| पुस्तक | प्रीतीचा शोध | लेखक | वि. स. खांडेकर |
| प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | ९५ | मूल्यांकन | ५ / ५ |
मराठी साहित्यक्षेत्रात व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, रणजित देसाई, इत्यादी यांच्या जोडीने ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं ते म्हणजे वि. स. खांडेकर होय. “ययाती” “अमृतवेल” “सुखाचा शोध” “हिरवा चाफा” अशी अजरामर साहित्य रचना ज्यांनी मराठी वाचक वर्गाला प्रदान केली, त्यांच्याच खजिन्यातील एक अनमोल रत्न म्हणजे “प्रीतीचा शोध” हा कथासंग्रह होय.
प्रेम किंवा प्रिती, किती सुंदर वाटतात न हे शब्द! नात्याला मायेचा स्पर्श, आणि आपुलकीचा मार्दव असणारी प्रिती! प्रत्येकालाच प्रिती किंवा प्रेम म्हटलं की डोळ्यासमोर येते ते म्हणजे “स्त्री-पुरुष” होय. खरंच, आपण प्रेमाची व्याख्याच अशी बनवली आहे की “प्रेम म्हणजे नर आणि नारी यांच्यातील शारीरिक आणि मानसिक जवळीक” पण आपण कधी या पलीकडे जाऊन विचार केला आहे का? पण वि. स. खांडेकरांनी प्रेमाची, प्रीतीची व्याख्याच बदलली आहे. “प्रीतीचा शोध” या कथासंग्रहात एकूण ९ कथा आहेत. यातही एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळी १९५२ ला हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला, त्यावेळी त्यात एकूण १८ कथांचा समावेश होता. पण नंतर वाचकांच्या सोयीसाठी “कवि” आणि “प्रीतीचा शोध” असे दोन भाग याचे करण्यात आले.
“प्रीतीचा शोध” या कथासंग्रहाचा मुख्य विषय आहे “प्रेमाचा शोध” जसं मी आत्ताच सांगितलं की वि. स. खांडेकरांनी प्रेमाची व्याख्याच यात बदलली आहे. इतर माणसांना प्रेमासारखी गोष्ट ही “नर-नारी” इथपर्यंतच मर्यादित आहे. पण वि. सं. नी मात्र प्रेमाची एक वेगळीच आणि अनोखी व्याख्या आपल्यापुढे मांडली आहे, ज्यात प्रेम हे मानवी मर्यादांच्या ही पलीकडचे आहे. प्रेम हे आपल्याला कधी हरवतं तर कधी जिंकवतं, कधी आपण त्यात स्वप्नाचे इमले बांधतो, तर प्रेमभंग होताच तो डोलारा ही कोसळतो. आणि हीच गोष्ट या कथासंग्रहातील कथांमध्ये असलेली आपल्याला दिसते. आपल्याला हवी असणारी व्यक्ती, वस्तु, वास्तु, स्वप्न आपल्याला मिळणं म्हणजे स्वर्गच असतो; पण तो नाही मिळाला की आयुष्य नरकासमान आहे याचा प्रत्यय येतो. या कथासंग्रहाच्या प्रतेक कथेमध्ये तुम्हाला अशा व्यक्तीचं दर्शन होतं जिला आपण आपल्या प्रेमाचा किंवा प्रीतीचा शोध घेताना आणि त्यासाठी धडपडताना पाहतो.
“घर हरवलेली माणसं” या व. पुं. च्या कथासंग्रहात जशी प्रत्येक व्यक्ती आपलं घर शोधते, कुटुंब शोधते त्याचप्रमाणे वि. सं. च्या कथासंग्रहात प्रत्येक व्यक्ती प्रेमाच्या शोधात आहे. यात काहींनी आपली आवडती माणसं गमावली, काहींनी आपली स्वप्न गमावली, तर काहीनी मात्र आपल्या आयुष्यातील आनंदच गमावलाय. या सर्वांनीच या गोष्टींप्रती आपलं समर्पण केलेलं आहे. आणि याचमुळे या गोष्टी गामावल्यावर त्यांच्या जीवाची होणारी तगमग आपल्याला सहज जाणवते. या प्रत्येक कथांमध्ये आपल्याला विविधत्व जाणवतं. जरी या प्रत्येक कथांचा केंद्रबिंदू “प्रेम” असेल तरीही या कथांमध्ये मात्र विविधता आहे. जीवनातील दु:ख आणि त्यातला छोटासा आनंद शोधण्याचा प्रयत्न इथल्या प्रत्येक व्यक्तीने केलाय आणि मुख्य म्हणजे वि. सं. नी यात संतुलन राखुनच केलंय. यातल्या काही कथा आपल्याला हसवतात, काही आपल्याला स्तब्ध करतात तर काही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. काही कथा तीव्र भावना व्यक्त करतात तर काही संघर्षाचा प्रवास करतात, या मुळेच हा कथासंग्रह खूप खास आहे.
आता आपण जाणून घेऊयात वि. स. च्या “प्रीतीचा शोध” या कथासंग्रहाच्या वैशिष्टयाबद्दल:-
यात वि. सं. नी मानवी मनाचा व भावनांचा सखोल विचार करून लेखन केले आहे. म्हणजेच प्रेम, संघर्ष, शोक, त्याग, व्यथा या अशा भावना वि. सं. नी अत्यंत संवेदनशीलपणे व्यक्त केले आहेत. यातली प्रत्येक कथा ही आपल्याला काही ना काही शिकवून जाते, प्रत्येक कथा अर्थपूर्ण आहे. या कथांमध्ये एकाच भावनेचं सातत्य नाही, तर विविध भावनांचा अनोखा मेळ वि. सं. नी घातलेला आहे. जरी या भावना त्या कथांमधील व्यक्तींच्या असतील तरी त्या भावना आपणच अनुभवतो. इतकी भावनिक घनता या प्रत्येक कथेत आढळते. या कथांमधून आपल्याला दु:खाचा स्वीकार करून त्यातून आपण आयुष्याचा आनंद घ्यावा, हा संदेश मिळतो.
या कथासंग्रामधून मला प्रेमाचा खरा अर्थ उमगला. खरंतर प्रेम या भावनेला मर्यादा आपणच घातल्या आहेत, प्रेम हे दोन संजीवांमध्ये किंबहुना स्त्रीआणि पुरुषामध्येच होऊ शकतं असं आपणच ठरवतो. प्रेम किंवा प्रिती ही एक बंदिस्त भावना नसून ती भावना अतिशय पवित्र आणि अमर्याद आहे हे आपण विसरतो. सुखाच्या शोधात आपण आपल्या आवडत्या व्यक्तीवर, वस्तूवर प्रेम किंवा प्रिती करायला ही विसरतो. एखाद्या निर्जीव वस्तूला जीवापलीकडे जपणं याला हे प्रेमच म्हणतात हे सारं काही आपल्याला या कथा संग्रहातून कळतं. या कथा एकाच स्वरूपाच्या नसून, विविध भावनांचा मेळ घालून, विविध घटनांचा समावेश करून प्रेम ही भावना केंद्रस्थानी ठेवून लेखकाने या कथा लिहिलेल्या दिसतात. वि. सं. चं लेखन आपल्याला त्या त्या समाजाचं दर्शन घडवतं हे तर खरंच आहे, पण ते दर्शन अगदी सहज, सोप्या आणि हलक्या भाषेत घडतं. प्रत्येक कथा ही अंतत: आपल्याला विचार करायला भाग पाडते. नात्यांच्या विविध छटा, आणि माणसाचे विविध गुणधर्म यांचा सुरेख मेळ यात लेखकाने घातला आहे. माणसाच्या अंतरंगात वि. सं. चं लेखन अगदी सहजपणे शिरतं, आणि भोवतालच्या वास्तवाचं दर्शन आपल्याला घडवतं हे आणखीन एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. काही कथा आपल्याला सुख देतात, तर काही कथा काळजाचा ठाव घेतात. पण एक खरं, माणसाने प्रेमासारख्या भावनेला इतकं नकारात्मक बनवलं आहे की प्रेम जणू पाप आहे असं आपल्याला वाटतं पण हा कथासंग्रह वाचल्यावर मात्र प्रेमाचं महत्व आपल्याला कळतं.
वि. स. खांडेकर यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे, त्यांच्या लेखणाचं कौतुक ही करावं तितकं कमीच आहे. त्यांच्या लेखनाचा परिणाम हा वाचकांच्या मनावर झाल्याशिवाय राहत नाही, आणि वाचक कधी या कथासंग्रहात गुरफटेल याचा अंदाज खुद्द वाचकाला ही येणार नाही. त्यांचं लेखन म्हणजे मानवी जीवनाचा अमर आत्माच आहे, जो माणसाच्या गुणधर्माचं विवेचन उत्कृष्टपणे आपल्या लेखणीतून व्यक्त करतो.
प्रेम म्हणजे नेमकं काय? प्रेम खरंच मर्यादित आहे का? की ही भावनाच चुकीची आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कथासंग्रहात मिळतात. प्रेम हे फक्त सुखासीन नाही तर ते वेदना ही देतं, हे सांगणारं मुखपृष्ठावरील गुलाब वाचकांच्या मनात प्रेमाचा सुगंध निर्माण करतं. तुम्ही एक नववाचक असाल, तुम्हाला नवीन प्रकारच्या कथा वाचायच्या असतील तर हा कथासंग्रह तुम्ही नक्की वाचा.
धन्यवाद!