पाषाण- बाबा कदम l Pashan- Baba Kadam l Marathi Novel Review

पुस्तक पाषाणलेखक बाबा कदम
प्रकाशन दिलीपराज प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या १०८ मूल्यांकन ५ / ५

“पाषाण” म्हणजेच दगड. काळाकभिन्न, कठोर, मजबूत, पण विद्रूप आणि भावनाशून्य. त्याच पाषाणाला आकार दिला तर देवाची मूर्ती ही बनू शकते, आणि वृत्ती वाईट असेल तर तोच पाषाण कोणाच्या तरी मृत्यूचं कारण ही बनू शकतो. आणि अशाच भावनाशून्य आणि निर्दयी वृत्तीच्या माणसाने केलेल्या महाभयान पापाचं वर्णन करणारी ही कादंबरी म्हणजेच “पाषाण” ही कादंबरी मी जेव्हा वाचायला घेतली तेव्हा पहिला प्रश्न पडला तो या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा. एकीकडे कठोर दिसणारा माणूस, दुसरीकडे छोटे मोठे दगड, आणि तिसरीकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं एक मानवी मुंडकं. आश्चर्याची गोष्ट ही की पहिल्या दोन गोष्टींवर आपलं सहज लक्ष जातं आणि तिसऱ्या गोष्टीकडे लक्ष जायला तुम्हाला या कादंबरीला पूर्ण वाचावं लागेल. या कादंबरीविषयी जाणून घेण्यापूर्वी आपण लेखकाबद्दल ही थोडक्यात जाणून घेऊयात.

बाबा कदम हे एक प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार आहेत. त्यांनी डोंगराची मैना, बुमरॅंग भाग १ आणि बुमरॅंग भाग २, श्वेतगिरी, राही अशी कितीतरी पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी सुमारे ८० च्या आसपास कादंबऱ्या लिहिल्या आहेत. समाजातील वेगवेगळे प्रश्न एका वेगळ्याच पद्धतीने त्यांनी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून मांडले. आणि असाच एक प्रश्न जो मानवजातीच्या लालसेमुळे निर्माण झाला आणि त्यात कितीतरी नाहक बळी गेले; तो प्रश्न म्हणजे “नरबळी” होय. नरबळी हा साधारणपणे देवाला खुश ठेवण्यासाठी किंवा आपल्याला काही तरी हवंय हे मिळवण्यासाठी ज्यात माणसाचा बळी दिला जातो. आपण २१ व्या शतकात जगत असूनही आपल्या अवतीभोवती या घटना सर्रास होतात, कितीतरी निष्पाप लोकांचे यात प्राण जातात आणि असाच एक निष्पाप जीव या प्रथेचा शिकार कसा होतो याची माहिती आपल्याला या कादंबरीमध्ये मिळते.

या कादंबरीमधील मुख्य नायक आहे “बापूसाहेब” ज्याची ओळख तो बाप्या म्हणून सांगतो. ढालगावचे दगडूतात्या “बजरंगबली हॉटेल” सुरू करतात, पण दुर्दैवाने दुष्काळाने त्यांचं दिवाळं निघतं, अशातच बापूसाहेब त्यांच्याकडे नोकरीसाठी याचना करतात. बापूसाहेब येलुरमधल्या चाउलग्याचे असतात, ते अनाथ असतात, चौदा-पंधरा वर्षाचे होते जेव्हा ते दगडूतात्यांना भेटले. दगडूतात्यांनी ज्याला अपशकुणी मानलं, त्याच्या आगमनानंतर गावातील दुष्काळाचं सावट दूर होतं. दगडूतात्यांना मुलबाळ नसतं आणि बापुसाहेबांना आईवडील, अशी ही गाठ नशिबाने बांधलेली असते. दगडूतात्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं हॉटेल बापूसाहेब चालवू लागतात, मग लक्ष्मी नावाच्या मुलीसोबत त्यांचं लग्न होतं, ते नावारूपाला येतात, प्रसिद्धी पावतात, हॉटेल चांगलं चालू लागतं, आठ एकर जमिनीचे ते मालक होतात, चांगला बंगला बांधतात, सरपंच होतात, त्यांना मुलगाही होतो. सगळं अगदी सुरळीत. खरंतर ज्याच्या नशिबी यश असतं त्याच्यावर जळणारे खूप असतात, मग आपलं ही मन इर्षेने पेट घेतं आणि साध्य न होणाऱ्या गोष्टींसाठी ही ते धडपड करतं. कारण एकच, स्वतःच्या अहंकाराला खुश ठेवणे. नेमकं बापूसाहेब हेच करतात, आणि जमिनीतील विहिरीला पाणी येण्यासाठी अंधश्रद्धेचा मार्ग वापरतात. बापूसाहेब आपल्याला सुरुवातीला नायक वाटतील कारण त्यांनी तेवढी चांगली कामं ही केली, पण त्यांचा बाहेरख्यालीपणा जेव्हा आपण वाचतो त्या क्षणापासून आपल्याला त्यांचा राग येतो. हा राग कधी मावळतो तर कधी उफाळतो, आणि मला वाटतं आपल्या भावनांची ही घालमेल लेखकाने ज्या प्रकारे या पात्राची रचना केली आहे त्यामुळेच होत असावी. या कादंबरीमध्ये इतरही पात्र आहेत जसे की इनामदारसाहेब, लक्ष्मीबाई, हौसाकाकू, यशोदा, सोमा, कृष्णा, पिरा, सुदाम, इन्स्पेक्टर सेन, फौजदार शिर्के, इत्यादी. या सर्व पात्रांचं आपापल्या ठिकाणी महत्त्व आहे. या कादंबरीचा मुख्य गाभा हा अंधश्रद्धा आहे हे तर आपल्याला कळलं असेलच.

तर आता आपण जाणून घेऊयात या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये:-

मला ही कादंबरी आवडली कारण ही एक सस्पेन्स निर्माण करणारी कादंबरी आहे. यामध्ये रहस्या मागे रहस्य आहे, आणि त्यामुळेच आपल्याला खूप उत्सुकता निर्माण होते. या कादंबरीत आपण अक्षरशः स्वतःला गुंतून टाकतो. या मध्ये काही अनपेक्षित गोष्टी ही घडतात ज्यामुळे वाचक अवाक होऊन जातो. बापूसाहेब मुख्य पात्र आहेत, सुरुवातीला नायक बनतात पण अचानक त्यांचा खोटेपणाचा मुखवटा गळून पडतो; या सर्व गोष्टी वाचताना आपल्याला आश्चर्य वाटतं. या सोबतच बाबा कदम यांनी या पुस्तकात वातावरणनिर्मिती वर ही भर दिलेला दिसतो. विहीर, जमीन, घर, पेठ याची चित्रे आपोआप आपल्या डोळ्यासमोर येतात. बापुसहबे कसे दिसत असतील, लक्ष्मीबाईंचा चेहरा कसा असेल याची कल्पना आपण आपसूकच करतो कारण हा वातावरणनिर्मितीचा प्रभाव आहे. मला ही कादंबरी वाचण्यापूर्वी एक प्रश्न पडला की या कादंबरीचं नाव “पाषाण” का आहे? आणि ही वाचत असताना या शब्दाचा उल्लेख ही फारसा आढळत नाही, पण कादंबरीचा शेवट होतो तेव्हा त्याचं नाव “पाषाण” का आहे याचा अर्थ आपल्याला उमगतो. ही कादंबरी अगदी छोटी म्हणजे १०८ पानांची आहे. एवढ्या छोट्या कादंबरीतून आपल्याला मानवी आयुष्याचा, त्याच्या प्रवृत्तीचा अर्थ कळतो.

भारतात विविध जातीधर्म आहेत, पण आपण कोणीच मृत शरीराची विटंबना करत नाही. त्याचे अंतिम विधी आपापल्या जाती-धर्मा नुसार करून त्या मृत शरीराप्रती ही आपण आदर प्रदर्शित करतो. कारण आपण त्या शरीरात असलेल्या दैवी अशांचा आदर करतो. पृथ्वीवरच्या कुठल्याही प्राण्याला जात-धर्म नाही तरी ते पशू-प्राणी मेलेल्या जीवाची विल्हेवाट ही आदरपूर्वकच लावतात. हा झाला मानवी वृत्तीचा एक पैलू. जिथे काहीजण मेलेल्या व्यक्तीच्या शरीराचाही आदर करतात, त्याच समाजात हिंसक वृत्तीची अशी ही काही माणसं आहेत जी अगदी जिवंत माणसाची अवहेलना आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून करतात. त्यासाठी एका निष्पाप माणसाचा बळी द्यायला ही त्यांचं मन धजावत नाही आणि म्हणूनच अशा व्यक्तींना आपण पाषाणहृदयी म्हणतो.

शेवटी मला एवढंच सांगायला आवडेल की बापूसाहेब हे पात्र तुम्हाला सुरुवातीला आवडेल, अगदी त्याच्यावर दया ही येईल पण कथानक जसं पुढं जातं तसं तुमच्या मनात त्याच्याविषयी तिरस्कार निर्माण होईल. ज्या माणसाने कष्ट करून नाव कमावलं तिच व्यक्ती अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन पाषाणासारखी भावनाशून्य कशी बनते; हे आपल्याला या कादंबरीतून कळतं. कादंबरी चोटी आणि वाचायला ही सोपी आहे. त्यामुळे तुम्ही जर बाबा कदम यांचं साहित्य पहिल्यांदाच वाचत असाल तर ही कादंबरी आवर्जून वाचा.

धन्यवाद!

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता!

Leave a Comment