राणीमाशी- शरणकुमार लिंबाळे l Ranimashi- Sharankumar Limbale l Marathi Lalit Sahitya Review

पुस्तक राणीमाशीलेखक शरणकुमार लिंबाळे
प्रकाशन दिलीपराज प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या १०२ मूल्यांकन ४.५ / ५

प्रेम किती विचित्र भावना आहे. एकमेकांची ओढ नीट जगू ही देत नाही आणि धड मरू ही देत नाही. प्रेमात फक्त ओढच असते का हो? विश्वास, काळजी, आधार, माया, अशा कितीतरी भावना त्यात गुंफल्या जातात. पूर्वीचं प्रेम एका गुलाबाच्या फुलाने मिळायचं, ज्यामध्ये एकमेकांबद्दल अमाप प्रेम होतं. शब्दात ही सांगता येणार नाही इतकी सहजता होती त्यात. काळ बदलला, पिढी बदलली, आणि त्यासोबत प्रेमाचं स्वरूप ही बदललं. सहजतेची जागा संघर्षाने घेतली आणि विश्वासाची जागा संशयाने. ज्या जोडीदाराची साथ आपण सात जन्म देवाकडे मागतो, त्याच जोडीदाराचा सहवास हा काट्याप्रमाणे बोचत असेल तर याहून मोठं दुर्दैव ते कोणतं? जे नातं शेवटच्या श्वासापर्यंत टिकेल अशी शाश्वती या प्रेमीयुगुलांना असे, आता तेच नातं टिकायला एक एक क्षणाची सततची धडपड चालू असते. पण जिथे नात्यात सहजतेची जागा संघर्ष आणि सततच्या धडपडेने घेतली असेल; ती त्या नात्याची आणि आणि त्या प्रेमाची शोकांतिकाच होय. याच प्रेमाची, संघर्षाची, धडपडीची शोकांतिका शरणकूमार लिंबाळे यांनी आपल्या “आत्मकथनपर ललित साहित्य” असलेल्या राणीमाशी या पुस्तकात मांडली आहे. या साहित्याबद्दल जाणून घेण्याआधी आपण लेखकाबद्दल जाणून घेऊयात.

दलित साहित्यामध्ये ज्या लेखकांनी आपलं योगदान दिलं, त्यापैकीच शरणकुमार लिंबाळे हे आहेत. त्यांनी त्यांच्या लेखनातून दलितांच्या व्यथा, त्यांच्या यातना, गरीबी अशा असंख्य गोष्टी मांडल्या व भारतीय दलित साहित्यात त्यांनी त्यांचं स्थान मिळवलं. या दलित साहित्यातील “अक्करमाशी” हे एक आत्मकथन जातीव्यवस्थेचे चटके सहन करून जगण्याऱ्या दलित बांधवांबद्दल लिहिले, जे प्रसिद्ध आहे. त्यांना २०२० मध्ये सरस्वती सन्मानाने ही पुरस्कारित करण्यात आलं होतं. उद्रेक, दंगल, इत्यादी अशी अनेक साहित्य त्यांनी लिहिलेली आहेत पण त्यांचं “राणीमाशी” हे साहित्य जरा हटके आहे. दु:खानी डबडबलेल्या जगातून बाहेर येऊन, एक सुखासिन विश्व शरणकूमार लिंबाळे यांनी आपल्या “राणीमाशी” या ललित साहित्यातून दाखवलं आहे.

या जगात “प्रेम” म्हटलं की प्रियकर-प्रेयसी हे दोनच शब्द आठवतात. त्यांचं ते एकमेकांवरचं निस्सीम प्रेम, आणि अक्षरशः एकमेकांवर केलेली भक्ती. प्रेमाला जातपात, वर्ण-लिंग, अशा कशाचीच मर्यादा नसते. अर्थातच, सामाजिक नितीमत्तेचा विचार केला तर त्यासाठी ही “अटी-शर्ती” या आहेतच. असं या गोष्टींचं बंधन नसतं, तसंच आणखीन ही एका गोष्टीचं बंधन नसतं आणि ते म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीची वैवाहिक स्थिती. प्रेम विवाहित किंवा अविवाहित व्यक्ती नाही ना पाहत, तर प्रेम फक्त समोरच्याबद्दल निर्माण झालेली ओढ आणि जिव्हाळा पाहतं. आणि हे ललित साहित्य याच प्रेमाचं, त्यातून निर्माण झालेल्या ओढीचं, संघर्षाचं, आणि विरहाचं आत्मकथन करते. ही कहाणी आहे स्वाती, शरण आणि कुसुम यांची. अर्थातच, ही कादंबरी नाहीये पण तरीही या तिघांचं स्वतःचं भावविश्व आहे आणि त्यात सामावलेल्या माणसांच्या आयुष्यावर या प्रेमाच्या त्रिवेणीसंगमामुळे झालेला परिणाम स्पष्टपणे दाखवला आहे. या पुस्तकात आपल्याला या तिघांच्याही मनातील भावनांचा प्रवास अतिशय सुरेखपणे दिसतो. कुसुम आणि शरण हे नवरा-बायको असतात, तर स्वाती आणि शरण हे दोघे प्रियकर-प्रेयसी असतात. पण कुसुम आणि स्वाती या एकमेकींच्या कोण? ना सवती, अन ना मैत्रिणी. फक्त दोन अशा व्यक्ती ज्यांचं एकाच व्यक्तीवर म्हणजे शरणवर प्रेम आहे. हा नात्यांचा भावनिक गुंता आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळतो. विवाहबाह्य संबंध तसा तर गुन्हाच आहे. आपण ज्या व्यक्तीसोबत विवाहबंधनात आहोत अशा व्यक्तीला फसवून कुणा तिसऱ्याच व्यक्तीवर केलेलं प्रेम हे पापच नव्हे का? म्हणजे या जोडीदाराची (पती किंवा पत्नीची) काय अवस्था असावी? याचा तर विचारही करवt नाही. तो त्या व्यक्तीवर केलेला अन्याययच होय.

शरण आणि स्वाती ही दोघांवर अमाप प्रेम करतात, इतकं की एकाचा श्वास बंद झाला तर दुसऱ्याचा प्राण जाईल. शरण आणि स्वाती जेव्हा त्यांच्या नात्याबद्दल सांगतात तेव्हा काही क्षणासाठी आपल्याला वाटतं की “वाह, काय प्रेमकहाणी आहे!” पण ज्यावेळी आपण कुसुमच्या मनातील भावना वाचतो, तिचा प्रवास पाहतो तेव्हा काळजाला चटका लागतो. ज्याप्रमाणे राणीमाशीचं मधमाशीच्या जगात वर्चस्व असतं, तसंच शरणच्या मनावर-आयुष्यावर स्वातीचं वर्चस्व आहे. पण या सगळ्यात कुसुमवर झालेला अन्याय हा पहावत नाही. तिची काय चूक? की शरण आणि स्वातीच्या प्रेमकहाणीमुळे कुसुमची मात्र फरफट झाली. या पुस्तकात तुम्हाला नात्यांचे विविध पदर उलगडताना दिसतील जे कधी मन प्रसन्न करतात तर कधी काळजाचा ठाव घेतात. अतिशय नाजुक आणि वेगळ्या विषयावर लेखकाने लिहिलेलं आहे. प्रेमाचा हा तिढा, मानवी भावनांची गुंतागुंत आपल्याला लेखकाने अतिशय मार्मिक व सोप्या भाषेत लिहिलेलं आहे.

त्यामुळे तुम्ही कधी विवाहबाह्य संबंध या विषयावर कधी ललित साहित्य वाचलं नसेल, तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचू शकता.

Leave a Comment