घर हरवलेली माणसं- व. पु. काळे l Ghar Harvleli Mansa- V. Pu. Kale l Marathi book review

पुस्तक घर हरवलेली माणसंलेखक व. पु. काळे
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या २०० मूल्यांकन ५ / ५

मला आजकाल माणसं वाचायची गोडी निर्माण झाली आहे, केवळ माणसंच नाही तर त्यांच्या आयुष्याबद्दल ही वाचायला आवडू लागलं आहे. कशी जगतात ना माणसं, प्रत्येकाचे रंग वेगळे, ढंग वेगळे, स्वभाव वेगळे आणि गुण वेगळे. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचे घर वेगळे आणि त्यांचे संसार वेगळे! “संसार” हा शब्द नावाप्रमाणेच अफाट, ज्यात सारं जग समावतं. संसार म्हणजे जगच. म्हणून कदाचित लग्न झाल्यावर दोन जीव, दोन शरीर, दोन मने एकमेकांचे विश्व बनत असतात म्हणूनच त्याला त्यांचा संसार म्हणत असतील. नव्हे का? खरं सांगू तर माझा संसार या विषयाबद्दल काही खास अभ्यास नाही, जो आहे तो केवळ एकाच व्यक्तीमुळे. आणि ती व्यक्ति म्हणजे व. पु. काळे.

व. पु, काळे ह्यांनी विविध विषयावर कादंबऱ्या, कथासंग्रह, ललित साहित्य लिहिलेलं आहे. व. पु. काळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे हे तर आपण जाणतोच. त्यांनी आपल्या लेखनातून विविध विषयावर प्रकाश टाकला आहे. आणि या कथासंग्रहात त्यांनी संसार या विषयावर प्रकाश टाकला आहे. आपण आधी कथासंग्रहाच्या नावा बद्दल थोडं बोलूयात.

ज्यावेळी मी हा कथा संग्रह विकत घेतला, त्यावेळी मी या कथासंग्रहाच्या नावा कडे आधी पहिलं, मी या आधी त्यांची पार्टनर ही कादंबरी वाचली असल्याकारणानेच हे पुस्तक घेण्याचा निर्णय घेतला. आधी वाटलं, की कदाचित कर्मचारी या कथासंग्रहाप्रमाणेच काही तरी असेल. पण ज्यावेळी वाचलं त्यावेळी कळलं की घर हरवलेली माणसं म्हणजे घराचा, कुटुंबाचा, जवळच्या व्यक्तींचा सहवास हरवलेली माणसं! आपल्यासाठी आपलं घर हेच आपलं जग असतं, त्यातील माणसं आणि आपले कुटुंब हेच आपले सर्वस्व असतात. तेच तर आपल्या हक्काचं ठिकाण असतं, आणि जेव्हा तेच हरवतं तेव्हा आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवणं किती कठीण असतं हेच या कथासंग्रहातून आपल्याला कळते.

खरं तर प्रत्येकाचा संसार हा वेगळा असतो, आणि वेगवेगळा असतो. आपल्या समाजात हा एक नियम नक्की ठरलेला आहे की आपला संसार हा सुखी असायलाच हवा, आणि तो नसेल तर तुमचं या जगात काही गत्यंतर नाही. कारण तुमचा जोडीदारच तुमचं सर्वस्व असतो, आणि अर्थात आपल्या साऱ्या इच्छा पूर्ण त्याने किंवा तिने कराव्या अशी आपली अपेक्षा असते. त्या व्यक्तीचा सहवास खूप गरजेचा असतो. मनासोबत शरीरांचं एक होणं ही तेवढंच गरजेचं. वाचायला थोडं अवघडल्यासारखं होईलही, पण हे त्रिकाळ सत्य आहे जे बदलणार नाही. पण या एकरूपतेसाठी हवा असणारा एकांतच नाही भेटला तर? आपलं मन जाणून घ्यायला, आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वतः आधी सर्व जगाचा विचार करायची वेळ आली तर? एकूणच मन मारून जगावं लागेल. सध्याच्या काळात आपण विभक्त कुटुंबात राहत आहोत, आणि हे सर्व आपल्याला जाणवणार नाही कदाचित. पण व. पुं. नी ज्या काळाबद्दल लिहिलं आहे, तो काळच असा होता की जिथे एकाच खोलीत दोन तीन कुटुंबे मावतील एवढी माणसं राहत. कारण मुंबई सारख्या शहराचं म्हणाल तर भाड्याने घेतलेलं घर परवडायला तर हवं ना! अशा वेळी त्या जोडप्याकडे दोनच मार्ग उरतात, एकतर वेगळं राहणं जे की परवडणारं नसतं, किंवा मग कुचंबणा सहन करणे. खरंच अशा परिस्थितीत संसार करणं किती कठीण आहे. पण मन सांभाळून, कुचंबणा होऊ न देता सुखी संसार कसा करायचा याचा मंत्र आपल्याला लेखकाने दिलेला आहे.

एवढं असूनही एकत्र कुटुंबात राहणं सोपं असतं का हो? आता इथे मला केवळ एकाच व्यक्तीची कुचंबणा होताना दिसते ती म्हणजे पुरुषाची! पुरुषाची सत्व परीक्षा ही आईची बाजू घ्यावी की बायकोची? या प्रश्नामूळे सुरू होते. कोणा एकीची बाजू घेतली तर एकजण दुखावणार हे नक्की. एकीने आयुष्य दिलं, एकीसोबत आयुष्य काढायचं असतं. पण यामुळे घरात होते ती सत्तास्पर्धा. कोण श्रेष्ठ आणि कोण नाही, यावरून होणारं घमासान युद्ध घराचं घरपण हिरावून घेतं. मान अपमानाच्या या स्पर्धेत नात्याचा गोडवा संपतो, मने करपतात आणि घर नावाचं तुमचं जग दोन भागात दुभंगून जातं.

कधी कधी आपली जवळची व्यक्ति आपल्याला सोडून जाते, तर कधी कधी आपणच दूर होतो. त्याच्या किंवा तिच्या प्रेमात पडताना पडलेली पहिली छाप मनात घर करते आणि वाटतं की हीचा सहवास आयुष्यभर लाभणे म्हणजे आपले नशीब थोर. पण हळूहळू त्यावरून ही पडदा उठतो, आणि तोच सहवास शिक्षेत बदलून जातो. दु:ख, विरह, राग, त्रास, वेदना या सगळ्या भावना एकाच वेळी दाटून येतात जेव्हा कुटुंब नात्यातील ओलावा विसरून एकमेकांशी हेवेदावे करतं. आपण आपलं घर, कुटुंब एकाचवेळी हरवून बसतो.

कुटुंब एकत्र असो वा विभक्त, प्रत्येकाच्याच नशिबी या व्यथा असतात. तीव्रता वेगळी असते, कारणे वेगळी असतात, परिस्थिति वेगळी असते. एक गोष्ट मात्र खरी आहे की या जगत अशी कित्येक घर हरवलेली माणसं तुम्हाला भेटतील कारण असं नसतं तर हे पुस्तक तुम्ही किंवा मी वाचण्याचे कष्ट घेतले नसते.

या कथासंग्रहातून खुपशा गोष्टी शिकायला भेटल्या जसे की कुटुंब संयुक्त असो वा विभक्त; तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षा-इच्छांचा आदर करता यायला हवा, त्यांच्यासोबत खुला संवाद असयलाच हवा. प्रत्येक नात्यात ज्याची त्याची स्पेस असते, तुमचा जोडीदार तुमचा असला तरीही त्याला त्याचं असं वेगळं आयुष्य असतंच, त्याचा ही आदर तुम्ही करायला हवा. एकमेकांची कुचंबणा होणार नाही, याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. जिथे शरीरसुख म्हणजे केवळ वासना असं कितीतरी लोकांचं मत असतं, तिथे लेखकाच्या मते ते एक साधन आहे एकरूप होण्याचं, ती नात्याची गरज आहे. आजकालच्या जगात नातं टिकणं हे अवघड होऊन बसलं आहे, आणि आपण एकमेकांशी हेवेदावे करून किती सहजपणे नातं तोडतो ना! इथे लेखकाने स्पष्टच सुचवलं आहे की हेवेदावे करण्यात अर्थ नाही, त्यापेक्षा बोला आणि भावना जाणून घ्या मग ते नातं कोणतंही असो. कारण कित्येक संसार, हे अशाच हट्टीपणामूळे तुटतात . ज्यामुळे आपल्याला केवळ मनस्तापच होतो.

शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण त्यासाठी पुस्तक वाचनेच गरजेचे आहे! आणि व. पु. केवळ लिहीत नाहीत तर तुमचुय हृदयाचा ठाव ते घेतात! असे हे घर हरवलेली माणसं हा कथासंग्रह तुम्ही नक्की वाचा.

धन्यवाद!

2 thoughts on “घर हरवलेली माणसं- व. पु. काळे l Ghar Harvleli Mansa- V. Pu. Kale l Marathi book review”

  1. मनाने हरलेल्या व्यक्तीने कधीही पुस्तकांच्या दुनियेत डोकावुन बघितलं तर व .पू .काळे यांसारखा लेखक माझ्या वैयक्तिक आयुष्यात तरी मी बघितलेला नाही , खूप मानसिक आधार दिला यांनी आणि मांडणी तर अशी असते प्रत्येक कहाणी आपली हुबेहुब जणू आपलीच मांडत आहे असं भासते . व .पू साठी माझ्या मनात एक वेगळाच न लिहिलेला न व्यक्त करण्यासारखा respect आहे , जणू आपला पार्टनर च समजावा असे …. 😍❤️

    Reply

Leave a Comment