तुम्ही जिंकू शकता- शिव खेडा l You Can Win – Shiv Kheda l Self-help book review

पुस्तक तुम्ही जिंकू शकतालेखक शिव खेडा
प्रकाशन ब्लॉम्सबरी इंडिया समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या २६० मूल्यांकन ५ / ५

आपल्या प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी करायचंच असतं. आयुष्यात आपल्याला इतकं मोठं व्हायचं असतं की प्रत्येकाने आपल्याला नावाजलं पाहिजे, समाजात आपल्याला व आपल्या कुटुंबाला आदर मिळवा व अनन्यसाधारण असणारं आपलं स्वप्न साकारावं ही आपली प्रत्येकाचीच इच्छा असते. आपल्यासाठी हाच आयुष्यातील विजय असतो किंवा आयुष्यात जिंकणे म्हणजे काय ते हेच.

पण प्रत्येकजण आपल्याला हवं ते करू शकतो का? आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी आपण योग्य ती पावलं उचलतो का? समाजातील प्रत्येक घटकाचा आपण यात विचार करतो का? समाजातील वाईट घटकांचा परिणाम होऊ न देता आपण स्वप्नपूर्तीकडे पावलं उचलतो का? तर नाही! का? कारण आपलं आपल्याशीच एक युद्ध चाललेलं आहे ज्यात आपण कधी हरतो तर कधी जिंकतो. मग आपल्याला आपली स्वप्न तर पूर्ण करायची आहेतच, त्यासाठी आपण जिंकणार कसे? याचंच नेमकं उत्तर शिव खेडा यांनी आपल्या “आपण जिंकू शकता” या आपल्या पुस्तकात दिलं आहे. मुळ इंग्रजी भाषेतील हे पुस्तक मराठीसोबतच इतर ही भाषेत अनुवादित केलेलं आहे. त्याच पुस्तकातलं एक वाक्य जे या पुस्तकाच्या मुख्यपृष्ठावर ही आहे हे मला स्वतःला फार आवडलं ते म्हणजे “विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात” म्हणजेच विजयी होण्याचा किंवा स्वप्न पूर्ण करण्याचा एक मार्ग म्हणजे कष्ट करणे. प्रत्येकजण हे कष्ट करतात पण केवळ काहीच जण विजय मिळवतात कारण ते कष्ट चातुर्याने व हुशारीने करतात किंवा इतरही पद्धतीने करत असतील आणि हेच त्यांचं वेगळेपण आहे. या पुस्तकाद्वारे आपल्याला आपल्यातलं वेगळेपण शोधायला मदत होते.

या पुस्तकातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात, त्यातल्या मुख्य ३ पुढीलप्रमाणे:-

१) सकारात्मक विचार करा:- मी हे पुस्तक वाचलं तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की शिव खेडा यांच्या लेखी “अशक्य” हा शब्द न्यून आहे. आपण बहुतेकदा एखादी गोष्ट करायला घेतो, आणि मग स्वतःवर शंका घेतो की “मला हे जमेल ना?” यामुळे आपण खूप जास्त नकारात्मक विचार करतो ज्याचा परिणाम आपल्या कामावर होतो. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात घेऊन, आपण सकारात्मक विचार करावा. आपल्याला ज्या अडचणी येतात त्यांच्याकडे संधी म्हणून पाहावे, आणि सकारात्मक विचार करून आपल्या आत्मविश्वासात वाढ होते; हे आपण लक्षात घेतले पाहिजे. शिव खेडा यांनी आपल्या पुस्तकात प्रामुख्याने सकारात्मक विचार करण्यावर भर दिलेला आहे.

२) आत्मविश्वास दिलेला भर:- मन चिंति ते वैरी न चिंति असं म्हणतात, आणि ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते आपल्या आयुष्याशी. स्वतःवर आपण खूप कमी विश्वास दाखवतो, मनात अनेक शंका-कुशंका आणतो. यामुळे काय होतं? तर आपण अजून नकारात्मक बनतो, आणि त्याचाच परिणाम आपल्या ध्येयावर होतो. आपण स्वतःला किती ही सकारात्मक विचार करायला भाग पाडलं, तरीही कमी आत्मविश्वास आपल्या अपयशाला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळेच शिव खेडा आपल्याला या पुस्तकाद्वारे हे सांगतात की “स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वास वाढवा, तुमच्या क्षमतांवर ही विश्वास ठेवा, अपयश आलं तर डगमगू नका, हार ही मानू नका” या संपूर्ण पुस्तकातून हा अमूल्य संदेश शिव खेडा आपल्याला देतात.

३) चांगला माणूस बना:- आपण मिळेल्या यशाला किंमत कधीपर्यंत राहते? पैसा, जमीन-जुमला, सोनं-नाणं असं किती दिवस टिकतं? अर्थात तुम्ही ऐकलं असेलच की माणूस येताना ही एकटा येतो आणि जाताना ही एकटाच जातो. या सर्वांपैकी काहीच तो स्वतःसोबत नेत नाही. पण एक गोष्ट त्याच्या पाठीमागे उरते, आणि ती म्हणजे त्याने कमावलेलं नाव होय! म्हणजे आपण कितीही यशस्वी झालो तरी आपल्याला मिळणारा आदर, चांगला माणूस बनून कमावलेलं नाव हीच आपल्या यशाची पावती आहे. प्रामाणिकपणा, खरेपणा, आणि नीती मूल्यांचं केलेलं पालन यामुळे आपण चांगले माणूस तर बनतो, पण यामुळे आपले यश टिकतेही. त्यामुळे, यश मिळवण्याच्या या स्पर्धेत चांगला माणूस बना असा संदेश शिव खेडा आपल्याला देतात.

या पुस्तकाची वैशिष्ट्ये ही आपण थोडक्यात जाणून घेऊयात!

या पुस्तकातून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात, यशस्वी लोक वेगळ्या प्रकारे काम करतात त्यामुळे त्यांचं यश ही वेगळंच असतं हे आपल्याला शिव खेडा सांगतात. या पुस्तकामधून आपल्याला असंख्य गोष्टी शिकायला मिळतात, आपण नोकरी करत असू वा व्यवसाय, विद्यार्थी असो वा गृहिणी, अगदी सगळ्यांना रोजच्या जीवनात उपयोगी पडतील अशा गोष्टी लेखकांनी आपल्याला सांगितल्या आहेत. वेळेचे नियोजन आणि महत्व, शिस्त आणि प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोण अशा अनेक गोष्टी लेखक आपल्याला अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेत शिकवतात. यात लेखकाने आपल्याला अनेक उदाहरणे दिलेली आहेत, त्यांच्या कार्यशाळेतील अनुभव, प्रसंग ही आपल्याला सांगितले आहे, ज्यामुळे गोष्टी शिकायला सोप्या जातात. या पुस्तकाचं आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे यात आपल्याला अनेक प्रकारच्या कृतीपत्रिका दिलेल्या आहेत, तुम्हाला लेखक काही गोष्टी करायला सांगतात, लिहायला सांगतात; यामुळे वाचक अर्थातच या पुस्तकात रमतो पण लेखकाने दिलेल्या या कृती कार्यामुळे यशाचा मार्ग हा सोपा होतो आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे? याची कल्पना ही येते. या पुस्तकाबद्दल बोलावं तितकं कमीच आहे, केवळ एक आपल्या क्षेत्रातच यश मिळावं यापुरते हे पुस्तक मर्यादित नाही तर एक माणूस म्हणून तुम्ही यशस्वी कसे व्हाल? यावरही या पुस्तकात भर दिलेला आहे.

हे पुस्तक नक्की कोणी वाचावं? तर आपण ज्याला कोणाला आपल्या आयुष्यात योग्य मार्गाची कास धरून यश मिळवायचं आहे किंवा जिंकायचं आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं. या पुस्तकात एकूण ८ धडे म्हणजेच जिंकण्याचा अष्टांग मार्ग या पुस्तकात दिलेला आहे. मुख्य गोष्ट म्हणजे प्रत्येक धड्याच्या शेवटी कृती कार्यक्रम आहे. ज्यामुळे आपण जे काही वाचलं आहे त्याची अंमलबजावणी आपण आपल्या आयुष्यात करू शकतो. हे पुस्तक एकूण ३०४ पानांचं आहे, ज्यात शिव खेडा यांनी आत्तापर्यंत ते ज्या लोकांना भेटले, आपल्या कार्यशाळेत ते काय काय शिकवतात व ते स्वतः काय शिकले अशा इतर अनुभवांच्या आधारे पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे यशाचा हुकमी मार्ग जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक त्यांनी नक्की वाचावं.

Leave a Comment