| पुस्तक | वारी | लेखक | व्यंकटेश माडगूळकर |
| प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | १२७ | मूल्यांकन | ५ / ५ |
“वारी” म्हटलं की आठवते ति विठ्ठलाची मुर्ती, विटेवरी उभा असलेला पांडुरंग आपल्या भक्तांचा पालक बनतो. त्याच्या दर्शनाने डोळे तृप्त होतात, मन शांत होतं, अवघी पंढरी वारकऱ्यांनी भरून जाते. गजबजून अखंड हरिनामाचा गजर चालतो, टाळ-चिपळ्या आणि मृदुंग म्हणू नका की भगव्या पताका म्हणू नका अवघं पंढरपूरच “वारी” या शब्दाचा उल्लेख केला की डोळ्यासमोर उभं राहतं. असंच काहीसं झालं जेव्हा मी व्यंकटेश माडगूळकर यांचं वारी हे पुस्तक हातात सर्वप्रथम घेतलं तेव्हा. त्यामुळे मला वाटलं की हा कथासंग्रह हे विठूरायांच्या वारकऱ्यांबद्दलचा तर नसेल ना? पुस्तकाच्या मुख्यपृष्ठावरही नमस्कार करणारा वारकरी पाहिला की कुणालाही असंच वाटेल. पण जेव्हा तुम्ही हा कथासंग्रह जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही अगदी हरवून आणि हरकून जाता. व्यंकटेश माडगूळकर हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक गाजलेलं नाव आहे ज्यांनी “बनगरवाडी” “वावटळ” यांसारख्या कादंबऱ्या व “मानदेशी माणसं” “गावाकडच्या गोष्टी” असे कथासंग्रह लिहिले आहेत. त्यांची लेखनशैली, साधी-सोपी भाषा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. पण त्याबद्दल बोलण्याआधी आपण जाणून घेऊयात “वारी” या कथासंग्रहाबद्दल.
“वारी” चा संबंध थेट पांडुरंगाशी किंवा पंढरपुराशी जोडला जातो. याबद्दल आपण सुरुवातीलाच बोललो आहोत. पण लेखकाने वारीचा अर्थ वेगळ्याच गोष्टीसाठी सांगितलेला दिसतो. विठूरायापर्यंत पोहोचण्यासाठी वारकरी चालत “वारी” करतो, म्हणजेच तो पायी चालत प्रवास करतो. तसंच सामान्य माणूस ही आयुष्यात वेगवेगळ्या कारणासाठी प्रवास करतच असतो. या कथासंग्रहात एकूण १४ कथा आहेत. यामध्ये तुमची वेगवेगळ्या पात्रांशी ओळख होते. जसे की अर्जुन, भाल्या, उमाजी, भालू, मंजुळा, रसूल, रंगनाथ, इत्यादी. या सगळ्यांमध्ये समान असणारी एकच गोष्ट म्हणजे त्यांचा “प्रवास” होय. कोणाचा मोक्षासाठी, तर कुणाचा आपल्याच माणसांनी आपल्याला एकाकी पाडलं म्हणून, काही वाटसरू म्हणून तर काहींचा आपल्या हक्काच्या ठिकाणासाठी जाण्याचा प्रवास. हा नुसता जीवन प्रवास नव्हे तर “वारी” होती. या प्रवासातलं अंतिम ध्येय हाच त्यांचा पांडुरंग!
या १४ कथांमधून आपल्याला वेगवेगळ्या भावनांचं दर्शन होतं. यात कुणी सुखी आहे तर कुणी दु:खी, कुणी आनंदी आहे तर कुणी वेदनेत, कुणी विरहाच्या यातना सहन करतोय तर कुणी अपमानाच्या आगीत जळत आहे. एकाच कथासंग्रहात तुम्हाला अनेको भावनांचं दर्शन होतं. प्रत्येकाच्याच प्रवासात अनेक खाच खळगे आहेत, कुणाचा प्रवास आनंदाने होतो तर काहींचा प्रवास पूर्ण होण्याआधीच संपतो. काही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले असूनही ते साध्य करत नाही आणि आहे यातच धन्यता मानतात. या कथेमधील प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा, गुणधर्म वेगळे, राहणीमान आणि जीवन ही वेगळं. प्रत्येकाचं दु:ख ही वेगळं, आणि सुखाचं कारण ही वेगळं. आणि त्याचमुळे प्रत्येकाच्या प्रवासाचं म्हणजेच वारीचं कारण ही वेगळं. खरं सांगायचं तर प्रत्येक कथा वाचताना त्या त्या व्यक्तीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, आणि त्या पात्रासोबत आपल्याही वारीला सुरुवात होते. त्यांची वारी सुफळ संपूर्ण झाली की एक अनामिक समाधान आपल्याला भेटतं, आणि जर ती अपयशी झाली तर आपल्याला ही तेवढंच दु:खहोतं यात काहीच शंका नाही. याच कारणामुळे हा कथासंग्रह अतिशय वेगळा आहे, जो एकावेळी अनेको भावनांचं दर्शन आपल्याला घडवून देतो.
व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या कथासंग्रहात वेगवगेळया विषयावर भाष्य केलं आहे. या कथासंग्रहाची प्रत्येक कथा ही वेगळी आहे, प्रत्येक कथेचा विषय वेगळा आहे. प्रत्येक कथेत वेगवेगळ्या व्यक्ती व वेगवेगळे प्रसंग आहेत. परंतु प्रत्येकालाच काही ना काही कारणाने “वारी” करावीच लागली. म्हणजेच या कथेतील पात्राच्या आयुष्यात प्रसंग कोणताही घडो, शेवटी त्यांना प्रवास करावाच लागतो. यातली प्रत्येक कथा हृदयस्पर्शी आहे. कथा वाचल्यानंतर तुम्ही स्तब्ध राहता, सुन्न ही होता. काही कथा डोळ्यात पाणी आणतात तर काही तुम्हाला भावुक करतात. यातूनच लेखकाने किती उत्कटतेने लेखन केलंय याची जाणीव होते.
या कथासंग्रहाची वैशिष्ट्ये आता आपण जाणून घेऊयात:
या कथा तुम्हाला रटाळवाण्या वाटत नाही, या कथा तुम्हाला कंटाळा येऊ देत नाहीत. या कथा ना अगदीच छोट्या, आणि ना अगदीच मोठ्या आहेत. पण प्रत्येक कथा या अर्थपूर्ण आहेत. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा तुम्हाला काही ना काही शिकवून जाते. मानवी जीवनाचे, भावनांचे विशिष्ट पैलू तुम्हाला यात वाचायला मिळतात. यातली पात्र तुमच्या भावनांना बोलतं करायचं काम करतात. व्यंकटेश माडगूळकर हे ग्रामीण भागाच्या लेखनासाठी विशेष करून प्रसिद्ध आहेत, पण या कथासंग्रहात मात्र तुम्हाला गाव एके गावाचं वर्णन दिसत नाही. या कथासंग्रहात ग्रामीण आयुष्याचं जेवढं वर्णन तर केलेलं आहेच, पण याच सोबत शहरी आयुष्याचं वर्णन ही तितक्याच उत्कटतेने केलेलं आहे. शहरी माणसाचं राहणीमान, समाजातील एकमेकांना मिळणारी वागणूक आणि त्याचा परिणाम, इत्यादी गोष्टी आपल्याला यातूनच कळतात.
कळत नकळत या कथा अनेक सामाजिक समस्यांबद्दल वाच्यता करतात, कथांच्यामार्फत ते त्या समस्या आपल्यासमोर मांडतात. उदाहरणार्थ पहिल्याच कथेत म्हणजेच “वारी” या कथेत जातीपातीमुळे, वर्णव्यवस्थेमुळे दलित समाजातील एक घटक अजूनही पांढरपेशा समाजाला बिचकून आहे, घाबरून आहे. “रसूल ” या कथेने तर अक्षरशः आत्ताच्या समाजाची स्थिती जशीच्या तशी मांडली आणि अजूनही आपण हिंदू-मुस्लिम वादात अडकून आहोत हे सांगून आपल्या डोळ्यात जळजळीत अंजन घातलं आहे. यासोबत “सोबत” या कथेमुळे माणुसकी मेली की काय? असा प्रश्न आपल्याला पडतो. असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात, पण काही निरुत्तरीतच राहतात. काहींच्या वारीचं सार्थक होतं, पण काहींच्या नाशिबातील वारी त्यांचं आयुष्य उजाड करते.
व्यंकटेश माडगूळकरांनी या १४ कथांद्वारे माणसांच्या भावनांचे पदर अलगद उलगडून दाखवले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदातरी हा कथासंग्रह नक्की वाचवा. धन्यवाद!
तुम्ही जर हे पुस्तक वाचालं नसेल, तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही ते घेऊ शकता.