्तीचं अतिशय जवळून दर्शन घडवते. इतरांना आपल्या स्वार्थापायी वेदना देऊन आपण कधीच सुखी होऊ शकत नाही, हे सुख तात्पुरतं असतं. खरं सुख निस्वार्थीपणे दुसऱ्याच्या हिताचा विचार करण्यात असतं. यामधून खरं सुख म्हणजे नेमकं काय? हे आपल्याला कळतं.

३) बदल ही काळाची गरज आहे:- आपण जेव्हा मोठे होतो, तेव्हा आपल्याला बालपण पुन्हा हवंहवंसं वाटतं. पण कितीही प्रयत्न केला तरी आपण लहान होऊ शकत नाही. जसा हा बदल आपल्याला त्रास देतो, तसेच आपल्या आयुष्यात अनेक बदल आपल्याला त्रास देतात. बदल हा कितीही गरजेचा असला तरीही प्रत्येक गोष्टीत बदल व्हायलाच हवा असा अट्टहास करणे अयोग्य आहे. काही गोष्टींत बदल न करणेच योग्य आहे. ही गोष्ट आपल्याला वेडा पारिजातक या कथेमधून शिकायला मिळते.

हा कथासंग्रह वाचताना मन शांत होतं, ग्रामीण जीवनाचं वर्णन वाचून तर आपण तिथे असायला हवं असं वाटतं. पंतांची किन्हई ही कथा वाचताना तर किन्हई गावाचं वर्णन डोळ्यासमोर उभं राहतं, आणि तुपाचा नंदादीप ही शेवटची कथा सदूची शोकांतिका सांगते, तेव्हा मात्र डोकं थोड्या क्षणासाठी सुन्न होतं. एकीकडे नंदादीपा सारखे सतत तेवत राहणारे लोक, तर एकीकडे स्वार्थाने पछाडलेली माणसं; या समिश्रणातून ही काही कथा लिहिल्या आहेत.

एकूणच, ग. दि. मां. चं लेखन याआधी तुम्ही जर वाचलं नसेल, किंवा तुम्हाला वाचनाची सुरुवात करायची असेल तर त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. साध्या-सोप्या भाषेत लिहिलेला कथासंग्रह अगदी प्रत्येकाने आवर्जून वाचवा असा आहे.

धन्यवाद!

तुम्हाला जर हे पुस्तक विकत घ्यायचे असेल, तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकता!

Leave a Comment