| पुस्तक | महामाया निळावंतीशी | लेखक | सुमेधकूमार इंगळे |
| प्रकाशन | कॉस्मिक प्रकाशन | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | ३७२ | मूल्यांकन | ४.५ / ५ |
गूढकथा म्हणलं की सुहास शिरवाळकर किंवा नारायण धारप यांचं नाव आपसूकच आपल्या ओठांवर येतं. या लेखकांनी या साहित्य प्रकारात अमूल्य योगदान दिलेलं दिसतं. अगदी २० व्या शतकाचं दर्शन आपल्याला होतं, आपल्या आधीची आणि आत्ताची पिढी ही त्यांची साहित्य अगदी आवडीने वाचतात. या गूढकथा लेखकांच्या रांगेत आणखीन एक नाव समाविष्ट झालं आहे, आणि ते म्हणजे सुमेधकूमार इंगळे यांचं. २१ व्या शतकातील या लेखकाने आपल्या लिखानाने वाचक वर्गाला थक्क केलं आहे यात काहीच शंका नाही. सरतेशेवटी त्यांचं पुस्तक आपल्याला विचार करायला लावतंच. आणि असंच एक पुस्तक जे शेवटी आपल्याला थक्क करून टाकतं आणि ते म्हणजे महामाया निळावंती ही कादंबरी होय.
निळावंती हा एक प्राचीन ग्रंथ आहे, ज्यात निसर्गाशी संवाद कसा साधायचा आणि प्राणी पक्षांशी कसं बोलायचं हे सांगितलं आहे. असं म्हणतात की निळावंती वाचलेला माणूस एक तर वेडा होतो किंवा आत्महत्या तरी करतो. निळावंती ग्रंथाचा शोध आजही कित्येक लोक घेत आहेत, कित्येकांचा असा दावा ही आहे की त्यांनी हा ग्रंथ वाचला आहे. पण सत्य काय आहे हे कित्येकांना ठाऊक असेल, नसेल, असो. आता आपण बोलूयात या कादंबरीबद्दल.
या कादंबरीचा आधार आहे निळावंती. निळावंती म्हणजे पृथ्वी, जिचं आपल्या मुलांवर म्हणजेच प्राणी, पक्षी, वृक्ष, पर्वत अमाप प्रेम असतं. ज्यावेळी मनुष्य तिच्या मुलांना त्रास देतो किंवा तिला समोर मृत्यू दिसतो तेव्हा ती अशक्त बनते, प्राणहीन बनते. या कादंबरीमध्ये तिला आयुष्याची देवता मानलं आहे. त्यामुळेच या कादंबरीमध्ये अशी कितीतरी पात्र तुम्हाला सापडतील जे निळावंतीचा शोध अमरत्व किंवा मेलेल्या व्यक्तीला किंवा प्राण्याला जिवंत करण्यासाठी घेत असतात. त्यापैकीच एक पात्र म्हणजे विक्रम विभूते होय. त्याचं असं म्हणणं असायचं, की तो ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती मृत्यूला पोहोचते. त्याची आई, त्याची बायको आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा मुलगा या सर्वांच्या मृत्यूला सो स्वतः कारणीभूत आहे असं त्याला वाटतं. त्याला कायम वाटतं, की नशीब आपल्याला सुख मिळू देत नाही पण आपण ते सुख मिळवून राहणार आणि आपल्या मेलेल्या मुलाला जिवंत करणार, आणि त्याच्या याच अट्टहासाची कहाणी या कादंबरीत लिहिली आहे. या प्रवासात त्याला अनेक व्यक्ती भेटतात जसे की गणेश रायरीकर, सेंबीयन, घैसास, इत्यादि. विक्रम विभूतेला मृत्यू अमान्य असतो, आणि त्यामुळेच तो निसर्गाच्या विरुद्ध जायला लागतो. आपल्या मुलाला जिवंत करण्यासाठी तो अक्षरशः रानटी बनतो, आणि जेव्हा निळावंती त्याला बोलते की “तू स्वतःच एक मृत्यू आहे” तेव्हा जी निळावंती अतिशय सौम्य आहे तितकीच ती कठोर ही आहे हे आपल्याला जाणवतं. या कादंबरीमध्ये तुम्हाला सह्याद्री परिसर, जंगलं, प्राणी, निसर्ग अशा कित्येक घटकांचं अतिशय विस्तृत वर्णन केलेलं आहे. यासोबतच इतिहासाचा ही अभ्यास लेखकाने अतिशय सखोलपणे केलेला आहे. वरवर पाहता ही कादंबरी जन्म विरुद्ध मृत्यू अशी वाटेल. पण या कादंबरीचा मतितार्थ हा “जेव्हा मनुष्य निसर्गाच्या विरुद्ध बंड करतो किंवा निसर्गाला नुकसान पोहोचवतो तेव्हा त्याला त्याच्या केलेल्या कर्माची शिक्षा नक्कीच मिळते” विक्रम विभूतेने ही निसर्गाच्या नियमांविरुद्ध एक प्रकारचं बंड केलं, आणि मृत्यूचा स्वीकार केला नाही आणि अखेर त्याच्या आयुष्यात घोर निराशेखेरीज काहीच आलं नाही. दुर्दैवाने ज्यांनी ज्यांनी त्याला साथ दिली या सर्व प्रवासात त्यांचा ही टप्प्याटप्प्याने मृत्यू होतो, विक्रम विभूतेच्या कर्माची शिक्षा त्याच्या जवळच्या निष्पाप लोकांना भेटते.
या कादंबरीमध्ये तुम्हाला एक गोष्ट आवर्जून भेटेल आणि ती म्हणजे “रहस्याचा खजिना” ही कादंबरी अतिशय रहस्यपूर्ण आहे, त्यामुळे पुढे काय होईल हा प्रश्न आपल्याला पडतो आणि कादंबरीचं वाचन पूर्ण करण्यासाठी आपलीही धडपड होते. लेखक आपल्याला त्यांच्या लेखनात गुंतवून ठेवतात, म्हणजे एक पान वाचलं की दुसरं वाचावं, मग तिसरं आणि असं करत करत संपूर्ण कादंबरी वाचायची इच्छा आपल्या मनात उत्पन्न होते. कादंबरी जरी मोठी वाटली, तरी ही ती लवकर वाचता येईल, यात अजिबात अवघड भाषेचा वापर केला गेला नसल्याने नवीन वाचक ही अगदी सहज ही कादंबरी वाचू शकतो. खरं सांगायचं तर या कादंबरीत मानवी परिकल्पनेपेक्षा ही खूप काही वेगळ्या गोष्टी आहेत जसे की “आमसे” जमातीची लोकं, निळावंतीची संवाद करण्याची पद्धत, मोक्ष, जन्म-मृत्यू इत्यादि. यामुळे आपला आयुष्यकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलतो हे मात्र खरं. मला या कादंबरीमध्ये काही आणखीन गोष्टी आवडल्या की जिथे जिथे त्यांनी संदर्भ वापरले आहेत ते नमूद ही केलेले आहेत त्यामुळे ही काही मनघडण कहाणी नाही. लेखकाने कादंबरीची सुरुवात ही अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेली दिसते, ज्या वेळी तुम्ही ही कादंबरी वाचाल तेव्हा तुम्हाला ते कळेलच. याशिवाय निळावंती ग्रंथाबद्दलचे काही मंत्र यात दिलेले आहेत, ते मात्र मी वाचणं टाळलं, कारण ते तांत्रिक विद्येचा एक भाग आहेत आणि ती सिद्धी प्राप्त असलेल्या गुरूच्या मार्गदर्शनाखालीच या मंत्रविद्येचा अभ्यास करावा असं माझं वैयक्तिक मत आहे.
आपण प्रेम, विरह याबद्दलच्या कादंबऱ्या वाचतोच पण महामाया निळावंती ही कादंबरी अध्यात्म, मानवी जीवन, तंत्रविद्या, निसर्ग अशा कित्येक विषयांना हात घालते. लेखकाच्या मते ही कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे, त्यामुळे त्यांनी या पात्रांची खरी नावे सांगितली नाहीत. या कादंबरीचं प्रत्येक पान, प्रत्येक धडा आपल्याला विचार करायला भाग पाडतो. लेखकाने जे लिहिलं आहे त्यामुळे जंगल, तंत्र-मंत्र, खुद्द विक्रम विभूते आणि निळावंती यांच्या बद्दलचं एक चित्र आपल्या मनात निर्माण होतं. या पात्रांसोबतच आपलाही प्रवास होतो, आणि जिथे विक्रम विभूतेचा प्रवास संपतो तिथे उरतात केवळ असंख्य प्रश्न. या प्रशांची उत्तरं काय असतील? आणि मुळात प्रश्न काय आहेत? विक्रम विभूते नायक आहे की खलनायक? तो दुबळा आहे की कणखर? स्वार्थी आहे की दिलदार? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कादंबरीमध्ये भेटतील. त्यामुळे ही कादंबरी तुम्ही आवर्जून वाचा, आणि महामाया निळावंतीबद्दलचं तुमचं मत काय आहे ते ही आम्हाला नक्की कळवा.
धन्यवाद!