फोर अवर वर्क वीक- टीमोथाय फेरीस l 4 Hour Work Week – Timothy Ferriss l Self Help Book Review

पुस्तक फोर अवर वर्क वीकलेखक टीमोथाय फेरीस
प्रकाशन बुकलीन समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या ३३६ मूल्यांकन ४ / ५

सध्याच्या काळात प्रत्येकजण “स्वतःचा व्यवसाय करा”, “स्वतःचं काहीतरी करा” “स्वतःचं नाव कमवा” असं सांगत असतात. आणि अर्थातच, यात काहीच चुक नाही. पण स्वतःचा व्यवसाय करणे व नाव कमवणे या दोन्ही गोष्टी एकत्र साध्य करता आल्या नाही तरीही त्या आपण वेगवेगळ्या ही साध्य करू शकतो. प्रत्येक व्यावसायिक नाव कमावतोच असं नाही, तसेच प्रत्येक नाव कमावणारा व्यक्ती हा व्यावसायिक असतोच असे नाही. कदाचित तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. मग आता प्रश्न हा आहे की आपण नेमकं काय करायचं? व्यवसाय करावा की नोकरी करावी? पहा, तुम्हाला ज्यात स्वारस्य आहे तेच तुम्ही करा. नोकरी असो वा व्यवसाय, या दोन्हीमध्ये तुमच्या कामाची गुणवत्ता सर्वात जास्त महत्वाची आहे. नोकरीतून बढती मिळण्यासाठी वा व्यवसायात जास्त नफा होण्यासाठी तुमच्या कामाची गुणवत्ता महत्वाची भूमिका पार पाडते, आणि त्यासाठी तुमच्यामध्ये उत्पादकता ही हवीच. ती तुम्ही कशी वाढवाल? हे टिमोथी फेरीस यांच्या “द फोर अवर वर्क विक” या पुस्तकात दिलेलं आहे. या पुस्तकात लेखकाने त्यांच्या व्यवसायाबद्दल ही सांगितलं आहे, यातून ते त्यांच्या व्यवसायात कसे उत्पादकतेने काम करतात, आणि केवळ तेच नाही तर त्यांचे कर्मचारी ही तितकेच उत्पादक आहेत आणि त्यामुळेच त्यांचा व्यवसाय चांगला चालतो हे ही ते आपल्याला सांगतात. व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांची गुणवत्ता ही तितकीच महत्वाची आहे. या पुस्तकाने नोकरीबद्दलचे सर्व गैरसमज दूर केले. जिथे अजूनही लोक ९ ते ५ च्या नोकरीला लोकं नावं ठेवतात तिथे लेखकांनी उत्पादकता वाढवून नोकरीचा आनंद घ्यायला शिकवलं.

या पुस्तकातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात:-

इथेच ते आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवतात की “वेळ हा पैशापेक्षा जास्त महत्वाचा आहे” म्हणजेच तुमच्या नोकरीमधील अगदी छोटंसं काम करायला तुम्हाला खूप वेळ लागत असेल तर ते काम लवकर करायला शिका, याने तुमचा वेळ ही वाचेल. आणि हाच उरलेला वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबाला द्या, शिवाय तुम्ही पार्ट टाइम कमाई म्हणजेच जोडधंदा ही करण्यासाठी हा वेळ देऊ शकता. आणि या सर्वाचा उपयोग तुम्हाला तुमच्या भविष्यात उपयोगी पडतील. आता, हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही फाफट पसाऱ्यापेक्षा कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्याल. इथूनच आपण दूसरा महत्वाचा मुद्दा शिकतो तो म्हणजे 80/20 नियम. यामध्ये तुम्ही जे 20% टक्के काम कराल त्याचं फळ म्हणजे आपल्याला 80% चांगले परिणाम होय. उदाहरणार्थ “मी जो एक तास अभ्यास करेल, तो इतका चांगला असेल की मला पेपरमध्ये ही चांगले मार्क मिळतील” म्हणजेच 20% अभ्यास व त्याचं फळ म्हणजे तुमचा आलेला चांगला निकाल म्हणजेच 80% भेटलेलं फळ होय. म्हणजेच तुम्ही जे काम कराल, जितकं कराल ते इतकं चांगलं करा की त्याचा परिणाम ही तितकाच चांगला होईल. तिसरी महत्वाची गोष्ट यातून शिकायला मिळते की “अल्पकाळ निवृत्ती घ्या” कारण एका वयानंतर निवृत्त झालात तरीही वयोमानानुसार तुम्ही त्याचा कितपत आनंद घ्याल, याचा विचार करा. मग तुम्ही १५ दिवस किंवा २० दिवस कामातून सुट्टी घ्या, फिरा, कुटुंबाला वेळ द्या. कारण यानंतर तुमची मानसिक स्वास्थ्यता उत्तम राहील व उत्पादकता वाढून तुम्ही अजून चांगले काम करेल. आपल्यापैकी कितीतरी जणांना वाटतं की रात्रं दिवस काम केलं म्हणजेच फळ भेटतं, काही बाबतीत ते खरं असेलही. पण काही लोक सोप्या कामासाठी ही आपल्या दिवसातला बराच वेळ देतात, पण प्रत्यक्षपणे ते काम अगदी कमी वेळात होतं. त्यामुळे लेखक आपल्याला सांगतात की जेवढं महत्वाचं आहे तेवढंच काम करा, फाफट पसारा करू नका. या सगळ्यामध्ये बहुतांश लोकांचं लक्ष ही विचलित होत असतं, याचा परिणाम त्यांच्या कामावर ही होतो. त्यामुळे लेखक आपल्याला सांगतात की ज्या गोष्टीमुळे आपलं लक्ष विचलित होतं, आपण आपल्या कामामध्ये कमी पडतो अशा गोष्टींपासून दूर रहा. वेळेचे नियोजन करण्यासाठी ही त्यांनी आपल्याला अनेक महत्वाच्या गोष्टी शिकवल्या जसे की “कुठल्या वेळेत कुठले काम कराल, तो वेळ निश्चित करा” यालाच ते टाइम ब्लॉकिंग असे म्हणतात. यामुळे तुम्ही तुमचे काम वेळेवर ही पूर्ण कराल, आणि तुमचे वेळेचे नियोजन ही व्यवस्थित होईल. आपल्यापैकी कितीतरी जण मोटीवेशनचा आधार घेऊन जगत असतात किंवा काम करत असतात, पण तुम्हाला माहित आहे का की हे उत्तेजन नवीन सवयी लावण्याचा एक तात्पुरता उपाय आहे. ज्यावेळी तुम्हाला उत्तेजित वाटणं बंद होईल त्यावेळी तुम्ही त्या नवीन सवयीनुसार वागणं ही बंद करता. त्यामुळे लेखक म्हणतात की उत्तेजनावर अवलंबून राहण्यापेक्षा त्या नवीन सवयी किंवा तुमच्या कामात सातत्य आणण्यासाठी यंत्रणा किंवा सिस्टीम बनवा. या आणि अशा कित्येक गोष्टी तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळतात, तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात असे काही छोटे-मोठे बदल करून तुमचं आयुष्य बदलू शकता.

आता आपण जाणून घेऊयात या पुस्तकाची वैशिष्ट्ये :-

लेखकाने या पुस्तकात नोकरी व व्यवसायाबद्दल बरेचसे मुद्दे मांडले आहेत व छान प्रकारे त्याचं विश्लेषण ही केलं आहे. त्यासाठी लेखकाने चार्ट व टेबलचा वापर ही केलाय. महत्वाची संकेतस्थळे नमूद केली आहे. यामुळे वाचकांचा नक्कीच फायदा होईल. बरेच व्यावसायिक नोकरीला नावं ठेवतात, पण लेखकाने मात्र तुम्ही तुमच्या नोकरीत अव्वल कसे राहाल? नोकरी करत तुम्ही तुमचा व्यवसाय कसा सुरू कराल? आणि मग तुम्ही तुमचं आयुष्य नोकरी किंवा व्यवसाय यात तुमच्यासाठी योग्य काय आहे याचा विचार करून सुखी आयुष्य कसे जगाल हे लेखक आपल्याला सांगतात. नोकरीला कमी न लेखता, नोकरीत राहूनही तुम्ही आनंदी राहू शकता यावर लेखकाने खास भर दिलेला आहे. एकूणच यातल्या सवयी या कामात किंवा व्यवसायातच नव्हे तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ही उपयुक्त आहेत. त्यामुळे तुम्ही व्यावसायिक असाल, नोकरदार असाल, विद्यार्थी किंवा फ्रीलांसर असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. धन्यवाद!

हे पुस्तक विकत घेण्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकता.

Leave a Comment