| पुस्तक | भूकेली रात्र | लेखक | नारायण धारप |
| प्रकाशन | साकेत प्रकाशन | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | १०४ | मूल्यांकन | ५/ ५ |
विचार करा, एखाद्या शांत रात्री तुम्ही कसलासा विचार करताय, झोपत आहात आणि अशाच अंधाऱ्या रात्री या कुशीवरून त्या कुशीवर वळताय. ती रात्र तुम्हाला झोपू देत नाहीये. तुम्ही त्या रात्रीकडून केवळ शांतता आणि सुखाची झोप मागत आहात, आणि ही रात्र तुमच्याकडून फक्त आणि फक्त तुमचा प्राण मागत आहे. त्या रात्रीची भूक भागत नाहीये कारण ही भूक अन्न पाण्याची नाहीये तर ही भूक तुमच्या रक्ताची आहे. ही भुकेली रात्र तुमचा जीव घेऊ पाहत आहे. कदाचित ही सुरुवात तुम्हाला भिती घालत नसेल, पण याहून ही कित्येकपटीने काळजाचा ठोका चुकवणाऱ्या भयकथा या नारायण धारप यांच्या “भूकेली रात्र” या कथासंग्रहात आहेत. या कथासंग्रहाबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण थोडंसं लेखकाबद्दल जाणून घेऊयात.
नारायण धारप यांचा जन्म २७ ऑगस्ट १९२५ मध्ये झाला. नारायण धारप यांचं नाव हे एक गूढकथाकार किंवा भयकथा लेखक म्हणून सुप्रसिद्ध तर आहेच. पण अशा लेखकांच्या रांगेत त्यांचं नाव अग्रेसर ही आहे. मराठी साहित्यक्षेत्रात त्यांना महत्वाचं स्थान आहे. त्यांनी काही सुप्रसिद्ध साहित्य जसे की दिशा-खंड १, २, ३. दरवाजे, काळ्या कपारी, चेटकीण, अत्तराचा फास लिहिले आहेत. याच साहित्यातील सुप्रसिद्ध कथासंग्रह म्हणजे “भुकेली रात्र” होय. नारायण धारप यांच्या लेखनाची शैली ही काही औरच आहे. पण मग भुकेली रात्र हे इतकं वेगळं का आहे? हे आता आपण पाहुयात.
खरंतर मी या आधी व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, सुधा मुर्ती, वि. स. खांडेकर यांची साहित्य वाचली आहेत. यातून मला माणसांचे सुंदर चेहरे पाहायला भेटले, सुंदर दिवास्वप्ने पाहिली. अगदी काव्यमय जीवन काय ते ही कळलं. पण नारायण धारप यांचं भुकेली रात्र ज्यावेळी वाचायला घेतलं त्यावेळीस एवढंच माहीत होतं की यात भयकथा आहेत. पण त्या भयकथा माझं भान दिवसाढवळ्याही हरपतील हे मला माहित नव्हतं. यात एकूण ६ भयकथा आहेत. यातील प्रत्येक भयकथा ही काळजाचा ठोका चुकावणारी आहे. या कथांच्या वैशिष्ट्ये तर आपण जाणून घेऊच यात. पण मला सगळ्यात आकर्षक वाटलं ते म्हणजे या पुस्तकाचं मुख्यपृष्ठ आहे त्या भयाण रात्रीचं. काळी गडद आणि जणू तुमचीच आतुरतेने वाट पाहणारी रात्र. इथले ढग म्हणजे जणू एका क्षणात रक्ताचा पाऊस पाडण्याची वाट पाहत आहेत. हिंस्त्र श्वापदासारखी जी शिंग दिसतात ते या रात्रीचे दात आहेत. आतमध्ये दिसणारी टेकडी ही त्या रात्रीची जीभ आणि त्यातील स्त्री ही त्या रात्रीचाच एक बळी किंवा कदाचित तुमचा बळी घेऊ पाहणारी मृत्यूची सावली. ही रात्र आपला जबडा उघडून तयारच आहे आपला घास घेण्यासाठी. हा जबडा साधासुधा नाही तर मृत्यूचा जबडा आहे.
या कथासंग्रहातील पहिलीच कथा ही “भुकेली रात्र” या नावाने आहे. आणि त्याच कथेशी संबंधित किंवा त्याचेच फुसटशे वर्णन करणाऱ्या भुकेल्या रात्रीचे चित्र आपल्याला मुखपृष्ठावर केलेले दिसते. भुकेली रात्र, शाप, कवटीतला कैदी या पहिल्या तीन कथा आहेत. अशाच इतरही कथा कोणत्या आहेत ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक तुम्ही वाचलंच पाहिजे. हा कथासंग्रह मोहक स्वप्ने दाखवणारा नाही तर मृत्यूचे भयावह नाट्य दाखवणाऱ्या भयकथा किंवा गूढकथा सांगणारा कथासंग्रह आहे. तर आता आपण बोलूयात या कथासंग्रहाच्या किंवा नारायण धारप यांच्या लेखन वैशिष्ट्याबद्दल.
पहिली गोष्ट म्हणजे लेखकाने केलेली वातावरणनिर्मिती. मला आठवतंय की मी हा कथासंग्रह दिवसाच वाचायला घेतला, कारण रात्री वाचणं म्हणजे स्वतःच्या भितीत भर घालणे होय. पहिली कथा वाचताना सुरुवात ही इतर कथांप्रमाणेच वाटली. याचं कारण कदाचित मी नारायण धारप यांचा कथासंग्रह पहिल्यांदाच वाचला घेतला असावा म्हणून. पण दिवसा-ढवळ्या ती कथा वाचताना भिती वाटली आणि त्यामुळे आता पुढची कथा वाचू की नको? हा प्रश्न पडला. पण पुढच्या कथा वाचल्याशिवाय राहावत नाही. पण झळझळीत उजेडात ही तुम्हाला हे पुस्तक वाचताना भिती वाटत असेल तर इथे लेखकाचं कौतुक वाटलंच पाहिजे. यासोबतच या प्रत्येक कथेत केवळ एकाच पात्राभोवती गोष्टी फिरत नाही, तर ही कथा इतर पात्रांभोवती ही फिरते. यामुळे कथा व्यक्तीकेंद्रित न होता आपल्याला आजूबाजूच्या जगात ही फिरायला भेटते. लेखकाची कल्पकता इथेच शिखरावर पोहोचते कारण एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनावर झालेला परिणाम ही आपल्याला दिसून येतो.
भयकथा या आपल्याला घाबरवून सोडतात, म्हणजे कधी कधी वाटतं की आपण माणूस आहोत की आपण ही याच कथेतील एखादं पात्र आहोत? हा प्रश्न तेव्हा पडतो जसं आपण या कथासंग्रहाचं एक एक पान उलगडतो, प्रत्येक शब्द भावनांचे नवीन पदर उलगडून दाखवतो. या कथा जरी भीतीदायक असल्या तरीसुद्धा याच्या वातावरणनिर्मितीमुळे आपण कधी घाबरतो, तर कधी दचकतो. भिती आणि रहस्यमय वातावरण हे या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य तर आहेच; पण यामुळे मनात एक वेगळीच भिती निर्माण होते. लेखकाने यातून मानसिक भितीवर ही लक्ष दिल्याचे दिसते. याशिवाय या कथासंग्रहाचा मुख्य विषय हा चांगल्या शक्ती विरुद्ध वाईट शक्ती यांच्यातील होणारं द्वंद्वयुद्ध हा आहे. या दोन्ही शक्तींच्या युद्धातून निर्माण होणारी जीवघेणी स्पर्धा ही थरारक आहे. हाच थरार आपल्याला या कथासंग्रहातून वाचायला मिळतो. या प्रत्येक कथा तुमच्या मनात भय निर्माण करतात, गूढ निर्माण करतात हे ही या कथांचं वैशिष्ट्य आहे. या कथासंग्रहाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे, प्रत्येक कथेचा होणारा अनपेक्षित शेवट होय. वाचक कथेच्या सुरुवातीवरून कथेच्या शेवटाचा अंदाज लावतो, पण कथेत अनेक वळणं येतात आणि वाचकांचा कयास ही चुकतो. कथेचा होणारा अनपेक्षित शेवट वाचकांना थक्क करून सोडतो यात काही शंकाच नाही. जितकं मानवी जीवन यात दाखवलं आहे, तेवढंच अलौकिक घटना, भुताटकी, इत्यादी गोष्टींवरही यात भर दिला आहे ज्यामुळे कथेचे गूढ वाढते.
तर आता हा कथासंग्रह का व कुणी वाचावा? तर जर तुम्हाला गूढकथा किंवा भयकथा वाचायच्या आहे; किंवा या प्रकारच्या कथा वाचायला सुरुवात करायची असेल तर हा कथासंग्रह तुम्ही नक्कीच वाचला पाहिजे. धन्यवाद!
तुम्ही जर आत्तापर्यंत हे पुस्तक घेतलं नसेल आणि तुम्हाला वाचायचं असेल, तर खालील लिंकवर क्लिक करा.