| पुस्तक | मेमरी -हाव टू डेवलप, ट्रेन अँड यूज इट | लेखक | विलियम वॉल्कर अट्कीन्स्न |
| प्रकाशन | सृष्टि पब्लिशर्स अँड डिस्ट्रिब्यूटर | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | १६८ | मूल्यांकन | ४ / ५ |
आपल्या प्रत्येकालाच माहीत आहे की आयुष्यात यश मिळवायचं असेल, तर चांगली बुद्धिमत्ता किती आवश्यक आहे ते. पण भरपूर लोकांना आपल्या बौद्धिक क्षमतेचं, स्मरण शक्तीचं महत्व नसतं. पण तुम्ही कोणत्या ही क्षेत्रात काम करा, कितीही छोटं किंवा मोठं काम करत असाल तरीही स्मरणशक्ती आवश्यक असते. याचं कारण म्हणजे चांगली स्मरणशक्ती तुम्हाला नवीन ज्ञान आत्मसात करायला मदत करते. तुम्ही तुमची रोजची कामं विना दिक्कत व न विसरता करायला मदत करते. तुम्हाला तुमचा अनुभव साठवून त्याचा उपयोग करता येतो. याशिवाय तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या/ स्मरणशक्तीच्या आधारावर निर्णय घ्यायला मदत होते. तुमची कार्यक्षमता वाढते, व तुम्हाला याचा फायदा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ही होतो.
आता एवढे सगळे फायदे ही एक प्रश्न राहतोच की जर तुमची स्मरणशक्ती तेवढी कार्यक्षम नसेक तर सगळ्याचा नेमका उपयोग तरी काय? या प्रश्नाचं उत्तर आहे की “जरी तुमची स्मरणशक्ती कमजोर असेल तरीही तुम्ही ती सक्षम बनवू शकता” पण कसं? तर विलियम वॉल्कर अट्कीन्स्नचं “मेमरी- हाव टू डेवलप, ट्रेन अँड यूज इट” हे पुस्तक वाचून. मी हे पुस्तक वाचण्यामागचं कारण म्हणजे मक माझी स्मरणशक्ती आणखीन कशी वाढवता येईल हे जाणून घ्यायचं होतं. मला त्यासाठी नैसर्गिकरीत्या उपाय करायचे होते, आणि ते ह्या पुस्तकात आहेत.
माणसाचा मेंदू हा माहिती साठवण्यासाठी, गोष्टी लक्षात राहण्यासाठी, आणि तुमचं रोजचं आयुष्य सुककर बनावं म्हणून अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळेच माणूस मेंदू जास्त जपण्याचा प्रयत्न करतो, कारण मेंदू तुम्हाला जिवंत राहण्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळेच मेंदूसाठी, त्याची स्मरणशक्ती टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करावे लागतात आणि या पुस्तकात तुमच्या पाचही इंद्रियांचा वापर करून तुम्ही स्मरणशक्ती कशी वाढवाल हे सांगितलं आहे. या पुस्तकातून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला भेटतात, त्यापैकी मुख्य तीन मला या पुस्तकातून शिकायला भेटल्या. त्या पुढीलप्रमाणे:-
पहिली गोष्ट की “तुमची स्मरणशक्ती बळकट होऊ होऊ शकते” आपल्याला अगदी लाहानपणापासूनच सांगितलं जातं की स्मरणशक्ती ही अनुवंशिक आहे, तुमच्या आई-वडील आणि आजी आजोबांची जशी बुद्धी तशीच तुमची ही असते, इत्यादी. पण तसं नसून प्रत्येकाची स्मरणशक्ती वेगवेगळी आहे, व ती तुमच्या शरीराचा एक भाग आहे. जर तुम्ही स्नायू मजबूत होण्यासाठी जीममध्ये व्यायाम करता. तसंच स्मरणशक्ती मजबूत होण्यासाठीही काही व्यायाम आहेत. रोजच्या सरावाने तुम्हाला त्यात फरक जाणवेल. इथे एक गोष्ट महत्वाची की मेंदूची क्षमता ही एका क्षणात वाढत नाही, त्यामुळे या पुस्तकात लेखकाने जे काही सांगितलं त्याचा रोज थोडा जरी सराव केला तरी तुमच्यात बदल हा शक्य आहे फक्त तुमची इच्छाशक्ती हवी. दुसरी गोष्ट म्हणजे “तुमच्या स्मरणशक्तीचे एकूण तीन स्तर आहेत” म्हणजे कुठलीही गोष्ट ही तुमच्या एकदम लक्षात राहत नाही तर आधी त्या गोष्टीची माहिती आपल्या मेंदुपर्यंत पोहोचते, मेंदू ती साठवतो, व जेव्हा आपल्याला त्या माहितीची गरज असते तेव्हा मेंदू स्मरणशक्तीच्या आधारे ती माहिती ओळखून समोर आणतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं नाव, एखादा पत्ता, इत्यादी. तिसरी गोष्ट म्हणजे “कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असतं” ही गोष्ट विद्यार्थ्यांना अचूक कळेल, की जेव्हा शिक्षक शिकवत असताना आपण त्या गोष्टीकडे नीट लक्ष नाही दिलं तर ते काय शिकवत आहेत हे कळत नाही व परीक्षेच्या वेळेला होणारे परिणाम तर तुम्हाला माहीत आहेतच.
या पुस्तकातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पहिल्या तीन धडे आपल्याला या तीन गोष्टी शिकवतात. या पुस्तकात एकूण २० धडे आहेत, काही छोटे आहेत तर काही मोठे आहेत. जे तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय काय करायचं आहे याचं मार्गदर्शन करतात. आता आपण जाणून घेऊयात या पुस्तकाची वैशिष्ट्ये:-
या पुस्तकाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला लेखक तुमची पंचइंद्रिये वापरुन तुम्ही तुमची स्मरणशक्ती कशी वाढवाल हे सांगितलं आहे. खरं तर बहुतांश लोक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खातात, किंवा मेंदूवर प्रचंड ताण देतात. पण ते हे विसारतात की मेंदूच आपल्या शरीराचा चालक आहे. इतर अवयव त्याला, आणि मेंदू या अवयवांना मदत करत असतात. मेंदू आणि आपली पंचइंद्रिये हे एकमेकांचे सहाय्यक असतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर तुम्हाला तुमच्या कान, नाक, डोळे, आवाज, आणि त्वचा अशा सर्वच अवयवांचा व्यायाम करावा लागेल. यासाठी वेळ देणं आणि सातत्य टिकवणं ही महत्वाचं आहे. या पुस्तकाचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की या पुस्तकात तुम्हाला लेखक फक्त तुमच्या पंच इंद्रियांचा वापर करून स्मरणशक्ती कशी वाढवायची हेच शिकवत नाही तर, तुम्ही नाव, पत्ते, चेहरे, आकडे हे सर्व कसं लक्षात ठेवाल हे ही सांगितलं आहे. यामुळे होतं की काय की एखादी गोष्ट तुम्ही विसरता आणि ती आठवण्यासाठी तुम्ही तुमच्या मेंदूला प्रचंड ताण देता, आणि हाच ताण वाचवायचं काम हे पुस्तक करतं. स्मरणशक्ती टिकून राहण्यासाठी किंवा ती वाढवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे एकाग्रता होय. लेखकाने यामध्ये एकाग्रतेचे महत्व तर सांगितलं आहे, पण तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कसा कराल हे ही लेखकाने सांगितलं आहे. लेखक यामध्ये तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी विविध तंत्र सांगतात, पण लेखकाची खासियत ही आहे की जी काही तंत्र त्यांनी सांगितली आहे ती अतिशय सोप्पी आहे. पुस्तकाच्या शेवटी लेखक तुम्हाला काही सूचना ही देतात की त्यांनी तुम्हाला जे काही सांगितलं आहे, ते तुम्ही कसं कराल. मेंदूबद्दल जेव्हा आपण विचार करतो तर त्यात अनेक रसायने असतात, अनेक गोष्टी असतात ज्या सर्वसामान्य वाचकांना अवघड वाटतात, पण लेखकाने मेंदूबद्दलची माहिती समजेल अशा भाषेत सांगितली आहे. भाषाशैली बद्दल बोलायचं राहिलं, तर पुस्तकाची भाषा ही मध्यम स्वरूपाची आहे. काही लोक हे पुस्तक सहज वाचू शकतात, तर काहींना भाषा अवघड ही वाटू शकते. यात एकूण २० धडे आहेत ज्यामधून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला भेटतात.
त्यामुळे जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा. धन्यवाद!
तुम्ही जर हे पुस्तक घेतलं नसेल तर खालील लिंकवर क्लीक करून तुम्ही घेऊ शकता.