| पुस्तक | रावण: राजा राक्षसांचा | लेखक | शरद तांदळे |
| प्रकाशन | न्यू इरा पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | ४३२ | मूल्यांकन | ५ / ५ |
रावण हे नाव ऐकलं की आठवतं ते सीताहरण आणि रावणाला असलेली दहा तोंडं. कधी कधी प्रश्न पडतो जर हजारो वर्षापूर्वी रावणाला दहा तोंडं असतील, तर आत्ताच्या काळातील माणसाला किमान दोन किंवा तीन तोंडं असायलाच हवीत. पण जीवशास्त्राचा विचार आधुनिक दृष्टिकोनातून केला तर आपल्याला “रावणाला दहा तोंडं आहेत” या भाकड कथाच वाटतील. आपण यावर विचार केलं तर त्या कथा जुन्या काळातील आहेत, पुराणातील आहेत तथापि वैदिक काळातील आहेत. तो देवदेवतांचा काळ आहे तर त्या काळात चमत्कार होऊ शकतात, रावणाला दहा तोंडं ही असुच शकतात. पण तरीही मला हे पटेना. मग मी ठरवलं की रावणाला खरंच दहा तोंडं आहेत की या केवळ भाकड कथा आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात. त्यामुळे रावणाची माहिती मिळवण्यासाठी एकच पुस्तक प्रसिद्ध आहे, ते म्हणजे “रावण-राजा राक्षसांचा” ही शरद तांदळे यांनी लिहिलेली कादंबरी होय. या कादंबरीव्यतिरिक्त रावणाची माहिती आपल्याला गीत रामायणातून किंवा रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेतून मिळते. यामधून रावणाची एक वेगळीच प्रतिमा आपल्या मनात तयार होते, रावण क्रूर आणि अत्याचारी असल्याचं म्हटलं जातं, मानलं ही जातं. रावणाची ओळख ही उपरोक्त स्त्रोततून केवळ “सीताहरण करणारा क्रूरकर्मी राक्षस” अशी आपल्या मनात निर्माण होते. पण खरी गम्मत म्हणजे रावणाची ओळख त्याही पलीकडे आहे, हे आपणा कुणाला जास्त माहित नसतं आणि हीच गोष्ट आपल्याला या कादंबरीतून कळते. या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला रावणाच्या जन्मापासून ते अगदी त्याच्या मृत्यूपर्यंत माहिती मिळते.. रावणाचा जन्म हा संकरित आहे म्हणजे आई असुर व वडील ब्राह्मण कुळातील आहे. परंतु तरीही रावणाची ओळख “दशग्रंथी रावण” अशी आहे आणि यामुळेच आपल्याला हा प्रश्न ही पडतो की जर रावण हा दशग्रंथी ब्राह्मण असला तरी तो “राक्षसांचा राजा कसा?” या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या कादंबरीतून मिळते.
वडिलांचं कुळ हे मुलाला मिळतं, या अर्थाने रावण हा आर्यकुलीन ब्राह्मण आहे, परंतु तरीही राक्षसांचा राजा होऊन त्याने क्षत्रियत्व का स्विकारलं याचं उत्तरही तुम्हाला यात मिळतं. मला इथे तुम्हाला थोडं वर्णव्यवस्थेबद्दल सांगावं वाटतं की वैदिक काळात चार वर्ण म्हणजेच ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र असत. प्रत्येक वर्णाला ज्याची त्याची कामं नेमून दिलेली असत आणि त्याचं पालन ही अनिवार्य असतं. यानुसार रावणाने ब्राह्मण म्हणून स्वतःचा आश्रम न काढता क्षत्रियत्व स्वीकारून तो लंकाधिपती झाला तो का? वडिलांचं कुळ त्याने का नाकारलं? याची उत्तरं आपल्याला यात मिळतात. रावणाच्या जीवनाची अत:पासून इतिपर्यंतची माहिती यात आहे. ही कादंबरी वाचताना सुरुवातीचा रावण, मधल्या काळातील रावण व अंतिम काळातील रावण यातला फरक आपल्याला आपसुकच जाणवतो. रावण कितीही ज्ञानी असला तरी त्याचा अहंकार कसा वाढत गेला हे आपल्याला कादंबरी वाचताना कळतं. रावणाने अनेक स्त्रियांवर अत्याचार केले आहेत, त्यातही स्वतःच्या सावत्र सुनेवर त्याने शारीरिक अत्याचार का केले? याबद्दल जेव्हा आपण वाचतो तेव्हा मनावर कोणीतरी ओरखडल्यासारखं वाटतं. त्यानंतर रावणाने वेदवती या आर्य तरुणीवर केलेल्या अत्याचाराची माहिती ही मिळते. राज्याभिषेक, विवाह, साम्राज्य विस्तार, पुत्रप्राप्ती, मेघनादचा विवाह, इंद्र व शनी, यमाचा पराभव, शूर्पनखेच्या पतीची रावणाने त्याच्या चुकीमुळे केलेली हत्या/किंवा त्याला दिलेला दंड इथून ते सीतहरण, एवढंच नाही तर शेवटी रामायणात झालेल्या रावणाचा मृत्यू याची माहिती आपणास मिळते.
एक गोष्ट मला या कादंबरीतली आवडली ती म्हणजे की रावणाने स्त्रियांवर केलेली बळजोरी ही चुकीची आहे हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, आणि इथेच लेखकाच्या तटस्थतेची जाणीव आपल्याला होते. अशा इतरही घटना आहेत ज्यात लेखकाने तटस्थतेने लेखन केल्याचे आपणास दिसते. कादंबरीच्या सुरुवातीला रावणाच्या घराची वंशावळ दिली असल्या कारणाने त्याच्या नातलगांचा उल्लेख आल्यावर आपला गोंधळ होत नाही. लेखनाची भाषा, लेखकाची लेखनशैली, यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण थोडक्यात सांगायचं तर “रावणाबद्दलच्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं, म्हणजेच रावण राजा-राक्षसांचा ही शरद तांदळे यांची कादंबरी” रावणाने त्याच्या आयुष्यात कितीही चांगली कर्मे केली तरीही, शेवटी त्याला त्याच्या दुष्कृत्याची शिक्षा ही भेटतेच.
आता प्रश्न उरतो की “रावणाला खरंच दहा तोंडं होती का?” तर या प्रश्नाचं उत्तरं मिळवण्यासाठी ही कादंबरी नक्की वाचा!
धन्यवाद!