| पुस्तक | छावा | लेखक | शिवाजी सावंत |
| प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | ११२ | मूल्यांकन | ५/ ५ |
ऐतिहासिक इतिहासलेखन करणं म्हणजे सोपं काम नाहीये, ते एक दिव्यच असतं. ऐतिहासिक तथ्यांना धक्का लागू न देता, तरीही मनोरंजक इतिहासलेखन करून वाचकांना खिळवावं असं लेखन करणारे लेखक फार कमी आहेत. रणजित देसाई, विश्वास पाटील, ना. स. इनामदार, यांच्यासारख्या ऐतिहासिक साहित्य लिहिणाऱ्यांच्या रांगेत आदराने ज्यांचंही नाव घेतलं जातं ते म्हणजे शिवाजी सावंत होय. युगंधर असो वा मृत्युंजय; या पौराणिक कादंबऱ्यांनी वाचकांचं लक्ष तर वेधलं गेलंच पण हल्लीच छावा चित्रपटामुळे त्यांना पुन्हा एकदा सुप्रसिद्धी मिळाली; आणि त्यांचं लेखन चित्रपटाच्या माध्यमातून पाहता येण्यासारखी दुसरी पर्वणी ती कोणती? शिवाजी सावंत यांनी छावा ही कादंबरी जितक्या आत्मियतेने लिहिली, तितक्याच आत्मियतेने त्यांनी या कादंबरीवर आधारित “छावा” हे तीन अंकी नाटक लिहिले आहे. ज्याला आपण संभाजी महाराजांच्या आयुष्याची थोडक्यात माहिती सांगणारे नाटक म्हणू शकतो.
संभाजी महाराजांवर चित्रपट निघाले, मराठीमध्ये त्यांच्या आयुष्यावर आधारित मालिका ही निघाली. पण प्रेक्षकांना प्रत्यक्षात संभाजी महाराजांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, त्यांचं स्वराज्यातील योगदान पाहायचं असेल तर नाटक हा उत्तम पर्याय आहे. कादंबरीमध्ये तुम्ही त्यांचा पराक्रम वाचता, पण कलाकारांच्या माध्यमातून त्याची ही छटा पाहायला मिळते. “छावा” या तीन अंकी नाटकाबद्दल आपण जाणून घेऊयात छावा या कादंबरीबद्दल. शिवाजी सावंत यांची “छावा” ही कादंबरी १६७९ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाली. छावा ही कादंबरी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर लिहिलेली उत्कृष्ट अशी कादंबरी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्यांना मनोरंजक किंवा सोप्प्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर छावा ही कादंबरी उत्तमच आहे. याच कादंबरीचं संक्षिप्त स्वरूप म्हणजे “छावा” तीन अंकी नाटक होय. या नाटकात एकूण तीन अंक आहेत. पहिल्या अंकात तीन, दुसऱ्या अंकात ही तीन आणि तिसऱ्या अंकात दोन प्रवेश लिहिलेले आहेत. यामध्ये सुरुवातीचे संवाद हे इतर लोकांचे आहेत, त्यातील एका व्यक्तीने शंभू राजांवर सहन होणार नाहीत, असे आरोप केलेले आहेत; आणि दुसरी व्यक्ती याला कडाडून विरोध करते. शंभू राजांवर चरित्रहीन असल्याचा, कुलघातकी असल्याचा व व्यसनी असल्याचा, आपल्याच द्वितीय मातोश्री सोयराबाई यांना भिंतीत चिनून ठार केल्याचा, आणि दौलतीसाठी जे इमानी होते (पण प्रत्यक्षात मात्र बंडखोर होते) अशा माणसांना ठार केल्याचे; असे एक न अनेक आरोप त्यांच्यावर केले. खरे शंभूराजे कुणाला कळलेच नाही! ज्यांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अहोरात्र स्वराज्यासाठी तलवारीसोबत संसार केला, वयाच्या नवव्या वर्षी मिर्झाराजे जायसिंगच्या गोटात राहून स्वराज्यहिताचे संरक्षण केले, आग्र्याहून सुटका असो ते आपल्याच लोकांमुळे आलेली कैद असो; शंभूराजांवर तर जन्मापासूनच नियतीने अन्यायच केलेले आहेत याची जाणीव या नाटकातून होते. हे प्रसंग अगदी हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहतात. छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं संक्षिप्त चरित्रच शिवाजी सावंत यांनी लिहिलं असं म्हणयला काही हरकत नाही. गादीसाठी सत्तासंघर्ष असो, किंवा आप्तस्वकीयांमुळे झालेली कैद असो, या सर्वच प्रसंगांचं वर्णन या नाटकात केलेलं आहे. आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर शंभूराजांना खऱ्या अर्थाने पोरकेपण आले, आणि त्याचाच फायदा इतरांनी घेतला. यातला एक अन एक प्रसंग संभाजी महाराजांवर झालेल्या अन्यायाची जाणीव आपल्याला करून देतो. त्यांचे दु:ख, त्यांना झालेल्या यातना, त्यांना झालेला मनस्ताप याची तर आपण कल्पना ही करू शकत नाही. त्यांना गादीचा मोह नव्हता, पण तरीही ते छत्रपती झाले याचं एकमेव कारण म्हणजे रयतेला त्यांच्यासारख्या राजाची गरज होती. आपल्या लोकांशी झालेलं द्वंद्व हे रयतेच्या हिताचं होतं, हे ही या नाटकातून आपल्याला कळतं.
आता आपण जाणून घेऊयात या नाटकाची वैशिष्ट्ये:-
या नाटकाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे याचं कथानक होय. छावा हे एक ऐतिहासिक नाटक आहे. या नाटकात तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम, त्यांचा स्वभाव, त्यांची बुद्धी आणि चातुर्यता, त्यांचा न्यायी स्वभाव, आपल्या कुटुंबाप्रती त्यांच्या मनात असलेला भावनेचा कोनाडा, रयतेप्रति आपुलकी अशा कित्येक गोष्टी आपल्याला कळतात. असं म्हणतात की इतिहासाने संभाजी महाराजांवर अन्याय केला आहे, त्यांना कायमच बदनाम केलेलं आहे ज्याबद्दल आपण सुरुवातीलाच बोललो आहोतच. पण याच गोष्टीवर लेखकाने आपल्या लेखणीने मात करून संभाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न या नाटकाच्या कथानकामधून केलेला आहे.
या नाटकाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाचा संवाद होय. जसं मी आधीच सांगितलं की हे एक ऐतिहासिक नाटक आहे, त्यामुळे अशा विषयाबद्दल लिहिताना लेखकाला भान राखावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज ही कित्येकांची प्रेरणा आहेत. त्यामुळेच त्यांचे संवाद लिहिताना, किंवा त्यांच्या परिवाराचे, कारभाऱ्यांचे संवाद लिहिताना त्यात कोणताही वावगा शब्द न आणता, ते संवाद अत्यंत प्रभावी आणि वाचकाच्या समोर ते प्रसंग घडत आहेत असा आभास निर्माण करणारे असायला हवे. आणि हे नाटक वाचताना प्रत्येक पात्राच्या संवादाचा प्रभाव आपल्यावर पडतोच, पण त्यातली भावना आणि ओजस्वीपणा याची ही आपल्याला जाणीव होते.
या नाटकाचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे या नाटकातील प्रत्येक अंक होय. जेव्हा आपण कादंबरी वाचतो तेव्हा घटना समजायला वेळ लागतो, कारण ती कादंबरी रंगमंचावर सादर करायची नसते. पण हे नाटक रंगमंचावर सादर करायचे असेल, तर थोडक्या शब्दात, कमी वेळात सर्वच गोष्टी सांगाव्या लागतात. छावा या कादंबरीचेच एक छोटेसे स्वरूप म्हणजे हे नाटक आहे, ज्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याची माहिती थोडक्यात मिळते. पहिल्या अंकात आपल्याला कथानकाची सुरुवात, पात्रांची ओळख, यासोबतच परिस्थितीची माहिती मिळते. संघर्षाची ठिणगी कशी पेटते, यातच घडणाऱ्या राजकीय घडामोडी, कट-कारस्थाने आणि त्यामुळे झालेल्या गुंतागुंतीची माहिती आपल्याला दुसऱ्या अंकात भेटते. संघर्षाचा कळस गाठून, या नाटकाचा दुर्दैवी शेवट आपल्याला तिसऱ्या अंकात पाहायला मिळतो.
या नाटकाचा मुख्य उद्देश छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती देणे, कसं त्यांच्याच आपल्या माणसांनी सत्ता संघर्ष करून त्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण केलं, ज्यांना त्यांनी आपलं म्हणून जवळ केलं त्याच आप्तस्वकीयांनी क्षुल्लक वतनासाठी क्षत्रूशी हातमिळवणी करून संभाजी महाराजांना कैद केले, आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाचे अत्याचार सहन केले आणि अखेर त्यांची निष्ठुरपणे हत्या केली. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे धैर्य आणि शौर्य, सोयरा मातोश्री, हंबीर मामा आणि राजाराम राजे यांच्यावर असलेली माया, महाराणी येसुबाई यांच्यावर असलेलं प्रेम, रयतेप्रति जिव्हाळा आणि कवी कलश यांच्याशी असलेली अतूट मैत्री आपल्याला या तीन अंकी नाटकातून पाहायला मिळते. अवघ्या १०६ पानांमध्ये शिवाजी सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा आपल्यासमोर मांडली आहे आणि त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
तुम्हाला ही जर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचं असेल, तर हे नाटक तुम्ही नक्की वाचा. धन्यवाद!
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे नाटक विकत घेऊ शकता.