बटाट्याची चाळ- पु. ल. देशपांडे l Batatyachi Chawl – P. L. Deshpande l Marathi Lalit Sahitya Review

पुस्तक बटाट्याची चाळ लेखिका पु. ल. देशपांडे
प्रकाशन मौज प्रकाशन गृह समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या १७१ मूल्यांकन ५ / ५

मला चाळीबद्दल काही माहीत नाही, तिथल्या माणसांबद्दल, तिथल्या राहणीमानाबद्दल ही काही माहीत नाही. चाळ ही वास्तुच आता दुर्मिळ झाली आहे. सिमेंटच्या जंगलात चाळ नावाची वास्तु भेटणार तरी कशी? बदल हा निसर्गाचा नियम आहे, आणि तो अटळ आहे. अकाली मृत्यू सोडला तर प्रत्येक तरुणाला म्हातारपण हे येणारच. कितीही वय कमी दिसावं म्हणून प्रयत्न केले तरीही वय व्हायचं ते होतंच. एकूण काय तर वय होणं आणि मृत्यू येणं हे अटळ आहे, बदल हा होणारचं! पण आश्चर्य आहे की हे सत्य माहीत असूनही ही आपल्यामधले किती जण याचा स्वीकार करतात ना? बदल कोणता ही असो, तो कितीही यातना देणारा असो शेवटी तो स्वीकार करणं हेच आपलं कर्तव्य असतं. आणि हीच शिकवण आपल्याला पु. ल. देशपांडे यांच्या बटाट्याची चाळ या ललित साहित्यातून भेटते.

मी पु. ल. यांच्या साहित्याच्या वाचनाची सुरुवात ही व्यक्ति आणि वल्ली पासून केली, ते अर्धवटच राहिलं आणि मग मागच्या वर्षी मी असा मी असामी वाचलं. तेव्हापासून ते आत्ता पर्यन्त पु. लं. च्या लेखनाला काहीच तोड नाही, हे तर कळलंच. पण पु. ल. हे विनोदी लेखनाचे सम्राट आहेत, तर ते का आहेत याची पुरेपूर जाणीव मला झाली. आणि म्हणूनच मी बटाट्याची चाळ हे पुस्तक वाचायचं ठरवलं. मी बटाट्याची चाळ या पुस्तकाबद्दल थोडं फार ऐकलं होतंच, त्यामुळेच ते वाचायची इच्छा झाली व आता त्याचे समीक्षण मी तुमच्या समोर सादर करत आहे.

तुम्ही जेव्हा पुस्तक हातात घेता त्यावेळी मुखपृष्ठ निरखून नक्की पहा! मुखपृष्ठावर तुम्हाला एक वडाचं झाड दिसेल, आणि त्यातच चाळीचे चित्र दिसेल. याचा अर्थ असा की चाळीत राहणारा प्रत्येक माणूस वेगवेगळ्या स्वभावाचा असतो, एकमेकांसोबत राहतो तरीही वेगळा अगदी पारंब्यासारखा. वडाचं झाड हे भरभक्कम असतं, मजबूत असतं, मुळांना घट्ट धरून डौलाने उभं असतं. अगदी तशीच आहे बटाट्याची चाळ. इथे तुम्हाला हर एक स्वभावाची माणसं भेटतील, मतभेद असणारी म्हणून भांडणारी आणि तरीही वेळप्रसंगी एकमेकांची साथ देणारी. आपली संस्कृति जपून ठेवणारी, संस्कारांच्या मुळांना घट्ट धरून डौलाने उभी राहिलेली बटाट्याची चाळ! हे एक ललित साहित्य आहे त्यामुळे यात एकूण जरी एकाच चाळीमधील १२ कथा असल्या, तरी त्या कथा नसून एकाच चाळीतील विविध प्रसंग आहेत जे एकमेकांना जोडून ठेवतात! प्रत्येक प्रसंग सुरू होण्याआधी, त्याच्या अध्ये मध्ये ही चित्राच्या माध्यमातून आता नेमकं तुम्हाला काय वाचायला मिळणार आहे याचा अंदाज ही तुम्हाला येतो.

तुम्हाला बटाट्याच्या चाळीत नेमकं काय वाचायला भेटेल? तर तुम्हाला यातून लुप्त झालेल्या किंवा दुर्मिळ झालेल्या चाळ संस्कृति बद्दल माहिती भेटेल. सध्या आपला समाज, आपला देश हा प्रगती करत आहे त्यामुळे अर्थातच बदल हे होणारच. हे बदल होत असताना आपल्या पिढीला जरी काही वाटत नसलं, तरीही आपल्या आजी आजोबांना हा बदल न झेपणारा असतो. कारण ते ज्या समाजात वाढले आणि सध्या ते कोणत्या समाजात जगतात यात खूप फरक आहे. आणि नेमकी हीच बदलाची गाथा, आणि अशा वयोवृद्ध लोकांना पूढील काळातील होणाऱ्या बदलाची नवलाई तसेच मनाला हलकेसे होणारे दुख: पु. लं. नी यात मांडले आहे. चाळ म्हणजे केवळ एक राहण्याचं ठिकाण नसतं, तर तो तिथल्या प्रत्येकासाठी आपला आपला स्वतंत्र देश आहे असं म्हणायला हरकत नाही. आता देश म्हणलं की त्याची त्याची संस्कृति जपणं ही आलेच. आणि ती संस्कृति जपण्यासाठी या चाळीत भरते एक सांस्कृतिक सभा. आणि इथूनच खरा हशा उठतो! यातील प्रत्येक व्यक्ति ही एका चढ एक आहे, त्यामुळे तुम्ही पुस्तक वाचत नसून तुम्ही हे घडणारे प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहात असेच वाटते. या चाळीत सांस्कृतिक चळवळी ही झाल्या, मतभेद ही झाले. आणि वेळप्रसंगी हीच लोकं एकत्र ही आली. यांचे ही वेगवेगळे गट होते आणि ज्यावेळी प्रश्न बाहेरील अडचणींचा असेल त्यावेळी आपले मतभेद विसरून हे सगळे एकत्र येतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्यावेळी गच्चीवरून भांडणं होतात त्यावेळी चाळीच्या मालकाकडे विनंती करायला मात्र सगळे एकत्र आले. यातली प्रत्येक व्यक्ति ही कोणा दुसऱ्याची कुरघोडी करते, कदाचित तोच यांचा छंद असावा! पण तरीही वेळप्रसंगी ते त्यांची एकता दाखवतात!

मला या पुस्तकातील सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे यात केलेले मुंबई शहराचे वर्णन होय. खरंतर मुंबई ही माया नगरी आहे. प्रत्येकाला स्वतःमध्ये सामावून घेते. अशा मुंबईमध्ये असणारी बटाट्याची चाळ हे एक वेगळंच अनोखं जग आहे. आणि त्या निमित्ताने आपल्याला या पुस्तकातून मुंबई या माया नगरीचं दर्शन होतं. त्यामुळेच का होईना पण ज्यांनी मुंबई पाहिली नाही, त्यांना मुंबई पाहण्याची उत्कट इच्छा होईल.

या पुस्तकाची वैशिष्ट्ये म्हणजे यात तुम्हाला लेखकाचा विनोदी दृष्टिकोण दिसेल. पु. लं. च्या लेखणाचं हेच मला सगळ्यात आवडणारे वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्ही पुस्तक वाचता, त्यात रमता, त्यात अगदी गुंतता ही, हरवून जात हसता! आणि मग हळूच एखादं असं वाक्य असतं जे तुमच्या काळजाचा ठाव घेत; अगदी असंच आहे पु. लं. चं लेखन. हसता हसता तुम्हाला तुमच्या आयुष्याचं मर्म समजेल. यासोबतच यातील प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय जिवंत आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही हे पुस्तक वाचताय, असं वाटतं की तुम्ही या चाळीचाच एक भाग आहात. म्हणजे यातील काही प्रसंग हे हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे आहेत, आणि असं वाटतं की या प्रसंगात खुद्द तुम्ही सहभागी आहात. यात लेखकाने राटाळवान्या भाषेचा वापर न करता भाषा ही संवादात्मक आहे, त्यामुळे यातील प्रत्येक व्यक्ती ही तुमच्या सोबत बोलत आहे असं वाटतं. यातील एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला ही चाळ आपलीशी वाटेल, परकी नाही कारण यात सामान्य माणसाच्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे, आणि हे सर्व वास्तवाशी मिळतंजुळतं आहे!

खरंतर विनोदी लेखन हे केवळ विनोदीच नसतं, तर त्या प्रत्येक विनोदामागे काही ना काही संदेश हा असतोच. या पुस्तकातला एक संदेश आहे जो मी समीक्षणाच्या सुरुवातीलाच सांगितला. बदल हा अनिवार्य आहे, तो स्वीकारावा लागतोच. तो नैसर्गिक आहे, त्याला आपण ही नाही रोखू शकत. त्यामुळे येणाऱ्या बदलाला स्वीकारून, आहे त्या परिस्थितीत समाधान मानून देवाला आभार मानुयात! जर तुम्ही असा मी असामी हे पुस्तक ही वाचलं असेल, तर बटाट्याची चाळ वाचताना तुम्हाला त्यातील पात्रांची ही आठवण येईल.

अशी ही बटाट्याची चाळ, तुम्हाला जगणं शिकवते, दुनियादारी शिकवते. हसता हसता तुम्हाला बदल स्वीकारायला शिकवते.आणि तुम्हाला ही जाणून घ्यायचं असेल की बटाट्याची चाळ एवढी खास का आहे तर खालील लिंक वर क्लिक करून आजच हे पुस्तक ऑर्डर करा.

धन्यवाद!

Leave a Comment