स्वामी- रणजित देसाई l तीन अंकी मराठी नाटक l Swami- Ranjit Desai l Marathi Natak Reviews

पुस्तक स्वामी- रणजित देसाई -तीन अंकी मराठी नाटकलेखक रणजित देसाई
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या ९६ मूल्यांकन ५ / ५

ऐतिहासिक साहित्य हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मी गेल्या २ वर्षांपासून इतिहास या विषयाचा अभ्यास करत आहे, आणि पदवी ही यातूनच घेतली आहे. आणि इतिहासाचा अभ्यास करताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की “लोकांच्या मनात इतिहासाविषयी जागृती व्हायला हवी” आपण भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीचा इतिहास पाहिला, तर “प्राचीन ते मध्ययुगीन इतिहासाच्या जाणिवेचा हातभार स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लागला आहे” अशा चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. गरजेचं नाही की प्रत्येक गोष्टीची माहिती असायला हवी, पण आपल्या भारताच्या वीरांबद्दल, त्यांच्या दैदीप्यमान कर्तुत्वाबद्दल थोडीतरी माहिती असायलाच हवी. आणि याकामी तुम्हाला रणजित देसाई लिखित “स्वामी” हे नाटक/ पुस्तक मदत करील.

बाळाजी विश्वनाथ यांच्या कर्तृत्वाने भट घराण्याकडे पेशवेपदाचा वारसा आला, पुढे बाजीराव पेशवे यांच्या कडे ही  पद कर्तृत्वानेच आले, अगदी दुसऱ्या बाजीराव पेशवांपर्यंत. पण पुढे याचा अस्त झाला तो पेशवे घराण्यातील अंतर्गत कलहामुळे. आणि याचं स्तोम माजलं ते पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर. पानिपतचं तिसरं युद्ध हे अखंड मराठा साम्राज्यासाठी भयानक तथा विध्वंसक ठरलं. पेशव्यांच्याच नीतीमुळे रजपूतांनी सोडलेली साथ, आणि अब्दालीची अफाट सेना यांनी मराठा सैन्याचा दारुण पराभव केला. विश्वासराव पेशवे आणि सदाशिवराव पेशवे यांचा झालेला मृत्यु हा तर अखंड पेशवाईला चटका लावून गेला. दु:ख, अपमान, यातना, हळहळ अशा भावनांच्या लाटा सहन न झाल्याने तडफडून झालेल्या “नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू” पानिपतच्या युद्धाने नातर केवळ पेशवे घराण्यात तर संपूर्ण मराठा दौलतीत वादळ आलं होतं. पुढे पेशवा कोण बनणार आणि हे अखंड मराठा स्वराज्याचं रक्षण कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला. आणि या वरचं एकच उत्तर म्हणजे नानासाहेब पेशव्यांचे द्वितीय पुत्र “माधवराव पेशवा” हे होय.

माधवरावांनी पेशवा बनणं म्हणजे भयाण अंधारात आशेचा किरण उगवणं होय. कारण पेशव्यांचं गतवैभव मिळवण्याची कुवत केवळ त्यांच्याकडेच होती. आणि अगदी मृत्यूपर्यंत ते लढतच राहिले आणि क्षत्रूंशी तसेच आप्त मंडळींशी आणि शेवटी “क्षयरोगाशी” ही लढत अशीच राहिली, पण क्षयरोगाच्या लढाईने मात्र माधवरावांचा पराभव केला, आणि कमी वयातच त्यांना त्यांचा प्राण गमवावा लागला.

अगदी कमी वयात, कमी अनुभव असताना त्यांनी पेशवाई सांभाळली, हे काम कठीण होतं कारण ना पाठीशी वडील होते ना काका! रघुनाथराव असूनही नसल्यासारखे, वैर पत्करून इर्षा करणारे. पानिपत मधला अपमान लक्षात ठेवून स्वराज्य बळकट करण्याकडे लक्ष देऊन त्यांनी ते वैभव पुन्हा मिळालं. पण ज्याच्या खांद्यावर “सत्य व खरेपणा” सांभाळण्याची जबाबदारी असते त्यालाच अनंत यातना सहन कराव्या लागतात. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात जी “जया अंगी मोठेपण l तया यातना कठीण ll ” आणि नेमकं हेच माधवरावांच्या बाबतीतही घडलं. खरंतर माधवराव हे अतिशय कर्तबगार होते. पण त्यांना बाहेरच्या कमी वयात, कमी अनुभव असताना त्यांनी पेशवाई सांभाळली, हे काम कठीण होतं कारण ना पाठीशी वडील होते ना काका! रघुनाथराव असूनही नसल्यासारखे, वैर पत्करून इर्षा करणारे. पानिपत मधला अपमान लक्षात ठेवून स्वराज्य बळकट करण्याकडे लक्ष देऊन त्यांनी ते वैभव पुन्हा मिळालं. पण ज्याच्या खांद्यावर “सत्य व खरेपणा” सांभाळण्याची जबाबदारी असते त्यालाच अनंत यातना सहन कराव्या लागतात. पण त्यांना बाहेरच्या क्षत्रुंपेक्षाही आतल्या क्षत्रुंचा बिमोड करावा लागला, आणि तो करताना अर्थातच त्यांना अनंत यातना झाल्या असाव्यात यात शंकाच नाही.

रघुनाथरावांशी त्यांचं वैर हे निस्वार्थी होतं, कारण पेशवेपद म्हणजे गंमत नाही, किंवा वैयक्तिक संपत्ती ही नाही. तर ती एक जबाबदारी आहे आणि ते पेलण्यासाठी तशी पात्रताही लागते. सय्यम, मुत्सद्दीपणा, स्वराज्याप्रती एकनिष्ठा, आणि ती जबाबदारी पाळण्याची कुवत हे सर्व गुण असावे लागतात. आणि अशा स्थानी पोहोचल्यावर हलक्या कानाचं असणं पाप आहे हे स्वामी या नाटकातून रणजित देसाई यांनी स्पष्ट सिद्ध केलं आहे.

पण या सगळ्या युद्ध आणि राजकारणामुळे माधवराव आपल्याला कठोर वाटत असतील. पण रमाबाईंच्या प्रेमामुळे-प्रीतीमुळे त्यांच्या मनातील एका हलक्या कोपऱ्याचे दर्शन या नाटकात होते. या सगळ्या धामधुमीत त्यांनी संसाराकडे फारसं लक्ष दिलं नाही, याची त्यांना खंत होतीच. पण संसार करायच्या ऐन उम्मेदीच्या वयातच काळाने त्यांचा घास घेतला. त्यांच्या या दाहक जीवनात प्रेमाचा शिडकावा करून रमाबाईंने त्यांचे जीवन शीतल केले हे खरे. जिवंतपणी त्यांनी माधवरावांची साथ दिली, आणि माधवरावांच्या मृत्यूनंतर एकटे जीवन काढण्यापेक्षा आपल्या स्वामींसोबत त्या ही सती गेल्या. माधवराव आणि रमाबाई यांचे विलक्षण प्रेम या नाटकात लेखकाने मांडले आहे. रणझुंजार, मुत्सद्दी, प्रसंगी कठोर पण कोमल मनाच्या पेशव्याचा मृत्यू वाचकांच्या मनाला चटका लावून जातो, आणि मराठी दौलतीसाठी ही हानी कधीही भरून न निघणारी होती हे ही आपल्याला या नाटकातून कळते.

आणि हा चटका लागतो, तो रणजित देसाई यांच्या या अद्भुत लेखणामुळे. रणजित देसाई यांची “राधेय” ही कादंबरी तर प्रसिद्ध आहेच, पण “स्वामी” ही कादंबरी ही तितकीच प्रसिद्ध आहे. त्याच आधारावर त्यांनी “स्वामी” हे तीन अंकी नाटक लिहिले आहे. खरंतर हे नाटक वाचताना माझ्या डोळ्यासमोर केवळ शनिवारवाडा येत होता, आणि का येऊ नये? हर क्षणी दिल्ली दरवाजा, शनिवारवाड्याची तटबंदी डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही इतकं लेखकाने उत्तम नाटक लिहिलं आहे. एवढंच नव्हे तर “रमा-माधव” या मराठी सिनेमातील आणि “स्वामिनी” या मराठी मालिकेतील पात्रही डोळ्यासमोर येत होतीच! या नाटकातून आपल्याला पेशवाईतील जीवनाची कल्पनाही येते; जसे की दागिने, अलंकार, कर्मकांड, दान-धर्म, पेठा, इत्यादी. वाचक थेट पेशवाईच्या काळातच जाऊन पोहोचतो. रणजित देसाई यांनी या नाटकात दमदार पण सोप्पी आणि आकर्षित भाषा वापरली. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. रघुनाथरावांना माधवरावांनी शेवटच्या क्षणी जे खडे बोल सुनावले, तो संवाद आणि तो प्रसंग अगदी डोळ्यासमोरच उभा राहतो. त्यांनी वापरलेल्या भाषाशैलीमुळे संपूर्ण प्रसंगांना अस्सल इतिहासाची किनार लागलेली दिसते. कादंबरीचं रूपांतर तीन अंकी नाटकात करणं सोप्पं नाही, कारण त्यात हर एक प्रसंग अगदी खुबीने मांडायला लागतो. या नाटकात आपल्याला लेखकाची ही खुबी दिसते.

हे नाटक केवळ ८९ पानांचं आहे, जे की तीन अंकी आहे आणि यामध्ये अनेक प्रसंग आहेत. एक ऐतिहासिक लेखक म्हणून त्यांनी हे नाटक लिहून सामान्य माणसांना, समाजातील विविध घटकांना आपल्या दैदीप्यमन इतिहास जाणून घेण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळेच माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल, मुत्सद्देगिरीबद्दल, हुषारीबद्दल, वैभवाबद्दल, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल , त्यांच्या राजकारणाबद्दल जाणून घ्यायचं आहे, अशा प्रत्येकाने हे नाटक जरूर वाचावे!

धन्यवाद!

या पुस्तकाची लिंक खाली दिलेली असून, तुम्हाला जर ते विकत घ्यायचे असेल तर त्या लिंकवर क्लिक करा!

Leave a Comment