| पुस्तक | शिवकालीन महाराष्ट्र | लेखक | डॉ. अ. रा. कुलकर्णी |
| प्रकाशन | राजहंस प्रकाशन प्रा. लि. | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | २१० | मूल्यांकन | ५ / ५ |
छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७ व्या शतकात महाराष्ट्र राज्यात मोठे परिवर्तन घडवून आणले. विजयनगरच्या पाडावानंतर हिंदू साम्राज्य निर्माण होण्याची आशा संपली होती, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून अवघ्या मराठ्यांना (म्हणजेच मराठा मुलखात राहणारी प्रत्येक व्यक्ती) आशेचा नवीन किरण दाखवला व स्वराज्य स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर अनेक चित्रपट बनले जसे की “राजा छत्रपती” तसेच त्यांच्या आयुष्यावर रणजित देसाई यांनी लिहिलेली “श्रीमानयोगी” ही कादंबरी सुप्रसिद्ध आहे. या सगळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी कळते पण त्यासोबत त्यांची राज्यव्यवस्था कशी होती? हे जाणून घेणं ही महत्वाचं आहे. कारण स्वराज्य हे रयतेचं राज्य होतं, आणि त्यांच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य पणाला लावलं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी ज्या स्वराज्याची स्थापना केली, त्याच्या प्रशासनाची माहिती आपल्याला या पुस्तकात मिळते. या पुस्तकाचे म्हणजेच “शिवकालीन महाराष्ट्र” चे लेखक हे डॉक्टर अ. रा. कुलकर्णी आहे, ते एक प्राध्यापक तर आहेच पण इतिहास संशोधक ही आहेत. त्यामुळेच या पुस्तकाच्या सत्यतेला वैधानिकता प्राप्त होते.
आता आपण जाणून घेऊयात या पुस्तकाबद्दल
“शिवकालीन महाराष्ट्र” या पुस्तकात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्र कसा होता? तेव्हाचं सामाजिक जीवन कसं होतं? सांस्कृतिक जीवन कसं होतं? आर्थिक जीवन कसं होतं? याची विस्तृत माहिती यात मिळते. हे पुस्तक ऐकीव माहिती किंवा एक हाती संदर्भावर आधारित नाहीये. तर अ. रा. कुलकर्णी यांच्याकडे ३५ ते ४० वर्षांच्या संशोधनाचे एक फळ आहे. हे पुस्तक लिहिताना त्यांनी अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ इतिहासकार, प्राध्यापक यांचे मार्गदर्शन घेतले. देशी-विदेशी साधने, फारशी-मराठी, इंग्रजी साधनांचा ही वापर यात संशोधन करण्यासाठी केलेला आहे. त्यामुळेच या पुस्तकाला विद्यार्थी वर्गात, शिक्षक वर्गात व संशोधकांच्या जगत एक वेगळंच महत्व आहे. शिवकालीन महाराष्ट्राची जन्मकथा ते आपल्याला सांगतात, तेव्हा त्या मागचं कष्ट व चिकाटी आपल्याला कळते. यासोबतच मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी हे पुस्तक लिहिताना यांनी कोणती साधने वापरली? या सगळ्याबद्दल ते सांगतात. या पुस्तकात एकूण ७ धडे आहेत जे अनुक्रमे शिवकालीन गावगाडा, शिवकालीन शेतव्यवसाय, शिवकालखंडातील उद्योगधंदे, स्वराज्य: विस्तार व लोकसंख्या, मराठी राज्याचे उत्पन्न, महाराष्ट्र राज्य: प्रशासन खर्च, आर्थिक व्यवहार व “बहुत जनांसी आधारू” असे धडे आहेत.
शिवकालखंडात ग्रामप्रशासनाला महत्व होतं, त्यामुळेच त्या काळातील ग्रामीण जीवनाबद्दल आपल्याला विस्तृत माहिती मिळते. अलुतेदार-बलुतेदार, पाटील-कुलकर्णी, हकलजिमा, इत्यादी गोष्टींची यासोबतच करव्यवस्थेची ही माहिती मिळते. शेती हा त्या काळातील प्रमुख व्यवसाय होता त्याबद्दल ही यात माहिती दिलेली आहे. शेतीशिवाय इतरही उद्योगधंदे होते, व्यापारी मार्ग होते, या सगळ्याची माहितीही या पुस्तकात भेटते. स्वराज्याचा विस्तार कुठवर आहे? त्यामध्ये लोकसंख्या किती आहे? या मराठी दौलतीचे उत्पन्न एकूण किती आहे व ते चालवण्यासाठी एकूण खर्च किती लागतो? शिवकलखंडात आर्थिक व्यवहार कसे चालत? त्यासाठी कोणकोणते मंत्री असत? व्यवस्था कशी असत? या सगळ्याची माहिती यात मिळते. शेवटच्या धड्यात “छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे सर्वधर्मसमावेशक, सर्वांसाठी समान न्याय् व रयतेसाठी कल्याणकारी असल्याचं दिसतं” टीव्ही, चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांवरच मुख्य उजेड पाडला जातो, आणि त्यात वावगं काहीच नाही. परंतु अफझलखानाचा कोथळा बाहेर काढणे व शायिस्तेखानाची बोटं छाटणे याच्यापलिकडेही छत्रपतींनी आपल्या रायतेसाठी किती सुव्यवस्थित अशा प्रशासनाची रचना केली, स्वराज्य स्थापन करणं जितकं अवघड होतं तितकंच अवघड त्याचं प्रशासन चालवणं ही होतं. चारही बाजूंनी क्षत्रुंचे संकट असतानाही छत्रपतींनी अगदी बारीक-बारीक घटकांचा ही विचार केला हे आपल्याला यातून कळते.
आता आपण या पुस्तकाची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात:
१) संदर्भसाधनांचा वापर:- ऐतिहासिक गोष्टींबद्दल लिहिणं कठीण असतं कारण सर्वच गोष्टी पुराव्यांच्या आधारेच लिहाव्या लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचा इतिहास लिहिताना डॉक्टर अ. रा. कुलकर्णी यांनी कोणत्याही ऐकीव माहितीचा किंवा भाकड कथांचा वापर न करता मूळ इंग्रजी, फार्शी, मराठी साधने याशिवाय पत्रव्यवहार, परदेशी साधने यांचा ही वापर केलेला आहे. या सर्व साधनांची यादी ही त्यांनी दिलेली आहे, ती ही तुम्ही पाहू शकता.
२) विस्तृत व विश्लेषणात्मक माहिती:- या पुस्तकात प्रत्येक छोट्या पण महत्वाच्या घटकांची विश्लेषणात्मक व विस्तृत माहिती दिलेली आहे. गावगाड्याचाच विचार केला तर जमिनींबद्दल माहिती देताना जमिनीचे विभाजन कसे होते? याची विस्तृत माहिती आपल्याला दिलेली आहे. उत्पन्नातील विविध घटक, शेतीव्यवसायातील विविध घटक, इत्यादींची माहिती आपल्याला भेटते. डॉक्टर अ. रा. कुलकर्णी यांनी हे पुस्तक लिहिताना प्रत्येक मुद्दयाची माहिती वाचकांपर्यंत कशी पोहोचेल याचीही काळजी घेतलेली दिसते.
३) भाषाशैली:- आपल्यापैकी कित्येक जणांना इतिहास रटाळवाणा वाटतो, तो वाचताना कंटाळा तरी येतो किंवा झोप तरी येते. हे पुस्तक मनोरंजनात्मक पद्धतीने जरी लिहिले नसले तरीही याची भाषा माझ्यामते मध्यम स्वरूपाची आहे. काही गोष्टी आपल्याला चटकन समजतात, तर काही गोष्टी समजायला ही वेळ लागतो. या पुस्तकात थोरल्या दुष्काळाचं वर्णन ही त्यांनी केलेलं आहे, जे वाचून आपलं काळीज पिळवटून निघतं. संतांचे विचार त्यांनी लिहिलेल्या ओव्यामार्फत ही मांडलेले दिसतात. त्यांनी दिलेल्या संदर्भावरून “चिकित्सक इतिहासलेखन कसं असावं” हे कळतं.
तर हे पुस्तक कुणी वाचावं? आणि का वाचावं?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा केवळ काहीच भाग आपल्याला माहिती असतो, आणि आपल्याला त्याच्याही पलीकडे छत्रपतींनी केलेलं कार्य काय आहे? हे माहीत असणे गरजेचे आहे. आणि हे सर्व कळण्यासाठी अ. रा. कुलकर्णी यांनी चिकित्सक पद्धतीने आणि संशोधन केलेले “शिवकालीन महाराष्ट्र” हे पुस्तक उत्तम आहे. ज्याला कुणाला संशोधन क्षेत्रात पुढे जायचं आहे, किंवा मराठ्यांच्या इतिहासाची चिकित्सक माहिती हवी आहे, यासोबतच तुम्ही जर विद्यार्थी किंवा शिक्षक असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. धन्यवाद!
तुम्हाला जर हे पुस्तक वाचायचे असेल, तर खालील लिंकवर तुम्ही क्लिक करून विकत घेऊ शकता.