नटसम्राट- वि. वा. शिरवाडकर l Nat Samrat- v. v. Shirwadkar l Marathi Natak Review

पुस्तक नटसम्राटलेखक वि. वा. शिरवाडकर
प्रकाशन पॉप्युलर प्रकाशनसमीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या १२४ मूल्यांकन ५ / ५

“कुणी घर देता का घर?” या एका वाक्याने मराठी रसिकांच्या मनात घर केलंय. अजूनही हे वादळ घोंगावत आहे, तुमच्या आमच्या मनात, हृदयात आणि रंगभूमीवर. असं म्हणतात की नटाची ओळख हे त्याने गाजवलेल्या उत्कृष्ट भूमिकेमुळे निर्माण होते, पण इथे या नटसम्राटाची ओळख केवळ त्याने वठवलेल्या भूमिकेमुळेच नाही तर त्याच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून ही निर्माण झाली. “असा नट पुन्हा होणे नाही” हे वाक्य आपल्या ओठांमधून आपसूक बाहेर येतं जेव्हा आपण वि. वा. शिरवाळकर उर्फ कुसमाग्रज लिखित “नटसम्राट” हे नाटक वाचतो. हे नाटक म्हणजे एका नाटककाराच्या आयुष्याची शोकांतिकाच आहे असं म्हणायला हरकत नाही.

नटसम्राट मी जेव्हा वाचायला हाती घेतलं त्यावेळी फक्त “कुणी घर देता का घर?” हे एकच वाक्य मनात सारखं घुमत होतं, आणि या वादळाची ही शोकांतिका वाचायची होती खरी, पण मन धजावत नव्हतं. हे वादळ अजूनही रसिकांच्या मनात जिवंत आहे आणि ते म्हणजे “अप्पासाहेब उर्फ गणपतराव बेलवलकर” एक नट हा केवळ माणूस नसतो, तर अनेक भूमिका एकाच देहात वठविल्यामुळे तो असामान्य बनतो. अप्पांच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. हॅम्लेटअसो वा ऑथेल्लो, ज्यूलियस सीझर असो वा प्रतापराव वा सुधाकर, अशा कितीतरी भूमिका अप्पांनी वठवल्याही आणि गाजवल्याही. प्रेक्षकांना हा नट अद्भुत वाटला आणि म्हणूनच त्यांना “नटसम्राट” म्हणून गौरवीत करण्यात आलं. रंगभूमीवर त्यांना भरपूर दाद मिळाली, भरभरून सुख मिळालं, समाधान मिळालं, पैसा ही मिळाला आणि या प्रेमापोटीच अप्पांनी त्यांचं जीवन या रंगभूमीसाठी अक्षरशः ओवाळून टाकलं. या रसिकांना हा नटसम्राट कळला, पण जेव्हा त्याने निवृत्ती घेऊन संसार नावाच्या नाटकात पुन्हा नव्याने प्रवेश केला तेव्हा मात्र त्याच्या रक्तामासाच्या रसिकांना तो अखेरपर्यंत कळलाच नाही. कळला असता तर चार माणसात अब्रू जाऊन निंदा नालस्ती होईल असे कठोर शब्द स्वतःच्याच लेकाने काढले नसते.

अप्पांनी या नाटकात प्रवेश केला पण तो एकट्यानेच नव्हे, या वेळी त्यांची सहचारिणी म्हणजेच कावेरीबाई ज्यांना अप्पा सरकार म्हणतात यांनीही ही प्रवेश केला. सत्व आणि स्वत्व जपून, निकडीच्या वेळेत ही त्यांनी अप्पांना साथ दिली, त्यांना सांभाळलं, आणि म्हणूनच निवृत्त झाल्यानतर अप्पा जेव्हा त्यांच्या गळ्यात चंद्रहार घालतात तेव्हा कावेरीबाईंचा उजाळलेला चेहरा आपल्याला आपसूकच दिसतो. अप्पांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेऊन आपली सर्व संपत्ती, अगदी ४० हजारांची भरभक्कम रक्कम ही आपल्या दोन मुलांत म्हणजेच “नंदा आणि नलू” यांच्यात वाटली. भरवसा एवढाच, की आपली दोन्ही कोकरं आपल्याला सुखाने सांभाळतील. अप्पांचं जग आणि त्यांच्या मुलांचं जग हे फार वेगळं होतं, यामुळे अर्थातच तणाव हा होतोच. पण म्हातारपण हे दुसरं बालपण असतं, तर मुलं आपल्या पालकांचे पालक का होऊ शकत नाही? का या पालकांना एवढ्या उतारवयात घर सोडावं लागतं? एकीकडे त्यांच्या म्हातारपणाचा कसा त्रास होतो हे सांगणारे सून आणि मुलगा, आणि दुसरीकडे चोरीचा आळ लावणारी त्यांची मुलगी. ज्या नटाने आजवर कौतुकांचा पाऊस पाहिला, आपल्या रसिकांना थक्क करून त्यांची मने जिंकली अशा या थोर असामीवर जेव्हा असा आरोप होतो तेव्हा तो जिव्हारी तर लागणारच. ज्या बापाने आपल्या मुलांच्या घरी राहून, त्यांच्या मुलांसोबत खेळण्याची स्वप्ने पाहिली ती एका क्षणात विरून गेली. पण अप्पा डगमगले नाहीत, कारण या वादळाला स्वतःशी बांधून ठेवणारं आणि सावरणारं गलबत अजून त्यांच्याजवळ होतं. अर्थातच सरकार! त्यांनी अप्पांची निघुतीने साथ दिली. अप्पांचा जीव त्यांच्या नातीत अडकला होता, आणि म्हणूनच त्यांची सून म्हणजेच शारदा ठमीला (नातीला) अप्पांपासून दूर नेत असताना “आजोबा, आजोबा” असा आक्रोश करते तेव्हा क्षणभरासाठी आपलेही कान सुन्न होतात. सरकारांचं हे जग सोडून जाणं म्हणजे या वादळाचे गलबत कायमचे हरवणे होय. या वादळाला गरज असते एका घराची, एका आधाराची, दयेची आणि म्हणूनच हे वादळ जेव्हा घराची याचना करतं तेव्हा त्या विधात्याला “तु इतका निष्ठुर का झालास?” असा जाब विचारायला ही हे वादळ घाबरलं नाही.

मुलांनी वाऱ्यावर सोडणं, नातीपासून ताटातुट होणं, चोरीचा आळ, सरकारांचा मृत्यू यातून अप्पा आता बेभान होतात, भटकतात. आणि मग त्यांना भेटतो राजा, एक चप्पल पॉलिश करणारा, जो आप्पांना पुन्हा माणसात आणतो. त्यांच्या जगाशी मेळ घालतो, त्यांचं मन हलकं करतो. पण या वादळाचं हे मोकळेपण त्याच्या माणसांना आवडलं कुठे? आले ते न्यायला या वादळाला, या थोर नटसम्राटला पुन्हा एकदा जेरबंद करायला, पण अप्पा आता स्वतंत्र झाले आहेत. त्यांचं गलबत गेलं, त्यांच्या सरकार आधीच देवाच्या रंगभूमीवर गेल्या आणि आता तासांचा हिशेब न ठेवता दिवसांचा हिशेब ठेवून देवाने बनवलेल्या या नाटकाची तिसरी घंटा कधी वाजते? याची अप्पा आता वाट पाहत आहेत. ही शोकांतिका केवळ एका वयस्कर व्यक्तीची नसून, एका असामान्य नटाची आहे, ज्याचं जग फार वेगळं होतं. चाळीस वर्ष तो ज्या जगात वावरला आणि आता त्याला ज्या जगात वावरावं लागेल यात फरक आहे, यात त्यांची ही धांदल उडतेच. पण या बाळपणाला पालकत्व मुलांनीच द्यायचं असतं, हे त्यांच्या ध्यानी आलं नाही. आणि म्हणून या असामान्य नटाची म्हणजेच अप्पासाहेब बेलवलकर उर्फ नटसम्राटाची ही शोकांतिका आपलं काळीज हातात चिरून देते. या नाटकात विठोबा, केळवणकर अशी इतरही पात्र आहेत हे नमूद करणे आवश्यक आहे.

अप्पासाहेबांचं पहिलं भाषण वाचताना आपल्या चेहऱ्यावर निस्सीम हास्य येतं, पण कुसमाग्रज शेवटी मात्र डोळ्यात अश्रु आणून देतात. या नाटकात कुसुमाग्रजांनी अप्पासाहेबांची भूमिका ही अतिशय प्रभाविपणे मांडली आहे. आप्पा हे केवळ नट नसून एक तत्वचिंतक, कवी मनाचे कलंदर व्यक्तिमत्व आहे. त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण हा अतिशय वेगळा आहे, आणि म्हणूनच शून्यातून सुरुवात करायला ही ते धजावत नाहीत. पत्नीचे अमाप प्रेम हाच त्यांचा आधार होता, त्यांच्या शापित आयुष्यातील गोड उ:शाप त्यांची नात “ठमी” ही होती, त्यामुळे त्यांच्या जीवनाला अर्थ होता. पण या दोघीही एक एक करून त्यांच्या आयुष्यातून गेल्या आणि जणू ते पोरकेच झाले. एकेकाळी ज्या नटाने रंगमंच गाजवला, त्याची ही अशी शोकांतिका आपलं काळीज हेलावून टाकते. आणि या साऱ्याची कल्पना आपल्याला हे नाटक वाचताना येते. यातला एक न एक संवाद तुमच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण करेल, आणि शेवटी तुम्हाला रडवेल ही.

या एका असामान्य नटाची ही दुर्दैवी शोकांतिका तुम्हाला या नाटकात वाचायला मिळेल. डॉक्टर श्रीराम लागू यांनी २३ नोव्हेंबर १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई इथे झालेल्या या नाटकाच्या पहिल्या प्रयोगात आप्पांचं काम केलं आहे. हे नाटक “दि गोवा हिंदू असोसिएशन, कला विभाग” यांनी सादर केलेलं होतं. या पुस्तकात तुम्हाला डॉक्टर श्रीराम लागू यांचा लेखही वाचायला मिळेल. तुम्ही जर हे नाटक वाचलं असेल, तर त्याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद!

तुम्ही जर हे नाटक अजून विकत घेतलं नसेल, तर खालील लिंकवर क्लिक करून घेऊ शकता.

Leave a Comment