| पुस्तक | पावर ऑफ प्रेयर | लेखक | जोसेफ मर्फी |
| प्रकाशन | फिंगरप्रिंट पब्लिकेशन | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | ११२ | मूल्यांकन | ४ / ५ |
माणूस आयुष्यात एकदा तरी देवाची ताकद अनुभवतोच, आणि हे वैश्विक सत्य आहे. जगात आस्तिक आणि नास्तिक अशी दोन प्रकारची माणसं आहेत. आस्तिक लोकं अध्यात्माला मानतात, तर नास्तिक लोक विज्ञानाला. अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीही वेगळ्या संकल्पना आहेत. आध्यात्मिक कथांमधील काही भाकड कथा सोडल्या, तर अध्यात्म माणसाला आतून बाहेरून बदलून ताकतं. पण तरीही ही एक प्रश्न पडतो की आत्ताच्या आध्यात्मिक जगात खरंच अध्यात्माला महत्व आहे का? देव आहे की ती एक केवळ संकल्पना आहे? आणि असं असेल तर माणसाच्या आयुष्यात तरीही प्रार्थना एवढी महत्वाची का आहे? या सगळ्याबद्दल जोसेफ मर्फी आपल्याला त्यांच्या पॉवर ऑफ प्रेयर या पुस्तकात सांगतात.
जोसेफ मर्फी हे एक असे लेखक आहेत, ज्यांनी अध्यात्म आणि विज्ञान यांची उत्तम सांगड या पुस्तकात घातलेली आहे. त्यांनी अवचेतन मनाच्या शक्तीवर ही आपल्याला सांगितलं आहे, आणि त्याबद्दल ते प्रसिद्ध ही आहेतच. या पुस्तकात त्यांनी प्रामुख्याने प्रार्थनेद्वारे तुम्ही तुमचं आयुष्य कसं बदलू शकता? प्रार्थनेचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम कसा होतो? आणि तुम्ही प्रार्थना करताना नेमकं काय करायला पाहिजे व ती कशी केली पाहिजे? याबद्दल विस्तृतपणे सांगितलं आहे.
हे पुस्तक वाचल्यानंतर माझे देवाबद्दलचे विचार आणखीन सकारात्मक झाले. या पुस्तकात लेखकाने बायबल हा पवित्र ग्रंथाचे काही संदर्भ दिलेले आहेत, ज्याचा उपयोग ही आपल्याला होतो. या पुस्तकामुळे एक गोष्ट कळली की प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला देवासमोरच उभं राहिलं पाहिजे असं नाही तर, देव हा तुमच्या अंतरात आहे, तो तुमच्या हृदयात आहे त्यामुळेच तुम्ही मनापासून केलेली प्रार्थना ही देवपर्यंत नक्की पोहोचते. या पुस्तकातून आपल्याला लेखक आपल्या अवचेतन मनाची शक्ती काय ते सांगतात, त्यांच्या मते आपले अवचेतन आपण जे काही विचार करतो, ते सत्य मानतो आणि तसेच वागतो. त्यांनी या पुस्तकात आकर्षणाचा नियम ही याबद्दलच आहे असं सांगितलं आहे, की जसा आपण विचार करतो तशाच गोष्टी आपण आकर्षित करतो. यामुळेच प्रार्थना केल्याने माणूस सकारात्मक विचार करतो, ज्यावेळीस आपण श्रद्धेने ती प्रार्थना करतो ती आपल्या अवचेतन मनापर्यंत पोहोचते आणि आपण आपोआपच सकारात्मक विचार करायला लागतो. यासोबच प्रार्थना करताना मनात कोणत्याही शंका कुशंका न आणता, पूर्ण विश्वासाने प्रार्थना करावी कारण पूर्ण विश्वासाने केलेली प्रार्थना आपल्याला नक्कीच योग्य ते फळ देते असे लेखकाचे मत आहे. अवचेतन मनावर प्रभाव टाकण्यासाठी लेखक आपल्याला पूढील गोष्ट सांगतात; “तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, ती मिळाली आहे” अशी मनात कल्पना करा, याच्या प्रभाव आपल्या अवचेतन मनावर सकारात्मक प्रभाव पडतो. अवचेतन मनाबद्दल लेखक आपल्याला सांगतात की, रात्री झोपण्याच्या वेळेस आपले अवचेतन मन हे अतिशय सक्रिय असते त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी केलेली प्रार्थना ही तुम्हाला उपयोगी पडेल. प्रार्थनेचा ते एक फायदा ही आपल्याला सांगतात की यामुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य यामुळे चांगलं राहतं, मनातील तणाव कमी होतो कारण प्रार्थना तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देते. या आणि अशा कित्येक गोष्टी आपल्याला या पुस्तकातून शिकायला भेटतात.
आता आपण जाणून घेऊयात या पुस्तकाच्या वैशिष्ट्याबद्दल:-
१ ] अवचेतन मनाच्या शक्तीला महत्व:-
जोसेफ मर्फी यांनी आपल्या या पुस्तकात प्रार्थनेचे महत्व तर सांगितलं आहेच, पण यासोबच प्रार्थना तुमच्या अवचेतन मनावर कसा परिणाम करते याबद्दल तर त्यांनी सांगितलं आहेच. लेखकाच्या मते तुमचे विचारच तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतात, तुमचे अवचेतन मन हे तुम्ही झोपेत असताना ही काम करते. त्यामुळेच तुम्ही प्रार्थनेद्वारे तुमच्या अवचेतन मनाची शक्ती कशी वाढवाल याबद्दल लेखक आपल्याला सांगतात.
२] विज्ञान आणि अध्यात्माची सांगड:-
मला हे पुस्तक या कारणासाठी खास आवडतं. आपण नेहमी असं म्हणतो की विज्ञान आणि अध्यात्म कधीच एक होऊ शकत नाही, कारण या दोन वेगवेगळ्या शाखा आहेत. त्यामुळे आपण काहीवेळा आस्तिक तर काहीवेळा नास्तिक दृष्टिकोनातून विचार करतो. इथेच लेखक आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट शिकवतात. मेंदू, त्याच्यामधील होणारी प्रक्रिया ही वैज्ञानिक आहे आणि देवाची प्रार्थना म्हणजे अध्यात्म. तुमच्या अध्यात्माचा तुमच्या मेंदूवर होणारा परिणाम म्हणजेच विज्ञान आणि अध्यात्म एक होणं हे लेखक आपल्याला सांगतात. एकूणच, लेखकाने केवळ अध्यात्मालाच नव्हे तर विज्ञानाला ही महत्व दिलेलं आहे.
३] बायबल ग्रंथामधील संदर्भ:-
मी हे पुस्तक वाचताना नेहमी हा विचार केला की यामध्ये सुरुवात कशी असेल? म्हणजे प्रार्थना म्हणा किंवा काय? थेट प्रार्थनेचे फायदे सांगितले आहेत की काय? असे अनेक प्रश्न पडले होते. कारण प्रार्थना ही अध्यात्मामधील महत्वाची गोष्ट आहे, आणि याचं महत्व आणि त्याची ताकद सांगण्यासाठी, समजावण्यासाठी लेखकाने बायबल या पवित्र ग्रंथामधील संदर्भ वेळोवेळी दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला या पुस्तकातून अध्यात्माचा पाश्चिमात्य दृष्टिकोण समजतो.
४] पुस्तकाची भाषाशैली:-
जोसेफ मर्फी यांची पुस्तकं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जातात, त्यांच्या पुस्तकात अवचेतन मनाच्या शक्तीवरच प्रामुख्याने भर दिलेला दिसतो. पुस्तकाची भाषाशैली ही मध्यम स्वरूपाची आहे, जो नवीन वाचक आहे त्याच्यासाठी ती अवघड ही असू शकते. पण त्यांनी सांगितलेले प्रत्येक संदेश हे प्रत्येकासाठी लागू होतात, जरी भाषाशैली मध्यम असली तरीही ती वाचकांना समजेल अशीच आहे.
५] प्रत्यक्ष करता येतील असे उपाय:-
या पुस्तकाचं हे एक खास वैशिष्ट्य आहे. प्रार्थनेचे महत्व लेखकाने अनोख्या पद्धतीने सांगितले आहेच. यासोबतच लेखकाने प्रार्थना कशी करावी? अफरमेशन कसे करावे? झोपण्यापूर्वीची प्रार्थना कशी करावी? आयुष्यात सकारात्मक राहण्यासाठी प्रार्थनेचा वापर कसा करावा? अवचेतन मनाची शक्ती वाढवण्यासाठी प्रार्थनेचा उपयोग कसा कराल? या आणि अशा कित्येक गोष्टींबद्दल लेखक आपल्याला सांगतात, आणि या गोष्टी साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष करता येतील असेच उपाय ते आपल्याला सांगतात. यामुळे वाचक जे काही शिकतात, ते प्रत्यक्षपणे अवलंबून आपलं आयुष्य बदलून टाकू शकतात.
जोसेफ मर्फी यांचं लेखन हे विज्ञान आणि अध्यात्म यांना समान मानणारं, या दोन्ही शाखांना समांतर न मानता सारखं मानून त्याद्वारे वाचक आपल्या समस्या कशा सोडवेल याकडे लक्ष देणारं आहे. काही गोष्टी अवघड तर काही सोप्या वाटतील, पण प्रार्थनेची ताकद समजून घेण्यासाठी जोसेफ मर्फी यांचं हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.
धन्यवाद!
जर तुम्ही हे पुस्तक वाचलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून घेऊ शकता.