हिरवा चाफा- वि. स. खांडेकर l Hirva Chafa- V. S. Khandekar l Marathi Novel Review

पुस्तक हिरवा चाफालेखक वि. स. खांडेकर
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या २०६ मूल्यांकन ५ / ५

फूल म्हणलं की आठवतो तो दरवळ, आठवतो तो सुगंध, आठवते ती प्रिती, आणि आठवते ते समर्पण. देवाच्या पायाशी वाहिलेल्या फूलाला निर्माल्य म्हणून मान मिळतो, केसातला गजरा ही निस्सीम प्रेमाची ग्वाही देतो, आणि चितेवरील फूल तर त्या माणसाची आठवण बनून जातं. खरंच जितकं फुलाचं कौतुक करावं तितकं कमी तितकंच वि. स. खांडेकर यांच्या लेखणाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. “ययाती” “अमृतवेल” अशा सुप्रसिद्ध कादंबऱ्या लिहून त्यांनी वाचकांचं मन अगदी सहज जिंकलं. वि. स. म्हणलं की ययातीचा उल्लेख हा आपसूकच येतो, त्याचप्रमाणे त्यांचं नाव घेतल्यावर आणखीन एका गोष्टीची आठवण येते आणि ती म्हणजे “आरसा” वि. स. खांडेकरांचं नाव ऐकलं किंवा वाचलं की प्रथम आठवतो तो आरसा. ही साहित्य क्षेत्रातील एक अशी असामी आहे जिने आपल्या लेखनातून जगाला आरसा दाखवला, आरसा दाखवला करुण दुखा:चा, आरसा दाखवला तो पीडितांच्या असहाय्य वेदनांचा, आरसा दाखवला तो स्वार्थाने दुभंगलेल्या समाजाचा, आणि आरसा दाखवला तुमच्या नि आमच्या अंतरंगात जन्माला येणाऱ्या विचारांचा आणि भावनांचा.

माणसाचा सर्वात मोठा क्षत्रू आळस समजला जातो पण त्याहूनही त्याचा सर्वात मोठा क्षत्रू आहे त्याचा लोभ. लोभी माणूस हा कधी सुखी राहुच शकत नाही, त्याला भिती असते ती एकतर त्याची संपत्ती चोरी जाईल याची किंवा ही संपत्ती एकाचवेळीस नाश पावेल याची. एखाद्याला पैशाची चटक लागली, की तो त्याच्या मर्यादा ही विसरतो. दुसऱ्याच्या हक्काच्या गोष्टी हिरावून, त्यांना वेदना देऊन त्यांना असुरी आनंद मिळतो. अशावेळी अशा माणसांची घृणा येते हेच खरं. माणसाचा स्वार्थच त्याला शिक्षा देतो. आणि वि. स. खांडेकर यांनी आपल्या या कादंबरीमध्ये मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीचा आरसा आपणास दाखवला आहे. कादंबरीचं नाव “हिरवा चाफा” आहे, अतिशय सुंदर नाव पण पदोपदी मनाला वेदना देणाऱ्या, रडवणाऱ्या प्रसंगाची गाथा तुमचं काळीज हेलावून टाकते. काही कादंबऱ्या केवळ प्रियकर-प्रेयसीच्या नसतात तर त्यांच्या अद्भुत संघर्षाची, समाजातील ज्वलंत प्रश्न सोडवताना ही त्यांच्यातील प्रीतीची ग्वाही देणाऱ्या असतात. त्यापैकीच “हिरवा चाफा” ही कादंबरी होय. हिरवा चाफा दुरून आकर्षक दिसतो, जवळ असो वा दूर त्याचा सुगंध हा दरवळतच राहतो जो कोणी कधीच विसरू शकत नाही. होय, हिरवा चाफा हा असाच असतो, ना केवळ चाफा पण ही कादंबरी ही. एकदा वाचाल तर पुन्हा कधीच विसरता येणार नाही अशी.

या कादंबरीचा मुख्य विषय आहे “गरीब विरुद्ध श्रीमंत” “शोषणकर्ते विरुद्ध पीडित” ही कादंबरी आधारित आहे एका स्त्रीच्या आयुष्यावर, तिच्या निस्सीम प्रेमावर, जिने तत्कालीन समाजाच्या मर्यादा मोडीत घातल्या आणि संघर्षाचा मार्ग निवडला. या कादंबरीतील नायिकेचं नाव आहे सुलभा. सुलभा ही एक एम बी बी एस डॉक्टर आहे, रुग्णांची सेवा करणे त्याची सुसुश्रा करणे हे तिचे काम. सुलभा ही आपल्या वडिलांची म्हणजेच तात्यासाहेबांची लाडकी व त्यांच्या आज्ञेतील मुलगी आहे. एक संस्कारी आणि सुलक्षणी मुलगी म्हणून सुलभाचे चित्रण यात केलेले आहे, जिने आजवर कधीच आपल्या वडिलांना दुखावलं नाही. बदल हा प्रकृतीचा नियम आहे, माणसाला कितीही वाटलं तरी त्याचं आयुष्य हे कधीच सारखं राहत नाही. त्यात बदल हा होतोच. आयुष्यातील या नकळत झालेल्या बदलांमुळे तिच्यामुळे तिचे वडील दुखावले गेले आणि दुरावलेही. प्रत्येक वडीलाल असं वाटतं की आपलं मुल आपल्या आज्ञेत असावं, त्याने आपल्या पावलावर पाऊल टाकावं आणि म्हणूनच बहुतांश पालकांचा भ्रमनिराश होतो. हे जरी खरं असलं की मुल आपल्या हाताबाहेर जातं तेव्हा पालकांना अनंत यातना होतात, पण जर ते मुल पालकांच्या आताताईपणामुळे हाताबाहेर गेलं असेल तर? पालक याचा स्वीकार तरी करू शकतील का? तर नाही. आणि नेमकं हेच तात्यासाहेबांसोबत झालेलं आपल्याला दिसतं. सुलभाचा स्वभाव आणि तिच्या अपेक्षा ह्या तिच्या वाडिलांपेक्षा खूप वेगळ्या आहेत, त्यामुळेच त्यांच्यामध्ये काही ना काही कारणांमुळे ठिणग्या उडत. ही कादंबरी वाचताना वाटतं मुलीने आपल्या वडिलांना दुखावणं, आणि त्यांचा भ्रमनिरास करणं हे किती वेदनादायी असतं. पण विचार करा की वडील जर आपल्या अट्टहासामुळे आपल्याच मुलांचं आयुष्य पणाला लावत असतील तर मुलांनी त्यांना दुखावलं तर त्यात गैर ते काय? कदाचित ही बंडखोरीची भाषा तुम्हाला आवडणार नाही, ती रूचणार नाही आणि पचणार नाही. पण या कादंबरीचं एक न एक पान वाचताना तुम्हाला या वाक्यातील मर्म समजेल.

सुलभा ही एक विलक्षण मुलगी आहे, श्रीमंतीत आणि लाडात वाढली असली तरीही कशाची हाव तिला नाही, की कोणाचा हक्क हिरावून त्याच्यावर सुखी राहण्याची अपेक्षा आहे. दुर्दैवाने तिच्या वडिलांचा स्वभाव हा असा असल्याने, आपल्याच वडिलांविरुद्ध तिला बंड पुकारावं लागलं. तिच्या आयुष्यात अनेक यातना आहे, आईविना मुलगी त्यात भाऊ खुनाच्या आरोपामुळे पळून जाऊन परागंधा होतो. तरीही वडिलांच्या छत्रछायेखाली तिला जे आयुष्य सुखी वाटलं, पण तिचं आयुष्य हे काटयांनी भरलेलं आहे हे ही आपल्याला कळतं. सुलभा ही एक स्वतंत्र स्त्री आहे, तिच्या आयुष्यात नवनवीन व्यक्ती येत गेल्या आणि तिच्या आयुष्याला त्यामुळे कलाटणी मिळाली. त्यामुळे आपल्याच वडिलांनी इतरांच्या पाठीत कितीदा खंजीर खुपसला हे कळताच तिची झालेली चलबिचल ही आपल्याला पहावत नाही. तिच्या आयुष्यात जर कोणी आनंद आणला असेल तर तो म्हणजे तिचा बालमित्र मुकुंद होय, मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते आणि संघर्षाला ही सुरुवात होते. तिच्यासमोर अनेक प्रश्न थैमान घालत असतात; स्वार्थी विजय जो वडिलांच्या मार्जितला आहे त्याला जोडीदार म्हणून निवडावं? की मुकुंदसारख्या निस्वार्थी बालपणीच्या मित्राला निवडावं? भावाचं आणि त्याच्या प्रेयसीचं आयुष्य जे आपल्याच वाडिलांमुळे उद्ध्वस्त होणार त्याला कसं सावरावं? आणि या सगळ्यात आपलं आयुष्य म्हणजे नेमकं काय? आणि हे जाणून घ्यायला कसं धडपडावं? समाजातील विषमता कशी दूर करावी हे सुलभेला कळालं खरं, पण त्यासाठी तिला नाना प्रकारचे दिव्य पार पाडावे लागले. या सर्वांचीच एकत्रित कथा या कादंबरीत मांडली आहे.

वि. स. खांडेकर यांची ही कादंबरी सर्वप्रथम १९३७ मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्यापूर्वीची समाजातील स्थिती, विषमता, मुख्य म्हणजे सुलभाद्वारे समाजात स्त्रियांची स्थिती कशी असावी? हे सर्व आपल्याला कळतं. वि. स. यांची ही कादंबरी वाचताना ती तुम्हाला हातातून खाली ठेवावीच वाटणार नाही, इतकं उत्कृष्ट लेखन त्यांनी केलं आहे. ही कादंबरी वाचताना प्रत्येक पात्राचं चित्र हे आपसूकच डोळ्यासमोर उभं राहतं व अंतत: त्याचा विचार करायला वाचकांना भाग लावणं हे लेखकाचं यश आहे जे त्यांनी मिळवलं. या कादंबरीला जवळपास १०० वर्षे पूर्ण होतील, आणि कितीही वेळा वाचली तरी ती नवीच वाटते. हिरव्या चाफ्याप्रमाणेच या कादंबरीचा दरवळ हा कायम राहील.

जर तुम्ही ही कादंबरी वाचली नसेल, तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही ती घेऊ शकता. धन्यवाद!

Leave a Comment