| पुस्तक | धन आकर्षित कसं कराल? | लेखक | डॉ. जोसेफ मर्फी |
| प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | ८० | मूल्यांकन | ४ / ५ |
पैसा ही प्रत्येकाच्या आयुष्यात अगदी महत्वाची असणारी गोष्ट आहे. पैशाने सुख विकत घेता येत नाही, पण सुखासाठी आवश्यक असणारी साधनं मात्र विकत घेता येतात. आपण पैशाला कितीही निर्जीव समजलं, तरी मनुष्याला सजीव ठेवण्याचं काम पैसाच करतो. अन्नधान्याच्या कणांपासून ते दवाखानाच्या खर्चापर्यंत प्रत्येक गोष्टी पैशात विकत घेता येतात. इतकंच काय तर अगदी मृत्यूपंथाला पोहोचल्यानंतर कराव्या लागणाऱ्या अंत्यविधीसाठीही पैसाच लागतो. काहीही असो, पण पैशाशिवाय जग चालतं हे आयुष्याचं एक महत्वाचं तत्वज्ञान आपणा सर्वांनाच अवगत असेल. पण या सगळ्यासाठी “पैसा” हा अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी आपल्या “हाव टू अट्रॅक्ट मनी” मध्ये पैशांचं अनन्यसाधारण महत्व सांगितलं आहे. त्यांचा धार्मिकतेवरचा प्रगल्भ अभ्यास, पैसा हा चांगला की वाईट याचं त्यांनी सोप्या भाषेतील विश्लेषण वाचकांना खिळवून ठेवतं.
परंतु प्रश्न असा आहे की पुस्तकाच्या नावात पैशाला आकर्षित कसं कराल हे तर दिलं आहे, कारण आपण पैसा तर कमावतो मग त्याला अजून आकर्षित कसं करायचं? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल आणि तो मला ही पडला होताच. पुस्तकाच्या पहिल्या चाप्टर मध्येच आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सापडतात. त्यांच्या मते, तुम्ही पृथ्वीवर केवळ समाजकार्य करायला आलेले नाही आहात, तुम्हाला पैसा ही कमवायचा आहे. श्रीमंत होणं, आयुष्यातील सुखं उपभोगणं हा तुमचा हक्क आहे. पैसा वाईट नसतो, केली तर चांगली कामं ही माणूस यातून करू शकतो. पैशाला माणसाने वाईट बनवलं आहे, ते त्याच्या चुकीच्या वापरामुळे. हे आपल्याला मान्य करावंच लागेल. पैसा एखाद्याची भूक मिटवूही शकतो किंवा एखाद्याचा पैशासाठी छळ ही करता येऊ शकतोच. पण पैशाचा वापर नेमका कसा करायचा हे सर्वस्वी माणसावरच अवलंबून असतं.
आता आपण जाणून घेऊयात की आपल्याला या पुस्तकातून काय शिकायला भेटतं ते:-
१) पैसा सर्वप्रथम विचारांतून येतो, मनातून येतो:-
डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी पैशाबद्दल एक वेगळंच तत्वज्ञान आपल्याला या पुस्तकातून सांगितलं आहे. त्यांच्यामते तुम्ही पैसा जरी तुम्ही बाहेरून कमवत असाल तरीही तुमचे विचार त्यासाठी कारणीभूत ठरतात. तुमच्या विचारांचा प्रभाव तुमच्या पैसा कमावण्याच्या शक्तीवर होतो. तुम्हाला पैसा कमवायचा आहे आणि जर तुम्ही सतत स्वतःला म्हणत असाल की “मी एवढे पैसे कमवायला अपात्र आहे” किंवा “मी एवढे पैसे कमवू शकेल का नाही?” असे विचार तुमच्या मनात सतत येत असतील तर तुमच्याभोवतीची परिस्थिति ही प्रतिकूल बनते. याउलट “मी एवढा पैसा नक्की कमवेल” किंवा “मी एवढा पैसा कमवायला पात्र आहे” असं आपण म्हणत राहिलो किंवा विचार करत राहिलो तर आपल्याभोवतीची परिस्थिति ही तेवढीच अनुकूल बनते. एकूणच लेखक आपल्याला हे सांगतात की तुमचे विचार, विचारपद्धती याचा प्रभाव तुमच्या आर्थिक परिस्थितीवर पडतो.
२) अवचेतन मनाची शक्ती ओळखा:-
लेखक हे विचार, आकर्षणाचे नियम इत्यादि गोष्टींवर विश्वास ठेवतात, आणि त्यांनी अशा गोष्टींवरच जास्त भर दिलेला दिसतो. ते म्हणतात की तुमचा मेंदू तुम्ही काम करत नसतानाही काही ना काही विचार करत असतो आणि त्याचा परिणाम ही तुमच्या पैसा कमवण्याच्या क्षमतेवर होतो. जर तुमच्या मेंदूत सतत नकारात्मक विचार भरलेले असतील की “मी एवढा पैसा नाही कमवू शकणार” तर तुमच्या आजूबाजूची परिस्थिति ही कळत नकळत तशीच बनते. लेखक म्हणतात की याऐवजी तुम्ही तुमच्या मेंदूला सतत सकारात्मक विचार करायला शिकवा, आणि तुमच्या अवचेतन मनाची शक्ती ओळखा.
३) अफरमेशनची ताकद
डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं बहुतांश लेखन हे अध्यात्माशी जोडलेलं दिसतं. त्यांच्यामते तुम्ही पैसा भौतिक जगात कमवण्याआधी तो मनाने आकर्षित करता. अशा वेळी अफरमेशन हे सर्वात जास्त उपयोगी असतात. जसे की “मी एवढा पैसा कमवायला लायक आहे” किंवा “माझ्याकडे पैसा सहज येईल” अशा पद्धतीचे अफरमेशन हे तुमच्यात सकारात्मक बदल घडवतात, जेणेकरून तुम्ही पैसा कमवण्यासाठी तितके तत्पर राहता, तेवढे कष्ट करता. या पुस्तकातून लेखक तुम्हाला अफरमेशनची ताकद काय आहे हे सांगतात.
४) व्हिज्युअलायझेशन ची ताकद
व्हिज्युअलायझेशन स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय तर आपल्याला जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याची कल्पना करणं. लेखकाच्या मते जर तुम्ही व्हिज्युअलायझेशन करत असाल, तर तुम्ही पैशाला आकर्षित करू शकता. कारण असं केल्याने आपलं वागणं, आपल्या कृती यामध्ये फरक पडतो आणि आपण आपल्या स्वप्नांच्या दिशेने पाऊले टाकतो. त्यामुळे जर तुम्हाला पैसा आकर्षित करायचा असेल तुम्ही व्हिज्युअलायझेशन ही पद्धत वापरू शकता असे लेखकाचे मत आहे.
५) पैसा वाईट नसतो, आणि पैसा कमावण्याची वृत्ती ही:-
लेखकाने आपल्याला या पुस्तकातून एक अत्यंत महत्वाचा संदेश दिलेला आहे, आणि तो म्हणजे पैसा हा आयुष्य जगण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही केवळ समाजकार्य करण्यासाठी जन्माला आलेले नाही आहात, तर पैसा कमवून श्रीमंत होणं हा तुमचा हक्क आहे. जास्त पैसा कमावणे याला आपल्या समाजात वाईट समजलं जातं, अशी मनीषा जी व्यक्ती करते तिला लोभी ही समजलं जातं. पण लेखक म्हणतात की पैसा हा अजिबात वाईट नाही याउलट तुम्ही तो कसा वापरता ते जास्त महत्वाचं आहे. लोक पैसा वाईट गोष्टीसाठी वापरत असतील, तर पैसा वाईट बनतो. आणि जर पैसा चांगल्या कामासाठी वापरला तर तो चांगला बनतो. पण पैसा ना तर चांगला असतो, ना तर वाईट असतो. पण माणूस पैसा कसा वापरतो, त्याचा हेतू यावरून पैसा नेमका कसा ते कळतो. याशिवाय पैसा कमावणे हे वाईट नाही, आणि ही वृत्ती ही वाईट नाही. अशा पद्धतीचे अनेक गैरसमज लेखकाने दूर केलेले आहेत.
पैसा हा आपल्या आयुष्यात किती महत्वाचा आहे हे आपल्याला लेखक पटवून देतात. आपलं मन कमकुवत नाही, उलट आपलं मन खूप शक्तिशाली आहे. आपलं शरीर जसं पैशासाठी काम करतं तसंच आपलं मन ही पैसा कमावण्यासाठी काम करतं. आपलं मन पैसा आकर्षित करतं. या पुस्तकाची भाषा थोडी अवघड आहे, त्यामुळे नवीन वाचकांना थोडं अवघड ही जाईल. पण तरीही पैसा म्हणजे नेमकं काय? हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक महत्वाचं आहे. डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी या पुस्तकात प्रामुख्याने “पैशाच्या गोष्टी” केल्या आहेत. पण त्याहूनही जास्त त्यांनी धार्मिकता, प्रार्थना व आपली विचार करण्याची पद्धत या इत्यादि घटकांच्या आधारे तुम्ही पैशाला कसं आकर्षित कराल हे सांगितलं आहे. या पुस्तकात तुम्हाला नवनवीन संकल्पना कळायला मदत होईल. ८० पानांचं हे पुस्तक तुम्हाला तुमचं भविष्य घडवायला मदत करेल.
तुम्ही जर हे पुस्तक वाचू इच्छिता आणि घ्यायचं असेल, तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकता.
धन्यवाद!