| पुस्तक | हमखास | लेखक | सुहास शिरवाळकर |
| प्रकाशन | दिलीपराज प्रकाशन | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | ९६ | मूल्यांकन | ४.५ / ५ |
“विद्येविना मती गेली, मतिविना गती गेली
नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले,
वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एक अविद्येने केले”
महात्मा ज्योतिबा फुलेंचे हे वचन वाचताना एक गोष्ट कळली की माणूस दरिद्री होतो, वित्ताने व विचाराने ही तो केवळ अविद्येनेच. विद्या, ज्याला आपण शिक्षण ही म्हणतो. शिक्षणासारखी पवित्र गोष्ट कुठलीच नाही म्हणून गुरूला आपण श्रेष्ठत्व देतो. शिक्षण माणसाला स्वातंत्र्य देतं, आपल्या विचारांना परखड बनवायला मदत करतं, आपल्याला निडर बनवतं. आपल्यापैकी कितीतरीजण शिक्षणाच्या जोरावर मोठे झाले आहेत. जगभरात नाव कमवत आहेत. शिक्षण हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरतो. शिक्षणाने अनेकांना रोजगार मिळवून दिला, रोजी-रोटी कमवायला शिकवली, आर्थिक स्वातंत्र्य दिलं, व्यवसाय उभं करण्याचं बळ दिलं. पण सगळ्यात मोठी शोकांतिका माहितीये काय आहे? जे शिक्षण तुम्हाला-आम्हाला व्यवसाय करायला शिकवतं, तेच शिक्षण आज कित्तेकांचा व्यवसाय बनलाय. ज्या शिक्षणाला आपण पवित्र दान समजतो तोच कित्येकांचा धंदा बनलाय. शिक्षणाचं व्यापारीकरण झालंय. आणि याच शिक्षणाची शोकांतिका सुहास शिरवाळकरांच्या “हमखास” या कादंबरीतून आपल्याला वाचायला मिळते.
सुहास शिरवाळकर हे रहस्य कथा लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेली “दुनियादारी” ही कादंबरी अक्षरशः डोक्यावर घेतली. कॉलेजमधील दुनिया कशी असते, मैत्री, नातेसंबंध याची ओळख आपल्याला त्यांच्या या कादंबरीतून झाली, जिने वाचकांच्या मनात घर निर्माण केलं. “हमखास” ही अशीच एक कादंबरी आहे, जी एका ज्वलंत आणि संवेदनशील विषयात हात घालते आणि तो विषय म्हणजे “शिक्षण” होय.
“शिक्षण” घेतल्याने माणूस समंजस होतो, जाणता होतो, सुजाण व जागरूक होतो असं आपण वाचलं असेल, ऐकलं ही असेल. म्हणून जेव्हा एखादा गुन्हेगार गुन्हा करतो तर त्यावर आपसूकच “अडाणी” किंवा “अशिक्षित” असा ठपका लागला जातो. एकूणच काय रे “सुशिक्षित होणं म्हणजे देशाचा जबाबदार नागरिक होणं” अशी व्याख्या तयार होते. पण हो, गुन्हेगाराला मात्र शिक्षणाची मर्यादा नसते. उलट शिक्षणाचा वापर करूनच हे लोक गुन्हे करतात. सुहास शिरवळकरांनी याच विषयावर प्रकाश टाकला आहे. “शिक्षणाचं व्यापारीकरण होणं” ही इतकी शरमेची बाब आहे, पण गल्लोगल्ली अनेक खाजगी कोचिंग क्लासेसची मक्तेदारी चालते. हुशार विद्यार्थी शोधा, त्याला आपल्या क्लासमध्ये प्रवेश मिळवायला भाग पाडा, आपण किती शिकवतो हे राहतं बाजूला पण विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेमुळे जर तो अव्वल आला तर तो विद्यार्थी क्लासेसचं एक मार्केटिंग प्रॉडक्ट बनतं. या कादंबरीमध्ये ही असंच झालेलं आहे. गुरुनाथ सारखा अत्यंत हुशार व प्रामाणिक विद्यार्थी ज्याने नावापुरतं भांडारकरच्या क्लासला प्रवेश घेतला. पुढे काय झालं हे तुम्हीच ओळखा.
या संपूर्ण कादंबरीत प्रामाणिक गुरुनाथ विरुद्ध धूर्त कोचिंग क्लासवाले असा संघर्ष होताना आपल्याला दिसतो. या संघर्षात त्याला त्याचे सहकर्मचारी मदत करतात. पण तत्वांना जपणं ते ही शिक्षकी पेशाट म्हणजे एक व्रतच होतंच. हेच व्रत गुरुनाथने घेतलं, पण त्यांच्या मित्रांना मात्र ते काही जमलं नाही. ही कादंबरी अनेक वळणं घेत घेत अनेक मार्गांचा प्रवास घडवते आणि मुख्य विषय समजावते. एकूणच सुहास शिरवाळकरांनी फोल झालेल्या शिक्षणव्यवस्थेवर, खाजगी क्लासेसच्या मक्तेदारीवर आघात केलेले आहेत. आणि शिक्षण म्हणजे धंदा नसून ते एक पवित्र दान आहे, आणि त्याचा अपमान या स्पर्धेच्या जगात करू नये हे लेखकाने आपल्याला सांगितलं आहे. आता आपण जाणून घेऊयात लेखकाच्या भाषाशैलीबद्दल, तसेच जाणून घेऊयात वैशिष्ट्ये आणि मिळणारे संदेशही.
१) संवेदनशील विषयावर भाष्य:- शिक्षण हा विषय जितका महत्वाचा तितकाच संवेदनशील आहे. आपल्या देशात आजही बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. याचं कारण म्हणजे शिक्षणाला बाजाराचं मिळालेलं स्वरूप होय. त्यातही खाजगी क्लासेस ही विद्यार्थ्यांचा कसा वापर करतात? विद्यार्थ्यांची कशी पिळवणूक करतात? शिक्षणाचा दर्जा कमी असला तरीही फी मात्र मोठ्या प्रमाणात उकळतात. हे सगळंच समाजाला पोखरतं, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. या संवेदनशील विषयावर प्रकाश टाकण्याचं काम लेखकाने केलेलं आहे.
२) शिक्षणव्यवस्थेवर केलेले परखड भाष्य:- मुळातच खाजगी क्लासेसची गरज का निर्माण झाली? आणि त्याची गरज आहे का? हा प्रश्नच आज पालक स्वतःला विचारायला विसरले आहेत. आपलं मुल क्लासेसला जातंय म्हणजे ते नक्कीच अव्वल येणार आहे असा त्यांचा समज होतो. पण कुणीही आपल्या शिक्षणव्यवस्थेतल्या असलेल्या त्रुटींवर का लक्ष देत नाही? शाळांमध्ये चांगले शिक्षण असेल, तर या क्लासेसची गरज भासणार नाही हे समजण्यासारखे आहे. हा लुपहोल या क्लासेसला माहीत असतो. म्हणूनच त्यांची मक्तेदारी वाढते आणि प्रतिस्पर्धी, इतर क्लासेसवाले यांच्यासोबतच्या चढाओढीमध्ये विद्यार्थी मात्र भरडले जातात. याचं उत्तम उदाहरण या कादंबरीतील मुख्य पात्र गुरुनाथ आहे. अशा प्रकारे सुहास शिरवाळकर शिक्षणव्यवस्थेमधील ही त्रुटी तर सांगतातच, पण या खाजगी क्लासेसनामक व्यवसायामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे आपल्याला या कादंबरीतून समजतं.
३) भाषाशैली:- ही कादंबरी अक्षरशः तुम्हाला खिळवून टाकते. भाषा सोपी तर आहेच, पण पुढे काय होईल? आता नवीन कोणती घटना घडेल? याची उत्सुकता तुम्हाला लागल्याशिवाय राहवत नाही. कादंबरी एकदा वाचायला घेतली की एका बैठकीतच पूर्ण करावी अशी याची भाषा आहे. वेळोवेळी नवीन रहस्य, नवीन गूढ, अचानक कथेला मिळणारे वळण हे सारं काही रोमांचकारी आहे/. या कादंबरीची भाषा डोईजड नाही, त्यामुके वाचताना कंटाळा येण्याचा प्रश्नच नाही. या कादंबरीची भाषा संवादात्मक आहे, रटाळवाणी नाही त्यामुळे अगदी नवीन वाचक ही सहज ही कादंबरी वाचू शकतो.
या कादंबरीतून सुहास शिरवाळकर आपल्याला काही संदेश ही देतात जसे की:-
१) शिक्षण हा काही व्यापार नाही, कोचिंग माफियांनी शिक्षणाचे व्यापारीकरण केले आहे. उलट, शिक्षण हे एक पवित्र दान आहे, जरी तुमची रोजी रोटी कोचिंगद्वारे होत असेल तरीही विद्यार्थ्यांचा वापर प्रॉडक्ट सारखा करून स्वतःच्या क्लासेसची मार्केटिंग करू नये.
२) यशाची व्याख्या ही मार्क किती पडतात यावर कधीच अवलंबून नसते. तर तुमच्यात किती गुणवत्ता आहे यावर तुमचं यश अवलंबून आहे.
३) सध्याच्या स्पर्धेच्या जगात पालकांनी विद्यार्थ्यांवर दबाव न टाकता त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी, व अशा कोचिंग क्लासेसची खरंच गरज आहे का? याचा ही फेरविचार करावा.
सुहास शिरवळकर यांनी या कादंबरीद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या डोळ्यात जळजळीत अंजनच घातले आहे. खाजगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षणाच्या आडून चालवत असलेल्या व्यवसायाचा त्यांनी पर्दाफाश केला आहे. सगळे कोचिंग क्लासेस तसे नसतील ही, पण जे कोणी शिक्षणाला व्यवसायाचं रूप देऊन त्यामार्गे पैसा कमवत आहेत अशा लोकांमुळे एकूणच शिक्षण क्षेत्राचं नाव खराब होत आहे. ही कादंबरी अगदी पालक, शिक्षक, विद्यार्थी सर्वांनीच वाचण्यासारखी आहे.
जर तुम्ही ही कादंबरी अजून वाचली नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही ती विकत घेऊ शकता. धन्यवाद!