| पुस्तक | वपुर्झा | लेखक | व. पु. काळे |
| प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | १६८ | मूल्यांकन | ५/ ५ |
असं म्हणतात की कृष्णाने जर अर्जुनाला गीता सार सांगितलं नसतं, तर अर्जुन लढूच शकला नसता. आपल्याच लोकांवर शस्त्र उचलणे ही सोपी बाब आहे का? पण अर्जुना सारखं नशीब आपलं थोडीच आहे? त्याला प्रत्यक्ष श्रीकृष्ण भेटले आणि त्यांच्या मुखातून गीता ऐकली, थोडे भाग्यवान आपणही आहोतच की आपल्याला भगवतगीता वाचता येऊ शकते जी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली.
गीता वाचली की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात असं म्हणतात, पण आजच्या काळातील गीता कशी असेल असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? मला पडला होता, आणि त्याचवेळी मी वाचायला सुरुवात केली व. पु. काळे यांचं वपूर्झा हे ललित साहित्य. व. पु. ही साहित्य विश्वातील किती मोठी असामी आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको, इतकं त्यांचं व्यक्तिमत्व मोठं आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्या मी वाचल्या होत्याच पण बरेच दिवस वपूर्झा वाचावं असं वाटलं. आधी वाटलं की यात असं काय आहे की इतक्या वर्षणानंतर ही लोक वपूर्झा वाचत आहे? का लोकांनी या पुस्तकाचं इतकं कौतुक केलं आहे? वाचल्याशिवाय तर हे कळणार नव्हतं त्यामुळे मी वाचायला सुरुवात केली.
पुस्तकाची सुरुवात ही भन्नाट आहे, यात एक रिकामा ग्लास दाखवला आहे. तो ग्लास रिता का आहे आणि तो कसा भरावा हे सांगितलं आहे. सुरुवातीला कथा असते ती यशवंतराव यांची, एक दोन पान ही कथा चालूच राहते. मग अचानक या पुस्तकाला वळण येतं ते दुसऱ्याच कथेने, ज्याचा आणि यशवंतरावांच्या कथेचा काही संबंध नव्हता. मग हळू हळू तुम्हाला कळतं की या पुस्तकात केवळ एकाच व्यक्तीबद्दल लिहिलं नाहीये, तर यात अनेक अशा गोष्टी आहेत, व. पुं. चे लेख आहेत जे तुम्हाला खूप काही शिकवून जातात. हीच या पुस्तकाची खासियत आहे.
या पुस्तकात नेमकं काय आहे जे वाचकांना आकर्षित करतं? तर व. पु. काळे यांनी केलेला हा अनोखा प्रयोग. व. पुं. आजवर अनेक कथा- कादंबऱ्या आणि वैचारिक पुस्तके लिहिली आहेत. प्रत्येक पुस्तकातून तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला भेटतात, ज्या तुम्हाला आयुष्य नव्याने जगायला शिकवतात. पण हे पुस्तक म्हणजे या सगळ्या पुस्तकाचा सार आहे, यात तुम्हाला व. पु. चे निवडक विचार किंवा त्यांचे तत्वज्ञान वाचायला भेटेल. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य तुम्हाला आयुष्याचा वेगळा अर्थ सांगून जातं. थोडक्यात, व. पु. काळे यांच्या विचारांचा खजिना म्हणजे वपूर्झा होय!
तर या पुस्तकाचा मुख्य विषय आहे मानवी जीवनाचे अंतरंग होय. आपण सध्या ज्या काळात जगतो तिथे आपण आपल्या जवळच्या माणसांना किती महत्व देतो, त्यांच्या किंबहुना स्वतःच्या भावनांचा किती सन्मान करतो, आपण आपलं आयुष्य आपल्यापुरतं मर्यादित केलं आहे पण जग हे अथांग आहे एका समुद्रासारखं या अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला वपूर्झा वाचताना कळतील. माणसाला त्याचं आयुष्य हे अनेक खाच खळगे पार करून जगावं लागतं, ते वाटतं तितकं सरळ नाही पण असं आयुष्य जगण्यातच अर्थ आहे हे मला वपूर्झा वाचताना जाणवलं. यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला भेटतील, ज्या तुम्हाला वाचल्याशिवाय कळणार नाही.
तर आता आपण जाणून घेऊयात वपूर्झाची वैशिष्ट्ये
१] या पुस्तकाची खासियत मी सुरुवातीलाच सांगितली. हे पुस्तक लिहिलंच यासाठी की तुम्ही ते कधी ही वाचावं आणि त्यातलं कुठलंही पान उघडावं, कदाचित तुमच्या समस्या सुटतील किंवा नाही सुद्धा पण तुमचं मन मात्र शांत करायचं काम हे पुस्तक करेल. यातलं प्रत्येक कडवं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतं, यात तुम्ही ही अपेक्षा करू नये की एक कडवं दुसऱ्या कडव्याशी संबंधित असेल. आणि हीच या पुस्तकाची खासियत आहे.
२] जर तुम्ही पुस्तकाचं मुख्यपृष्ठ पाहिलं तर तुम्हाला एक रिकामा पेला दिसेल. या रिकाम्या पेल्यात जोवर काही पेय जात नाही, तोवर त्याला महत्व प्राप्त होत नाही. असंच काहीसं या पुस्तकाचं ही आहे. हे पुस्तक तुम्हाला नवीन विचार आत्मसात करण्यासाठी प्रवृत्त करतं, हे पुस्तक तुम्हाला खुणावतं की तुमच्या मनाला नवीन विचार स्वीकारायला लावा. तुमची पाटी कोरी असेल, पण त्यावर व. पु. त्यांचे विचार लिहून कशी तुमच्या आयुष्याला कलाटणी देतात ते पहा!
३] या पुस्तकात कोणत्याही एकाच व्यक्तीची कथा नाही, किंवा हे पुस्तक व्यक्तीकेंद्रित नाही. हे पुस्तक मानवकेन्द्रित आहे किंवा समजकेन्द्रित आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण यात अनेक भाव-भावना, व. पुं. चे तत्वज्ञान तुम्हाला वाचायला भेटते. प्रत्येक कडव्याचं स्वतंत्र महत्व आहे, त्यामुळे तुम्ही कोणतंही कडवं वाचलं तरी तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला नक्की भेटतं.
४] हे पुस्तक वाचताना तुम्हाला कंटाळा येत नाही हे खास. या पुस्तकात व. पुं. नी त्यांचं तत्वज्ञान जरी सांगितलं असलं तरी काहीवेळा काय होतं की तत्वज्ञान वाचायला आणि समजायला अवघड जातं. मुळातच व. पुं. ची लेखनशैलीच इतकी अनोखी आहे की एकाच वेळी हे पुस्तक संपवावं की काय असं वाटतं इतकी भाषा सोपी आहे.
५] हे पुस्तक मार्गदर्शकाचं काम करतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण भगवान श्रीकृष्णाने जी गीता सांगितली ती ही आपल्या मार्गदर्शनाचं काम करते. दोन्ही पुस्तकात फरक भाषेचा आणि कालखंडाचा जरी असला तरीही हे पुस्तक अडी अडचणीच्या वेळी तुमचं मार्गदर्शन करतं.
मी आज व. पु. यांच्या लेखानशैलीबद्दल नाही बोलणार, कारण त्याचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. याउलट हे पुस्तक कसं वाचावं हे जाणून घेणे जास्त आवश्यक आहे. ही पहिलीच वेळ असेल जिथे लेखकाच्या लेखनशैलीऐवजी आपण पुस्तक कसं वाचावं हे पाहणार आहोत. मुळात ही कोणतीही कादंबरी नाही, किंवा हा कथासंग्रह ही नाही की जो तुम्ही सलग वाचाल. हे पुस्तक अत्यंत वेगळं आहे, यातलं कोणतंही पान वाचा आणि केव्हाही वाचा त्याचं बंधन नाही. या पुस्तकात अनुक्रमणिका नाही, किंवा कोणतं पान केव्हा वाचावं याची मार्गदर्शिका आहे. यातली प्रत्येक ओळ, प्रत्येक कडवं हे खूप अर्थपूर्ण आहे. त्यामुळे एका बैठकीत जरी पुस्तक पूर्ण नाही केलं किंवा रोज जरी नाही वाचलं तरी चालेल. यामुळे तुमची लिंक तुटणार नाही, कारण प्रत्येक कडवं हे वेगवेगळ्या गोष्टी शिकवतं. थोडक्यात, हे पुस्तक तुम्ही केव्हाही वाचा, कोणतंही पान उघडा आणि कितीही वेळा वाचा; तुम्हाला प्रत्येकवेळी नवीन गोष्टी शिकायला या हमखास मिळतील.
व. पु. काळे यांनी कथा कादंबरी या ही पेक्षा काही हटके असं लेखन केलं आहे. व. पु. काळे हा विचारांचा, जीवनाच्या गूढ तत्वज्ञानाचा एक अथांग सागर आहे. त्यांचं लेखन हे तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात नेतं आणि पुन्हा कधी आपल्याला आधीच्या ठिकाणी सोडतं ते आपल्याला कळत ही नाही. आणि ज्याला ज्याला या प्रवासाचा अनुभव घ्यायचा आहे अशांनी व. पुं. चं वपूर्झा हे ललित साहित्य आवर्जून वाचावं.
तुम्हाला वपूर्झाबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा, आणि तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही ते घेऊ शकता.
धन्यवाद!