भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर l Bhagwan Buddha and his Dhamma- Dr B. R. Ambedkar l Historical Book Review

पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मलेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
प्रकाशन मिलिंद प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या ४४७ मूल्यांकन ५ / ५

२० व्या शतकात दलितांना अनेक प्रकारचे अन्याय-अत्याचार सहन करावे लागले. त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यात आलं. शिक्षणाचा, मंदिरात जाण्याचा त्यांना हक्क नाही असं उच्चवर्णीयांचं मत होतं, पण दलितांना पाण्यासाठी महाडमध्ये संघर्ष करावा लागला. दलित समाजासाठी, वंचितांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधारच होते. मनूस्मृतीचे दहन करून त्यांनी समाजात परिवर्तन आणलं, आणि मानवी मूल्यांना जपणाऱ्या बौद्ध धर्माची त्यांनी दीक्षाभूमी नागपूर इथे १४ ऑक्टोबर १९५६ या दिवशी दीक्षा घेतली आणि आपल्या पाच लाख अनुयायांना दिली. अशा या बौद्ध धर्माबद्दल व “गौतम बौद्ध” यांच्याबद्दल सांगणारा हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

या पुस्तकाचा उद्देश आपण आता जाणून घेऊयात

अनेकांमध्ये बौद्ध धर्माबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. बौद्ध आणि नवबौद्ध म्हणजे नेमकं काय? बौद्ध धर्मीय लोक देव का मानत नाहीत? आणि मुख्यतः जर गौतम बुद्ध यांना या धर्माची स्थापनाच करायची होती तर त्यांनी संसाराचा त्याग का केला? या सर्वच प्रश्नांची उत्तरं देण्याचा उद्देश या पुस्तकाचा दिसतो. यासोबत गौतम बुद्ध यांच्या अहिंसा, सत्य, इत्यादी गोष्टींची शिकवण, त्या शिकवणीचा खरा अर्थ अगदी सामान्यांपर्यंत पोहोचावा हा आणखीन एक उद्देश आहे. पुरातन किंवा जुन्या बौद्ध धर्म ग्रंथांमधील चमत्कार व दंतकथांचपेक्षा गौतम बुद्ध यांनी माणसाला माणुसकी शिकवण्याचा संदेश दिला. तो सर्वांपर्यंत पोहोचावा, हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.

आता आपण जाणून घेऊयात या पुस्तकाच्या मांडणीबद्दल

“भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून, गौतम बुद्ध यांचे संपूर्ण जीवनचरित्र सांगणारा विस्तृत असा ग्रंथ आहे. ज्यांना बौद्ध धर्माची माहिती नाही, अशा बहुतेक लोकांना केवळ त्यांचा गृहत्यागच माहित आहे. पण नाण्याला ही दोन बाजू असतात. नाण्याची एक बाजू सर्वांनाच माहित आहे, पण नाण्याची दुसरी बाजू सांगण्याचं काम हे पुस्तक करतं. या पुस्तकाचे विभाजन एकूण आठ खंडात केलेले आहे.

त्यातल्या पहिल्या खंडात आपल्याला गौतम बुद्ध यांच्या जीवनाबद्दल माहिती मिळते. त्यांचा जन्म, त्यांचे कुळ, त्यांच्या मातेचा मृत्यू, विवाह, त्यांच्या पुत्राचा जन्म, शाक्य संघासोबतचा त्यांचा संघर्ष व त्यातूनच त्यांनी केलेला गृहत्याग याची माहिती मिळते. या खंडात एकूण सहा भाग आहेत. ज्यातून बौद्ध धर्म किंवा धम्म याची निर्मिती कशी झाली? व त्यांचा शोध त्यांनी कसा घेतला याची माहिती मिळते. दुसऱ्या खंडात एकूण आठ भाग आहेत. यामध्ये गौतम बुद्ध यांनी सुरू केलेला धर्मउपदेश, त्यांची प्रवचने, धम्मदीक्षा, विविध स्तर किंवा कुळ/ वर्ण असलेल्या लोकांना दिलेली धम्मदीक्षा याचीही माहिती मिळते. तिसऱ्या खंडात एकूण पाच भाग आहेत. यामाध्ये गौतम बुद्ध यांचे धम्मामधील असलेले स्थान व त्यांची शिकवण याची माहिती मिळते. चौथ्या खंडात एकूण चार भाग आहे, ज्यामध्ये त्यांनी धर्म आणि धम्माबद्दल आपल्याला काय सांगितलं आहे? बौद्ध जीवनमार्ग म्हणजे नेमकं काय? याची माहिती भेटते. यासोबतच प्रवचनाची ही माहिती यात मिळते. पाचव्या खंडात एकूण पाच भाग आहेत, ज्यात संघ, भिक्खु आणि उपासक यांची कर्तव्ये व नियमांबद्दल सांगितले आहे. सहाव्या खंडातील ४ भागांमध्ये तथागतांचे समकालीन म्हणजेच टीकाकार व त्यांचे चाहते याची माहिती दिलेली आहे. सातव्या खंडात एकूण तीन भाग आहे, ज्यामध्ये त्यांनी घेतलेली आप्तस्वकीयांची भेट व त्यांचे महापरिनिर्वाण याची माहिती भेटते. आठव्या खंडात ही एकूण तीन भाग आहे, ज्यामध्ये त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचा स्वभाव, राहणीमान, आवडी-निवडी इत्यादींची ही माहिती मिळते. हे केवळ गौतम बुद्ध यांचे जीवनचरित्र नसून, अहिंसेच्या मार्गावर नेणाऱ्या व माणसाला माणुसकी शिकवणाऱ्या धम्माची रुजवणूक तथागतांनी कशी केली, याची माहिती मिळते.

आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात या पुस्तकाच्या वैशिष्ट्याबद्दल:-

पहिलं वैशिष्ट्य म्हणजे भाषाशैली. या पुस्तकाची भाषाशैली ही अत्यंत सोपी आहे. त्यामुळे सामान्य वाचकांपर्यंत गौतम बुद्ध यांचे विचार सहज पोहोचू शकतात. हा धम्म, त्यातील तत्व, तथागतांची शिकवण, त्यांनी दाखवलेला मार्ग यावर चालू शकता. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे गौतम बुद्ध यांच्या धम्माचे विवेचन करताना त्यांनी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा, चमत्कार-नमस्कार, अशा गोष्टींना महत्व न देता बुद्ध यांच्या धम्माचे, त्यांच्या विचारांचे तार्किक विवेचन यात केलेले दिसते. यासोबतच या पुस्तकात आपल्याला मानवतावादी मूल्यांवर विशेष भर दिला आहे याची माहिती मिळते.

या पुस्तकाचे आणखीन एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यामध्ये आपल्याला सामाजिक समतेचं महत्व सांगितलं आहे, समाजातील कोणतीही जात-धर्म असो, सर्वांशी समानतेने वागावे व कोणतीही विषमता समाजात नसावी हा तथागतांचा उपदेश या पुस्तकातून आपल्याला कळतो. याशिवाय यामध्ये बौद्ध धर्माची काही तत्वे जसे की अष्टांग मार्ग याबद्दल विस्तृत माहिती मिळते. या पुस्तकात गौतम बुद्दांच्या प्रवचनाची ही माहिती भेटते ज्यातून त्यांचे धार्मिक आणि सामाजिक विचार कळतात, त्यांनी माणसाला अहिंसेचा जो उपदेश दिला आहे त्याची ही यात माहिती भेटते, हे तर झालं या पुस्तकाचं तात्विक आणि धार्मिक वैशिष्ट्य. पण हे पुस्तक इतिहासाच्या दृष्टीतून ही तितकंच महत्वाचं आहे. कारण यात आपल्याला गौतम बुद्ध यांचे समकालीन राजे, सम्राट यांची माहिती भेटते, त्यांनी विविध ठिकाणी प्रवास केला ज्या ठिकाणांना अजूनही ऐतिहासिक महत्व आहे. यावरूनही इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक विश्वसनीय साधनाचा आणि माहितीचा स्त्रोत हाती लागतो. केवळ भाषा सोप्पी नाही, तर ती तितकी प्रभावी ही आहे. तथागत प्रत्यक्ष आपल्या समोर असल्याचा, आपल्याला उपदेश देण्याचा भास वाचताना होतो.

तर हे पुस्तक का वाचावे? आणि कुणी वाचावे?

तर बौद्ध धर्म हा केवळ “नास्तिकता” किंवा “दलितांचा धर्म” असं म्हणून त्याचा अपमान केला जायचा, आणि आजही तो काही प्रमाणात केला जातो. गौतम बुद्ध यांच्या गृहत्यागावर सध्य स्थितीतील लोक टीका ही करतात पण बौद्ध धम्म हा केवळ “नास्तिकता” किंवा “दलित वर्ग” यांच्या पुरताच मर्यादित आहे का? जर नाही, तर मग बौद्ध धम्म म्हणजे नेमकं काय? तथागतांचे धार्मिक व सामाजिक विचार काय होते? या सगळ्याबद्दल साध्या-सोप्या भाषेत ज्यांना जाणून घ्यायचं असेल त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.

धन्यवाद!

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता.

Leave a Comment