महाश्वेता- सुधा मूर्ती l Mahashweta-Sudha Murthy l Marathi Novel Review

पुस्तक महाश्वेतालेखिका सुधा मूर्ती
अनुवाद:- उमा कुलकर्णी
प्रकाशन मेहता पब्लिकेशन समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या १५८ मूल्यांकन ५ / ५

प्रत्येक स्त्रीने शिकायला हवं, स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, जेणेकरून उद्या समाज तिच्या विरोधात गेला तरीही ती डगमगणार नाही. लढेल व संघर्ष करेल पण स्वतःचा आत्मसन्मान कोणापुढेही झुकू देणार नाही. तुम्हाला वाटेल की पुस्तक समीक्षणाच्या सुरुवातीला हे असे खडे बोल कशाला? हे खडे बोल नाही तर सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या “महाश्वेता” या कादंबरीतून मिळणारी शिकवण आहे. सुधा मूर्ती या कंम्प्युटर इंजिनियर तर आहेतच, पण एक उत्तम लेखिका ही आहेत. त्यांची कादंबरी हे त्याचंच एक उदाहरण आहे.

महाश्वेता या कादंबरीत प्रमुख भूमिका ही कोणा पुरुषाची नसून स्त्रीची आहे. या कादंबरीची मुख्य नायिका आहे अनुपमा. ती अतिशय सुंदर तर आहेच पण हुशार व आत्मविश्वासू मुलगी आहे. तिचे वडील शाळा मास्तर आहेत, जे अतिशय साधे आहेत. त्यांची परिस्थिति ही तशी बेताचीच. त्यामुळे तिने तिचे शिक्षण हे स्कॉलरशीपच्या जोरावरच केले होते. तिचे वडील, सावत्र आई व बहीण हे गावाकडेच असत. अनुपमाला नाटकात काम करायला आवडे. पुढे तिचे लग्न डॉक्टर आनंद या एका श्रीमंत डॉक्टरशी ओळखीतून होते. उच्च शिक्षणासाठी आनंद परदेशी जातो. पण जन्मोजन्मी मी तुझी साथ सोडणार नाही असे वचन जाता जाता तो अनुपमाला देतो. ती ही त्याच्यासोबत जाणार होती, पण नवीन लग्न झाल्यामुळे वेळ लागणार होता. सगळं व्यवस्थित चालू असतं, पण अनुपमेच्या आयुष्याला कलाटणी दिली ती एका प्रसंगाने. जेव्हा तिला तिच्या पायावर पांढरा डाग दिसला. तिला “व्हायटिलीगो” हा त्वचेचा आजार झाला होता. पण तत्कालीन समाजाची समजूत अशी की कोड ज्या स्त्रीच्या शरीरावर येतं ती चरित्रहिन असते. नवरा डॉक्टर असून मूग गिळून गप्प राहिला, आई-बहीण सावत्र, सासर म्हणजे मोठं घर पोकळ वसा, वडिलांचा मृत्यू झालेला आणि अनुपमा एकटीच राहिली.

या एकटेपणात तिने अनंत यातना सोसल्या, समाजाकडून, स्वतःच्या कुटुंबाकडून, नवऱ्याच्या शांत राहण्याने कळत नकळत होणारा छळ तिने सहन केला. नंतर तिने एका शाळेत कला शिक्षिकेची नोकरी केली. त्यातच ती रमली. नंतर ही एका डॉक्टरने तिला लग्नासाठी मागणी घातली पण तरीही समाजाने ज्याप्रमाणे तिला लाथाडलं, त्यामुळे आलेल्या कटू अनुभवांमुळे तिने लग्नाला नकार दिला, व तिने स्वतःचा स्वाभिमान जपला. अनुपमेचं आयुष्य हे अनेक खाच खळगे- अडी अडचणींनी, दुखां:नी भरलेलं आहे. पण तरीही न डगमगता ती कशी स्वतःला सावरते हे प्रेरणा घेण्यासारखं आहे.

आता आपण जाणून घेऊयात या कादंबरीची वैशिष्ट्ये:-

१) समाजाचे वेगळे रूप दाखवणे:- आपला समाज हा दुटप्पी आहे, दुतोंडी आहे. त्याच्या नीती-अनीतीच्या व्याख्या या त्यांच्यानुसार बदलत जातात. महाश्वेता ही कादंबरी वाचताना मला ही गोष्ट प्रखरपणे जाणवली. म्हणजे आनंद हा स्वतः डॉक्टर होता, त्याला माहीत होतं की हा आजार होणं म्हणजे पाप नाही आणि हा त्वचेचा आजार आहे. तरीही अनुपमेला मात्र एकाकीच राहावं लागलं. अनुपमा स्वतंत्र झाली, तरीही तिला नवऱ्याने टाकलेली बाई म्हणून मिळालेली वागणूक आणि प्रसंगी तिच्याच मैत्रिणीच्या नवऱ्याने तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. हे किती भयानक आहे याची कल्पना तुम्हाला येऊ शकते. आणि ही परिस्थिति आजही लागू होते, की या समाजात एकट्या बाईला हे लोक सुखाने जगू देत नाही. सुधा मूर्ती यांनी समाजाचे हेच वेगळे रूप आपल्या कादंबरीत मांडले आहे.

२) स्त्री-स्वाभिमान केंद्रस्थानी:– ही कादंबरी एका स्त्रीची कहाणी आहे, जिच्या आयुष्यात केवळ संघर्ष आहे. ज्यावेळी आनंद अनुपमेला न्यायला परत येतो त्यावेळी ती त्याला नकार देते. आपल्यापैकी कितीतरी जणांना असं वाटेल की हिचा नवरा हिला पुन्हा नंदवायला नेतोय? मग हा नकार कशाला? तर त्यामागे एकच कारण होतं की तिचा स्वाभिमान दुखावला होता. कदाचित ज्यावेळी सासूने तिच्यावर आरोप लावले त्यावेळी परदेशात असूनही आनंदने तिची बाजू घेतली असती, तर ती त्याच्यासोबत जायला तयार ही झाली असती. पण अपार दु:ख, जन्मभराच्या यातना, आणि एकाकीपण देऊन मग पुन्हा कितीही पायघड्या घालून तिला तो न्यायला आला तरीही नकार हा निश्चित होता. बहुतांश स्त्रिया अशावेळी होकार देऊन स्वतःचा स्वाभिमान झुकावतात, पण सुधा मूर्ती यांच्या कादंबरीतील नायिका ही स्वाभिमानी होती. आणि यातूनच स्त्री-स्वाभिमान केंद्रस्थानी असल्याचं आपल्याला दिसून येतं.

३) समाजातील संकुचित विचारांवर प्रकाश:- अनुपमेला फक्त एक त्वचारोग झाला होता, जो अगदी सामान्य होता आणि तो उपचार केल्यावर बरा ही झाला असता, कोड वाढलं ही असतं तरीही त्याने केवळ तिच्या शरीरावर डाग राहिले असते. परंतु, हा विचार मात्र आजूबाजूच्या समाजाला पटलेला दिसत नाही. कोड फुटणं म्हणजे कोणतं तरी अगम्य पाप केल्यासारखी वागणूक तिला दिली गेली, तिची आई देखील पैशा पुरतं गोड बोले, सासू परंपरागत विचारांची म्हणून अशा सुनेला नांदवणं म्हणजे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागणं होय. परंतु तिची अपेक्षा ही सर्वात जास्त तिच्या नवऱ्याकडून होती जो की एक डॉक्टर होता आणि ज्याला हे सर्व माहीत होतं. आईची बाजू घ्यावी की बायको निष्पाप आहे हे तिला सांगावं? अशी त्याची द्विधा मनस्थिति त्याने करून घेतली. एकूणच, समाजाच्या संकुचित विचारांमुळे अनुपमेला मात्र यातना सहन कराव्या लागल्या. समाजाच्या याच संकुचित विचारांवर प्रकाश टाकण्याचं काम सुधा मूर्ती यांनी केलेलं आहे.

या कादंबरीचा शेवट हा अतिशय प्रेरणादायी आहे, ज्या माणसांमुळे अखंड यातना भेटल्या त्यांच्यासोबत जगण्यापेक्षा स्वाभिमानाने एकटे राहणे हे कधीही योग्यच ही शिकवण आपल्याला सुधा मूर्ती देतात. कितीतरी स्त्रिया स्वतःचा अभिमान जपत जगतात, आणि प्रत्येक स्त्रीने तो जपलाच पाहिजे हे ही आपल्याला या कादंबरीतून कळतं.

सुधा मूर्ती यांचं लेखन हे तुम्हाला समाजाचा एक वेगळा चेहरा दाखवतं, जो कदाचित कोणी दाखवला नसेल. त्यांच्या लेखणातला साधेपणा तुम्हाला खिळवून ठेवतो. ही कादंबरी अशी आहे की जी तुम्हाला पूर्ण वाचल्याशिवाय राहवणारच नाही. कादंबरीचे मुख्य पात्र पुरुष नसून स्त्री आहे, आणि कितीतरी स्त्रियांना ही कहाणी आपलीच आहे असं वाटेल. सुधा मूर्ती यांनी कोड फुटणे म्हणजे पाप नसून हा केवळ एक आजार आहे, असे ठासून यात सांगितलं आहे. स्वाभिमानी स्त्री ती असते, जिला निष्पाप असूनही भलत्याच किंवा आपल्याच लोकांमुळे यातना सहन कराव्या लागतात परंतु त्या यातना विसरून ती पुढे जाते; अगदी ती माणसं पुन्हा तिच्या आयुष्यात येऊ पाहत असली तरीही. या कादंबरीतून बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात, पण अजूनही समाजात स्त्रियांवर असे अत्याचार होतात, पण तरीही स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संदेश सुधा मूर्ती यांनी आपल्या या कादंबरीतून दिला आहे. आत्मसन्मान व स्वाभिमान जपून स्वावलंबी व्हा अशी शिकवण आपल्याला या कादंबरीतून मिळते.

तुम्हाला याबद्दल काय वाटतं? ते आम्हाला नक्की कळवा. तुम्ही जर अजून ही कादंबरी वाचली नसेल, तर खालील लिंकवर क्लिक करून ती तुम्ही विकत घेऊ शकता.

धन्यवाद!

Leave a Comment