बलुतं – दया पवार l Balut-Daya Pawar l Marathi Lalit Sahitya Review

पुस्तक बलुतं लेखक दया पवार
प्रकाशन ग्रंथाली समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या १९२ मूल्यांकन ५ / ५

भारताला स्वातंत्र्य मिळणं हे तसं सोपं नव्हतं, इंग्रजांची प्रत्येक गोष्टीत सहन करावी लागणारी मक्तेदारी आणि भारतीयांना सोसावे लागणारे अन्याय- अत्याचार याची तर गणतीच नाही. सर्व भारतीय एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला आणि अखेर भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाला खरा, पण प्रश्न पडतोच की खरंच सगळे भारतीय मुक्त झाले का या जाचातून? सगळ्यांना समान हक्क मिळाले का? आणि जो समाज परकीय सत्तेविरुद्ध एकत्र लढला तो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही तसाच एक राहिला का? या सर्वाची उत्तरं तुम्हाला मिळतात दया पवार यांच्या बलुतं या पुस्तकात.

अगदी प्राचीन काळापासूनच चतुर्वर्ण व्यवस्था आपला समाज पाळत आलाय, आणि ते अगदी ब्रिटिशांची सत्ता भारतात असताना ही. याच काळात फोफावली ती जातीव्यवस्था आणि ज्यांना आपण क्षुद्र किंवा अस्पृश्य म्हणतो अशा महार-मांग समाजातील लोकांना सहन करावी लागली विषमता. या समाजालाच पुढे आंबेडकर अस्पृश्य म्हणण्याऐवजी दलित म्हणतात. समाजातील याच जातीव्यवस्थेमुळे या दलित समाजाला अनादि-अनंत यातना सहन कराव्या लागल्या, अपार दु:ख त्यांच्या वाटेला आलं. आर्थिक दारिद्रय तर होतंच पण सामाजिक दारिद्रय ही होतं. पांढरपेशा समाजाकडून त्यांची झालेली पिळवणूक, आणि कर्माने कितीही लायक असलो तरीही केवळ दलित आहोत म्हणून जी विषमता या समाजाला सहन करावी लागली त्या सगळ्याचं वर्णन लेखकाने यात केलं आहे.

या पुस्तकातील मुख्य नायक आहे दगडू मारुती पवार, जो जातीने महार असतो. पुस्तकाच्या सुरुवातीला तो त्याची कहाणी सांगायला सुरुवात करतो. सुरुवात करतो आपल्या कुटुंबाच्या इतिहापासून की कशी त्याची आज्जी त्याच्या वडिलांना आणि काकांना घेऊन मुंबईला आली. लेखकाने यात दगडूचे मुंबईतील प्रारंभीक जीवन कसे होते, कावखाण्यात तो कसा राही या सगळ्याबद्दल सांगितलं आहे.

मुंबईच्या जीवनामध्ये लेखकाने प्रामुख्याने दगडूचं दैनंदिन जीवन कसं होतं? त्याची आई कागद वेचायचं काम करायची व वडील ही काही ना काही काम करत याचं लेखन केलेलं आहे. व्यसन माणसाच्या आयुष्याची वाताहत करतं, हे खरंच आहे. तसंच दगडूच्या वडिलांचं झालं. दारूच्या व्यसनापायी झालेलं अमाप कर्ज फेडताना होणारी ओढाताण असह्य होती. पण तरीही मुंबईचा सारा प्रपंच आवरून हे पवार कुटुंब त्यांच्या गावी येतं. लेखकाने गावातील घरांचं ही वर्णन केलं आहे, जे वाचताना घराची साधारण आकृती डोळ्यासमोर येते. दगडूचं मुंबईतील आयुष्य हे फार वेगळं होतं, मुंबईचं वर्णन करताना लेखकाने कमाठीपुरा, गोदी यांचं वर्णन आवर्जून केलेलं दिसतं. दगडूच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं, त्यामुळे गावी त्यांनी दारू कशी बनवायची याची त्यांना माहिती होती. दारूबंदी नंतर त्यांनी स्पिरीट प्यायला सुरुवात केली, आणि अखेर आतड्यांचा त्रास होऊन दुर्दैवी मृत्यु होतो. वडिलांचं छत्र हरवणं ही अत्यंत दु:खद घटना आहे, पण दगडूला त्याच्या वडिलांच्या मृत्यूमुळे एका वेगळ्याच विश्वाचं दर्शन झालं. स्वातंत्र्योत्तर काळात महार समाजाला अनेक स्तरांवर विषमता सहन करावी लागली. याचं उत्तम प्रकारे वर्णन या पुस्तकात केलेलं आहे. दगडू हा महार होता, त्यातच त्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला. त्यामुळे जबाबदारीचं सर्व ओझं हे त्याच्या आईवर पडलेलं. दुसरं लग्न न करता आपल्या मुलांचा सांभाळ करणं तिने निवडलं आणि “गंडमाळे” सारख्या आजाराला सहन करत एकचाकी संसार निघुतीने निभावला. दगडूने लहानपणापासूनच दारिद्रय पाहिलेलं आहे, मग ते आर्थिक वा सामाजिक, इतर सवर्ण मुलांपेक्षा त्याचं आयुष्य हे खूप वेगळं होतं. लहान वयातच त्याने समाजाचं एक वेगळं रूप पाहिलं होतं, ज्याने त्याचं अंतर्मन व भावना संपूर्णतः पोखरल्या होत्या.

या सर्वामधून दगडूचं बालपण इतरांपेक्षा किती वेगळं पण संघर्षमयी होतं हे कळतं. “शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे” असं म्हणतात” शिक्षणामुळे माणसाचं आयुष्य बदलतं हे खरंय. महार समाजाला गावामध्ये रिती-भातीच्या नावाखाली कसं छळलं जायचं, याची जाणीव दगडूला शिक्षणामुळे झाली. तो पहिल्यापासूनच पुस्तकात रमणारा दाखवला आहे त्यामुळे त्याला वेगळ्या जगाचं दर्शन व्हायचंच. पण शाळेत सवर्ण विद्यार्थी किंबहुना सवर्ण शिक्षक त्याला किती हिन वागणूक देत याबद्दल ही आपल्याला कळतं.

तारुण्यात आल्यावर वासना-प्रेम या भावना मनात निर्माण होणं सहाजिक आहे. तसंच दगडूच्या बाबतीतही घडलं. ना बालपण, ना तारुण्य, या सगळ्यामधील जो काळ आहे तो अतिशय संवेदनशील आहे. आणि त्याबद्दल लेखकानी ही अतिशय संवेदना बाळगून लेखन केलेले आहे. पण तरीही त्याला त्याच्या दलित असण्याच्या जाणिवेमुळे समस्यांचा सामना करावा लागला. त्याला नोकरीही त्याच्या जातीमुळेच भेटली. दगडूचं लग्न होतं त्यावेळी ही त्याला त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. आपल्या चुलतीकडे त्याला राहावं लागे. पलंगाखालीच त्यांना एकांत मिळे. एका नवीन जोडप्याला एकांत मिळू नये ही किती मोठी शोकांतिका आहे. पुढे त्याच्या मुलीचा झालेला जन्म, घर बदलणे व बायकोकडून झालेली तीव्र फसवणूक यातून तो अर्धमेला झालेला. सलमा या एका तरुण मुलीने त्याला सावरलं, पुढे तिचंही लग्न झालं. त्याच्या बायकोची नंतरची झालेली अवस्था व लेखीसाठी त्याचा तुटणारा जीव, आईने तळमळत केलेला प्राणत्याग, एक ना अनेक दु:ख त्याला एकाच जन्मात भोगावी लागली. एक वाचक म्हणून आपल्याला यातले काही शब्द, काही प्रथा-परंपरा नव्या वाटतील. कारण समाजातील सवर्ण व दलित या दोन घटकांमध्ये अजूनही किती अंतर आहे हे आपल्याला स्पष्टपणे जाणवतं.

लेखनाची भाषाशैली प्रसंग कठोर वाटेल पण यातूनच आपल्याला समाजाच्या विद्रूप समाजाचे दर्शन होते. आपल्याला वाटतो तसा समाजातील प्रत्येक घटक खरंच सुखी-समाधानी आहे का? हा प्रश्न पडायला हे पुस्तक भाग पाडते. दया पवारांनी “बलुतं”च्या मार्फत दलित समाजाच्या समस्या बोलक्या पण प्रभावित भाषेत तर मांडलाच, त्या माणसाच्या काळीज तर पिळवटतेच पण आपल्या डोळ्यावरील आंधळेपणाची पट्टी ही उघडते.

दगडू मारुती पवार व दया पवार हे एकच आहेत. एकमेकांशी म्हणजेच स्वतःशीच असलेला त्यांचा संवाद आपले काळीज हेलावून टाकते. या दुखा:ने गदगदलेल्या झाडाची “बलुतं” नामक कथा तुम्ही नक्कीच वाचावी म्हणजे तुम्हालाही दलितांच्या दु:खाची खरोखर जाणीव होईल. धन्यवाद!

तुम्ही जर हे पुस्तक विकत घेतले नसेल, तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही ते घेऊ शकता.

Leave a Comment