| पुस्तक | छत्रपती शिवाजी महाराज- काळ आणि कर्तुत्व | लेखक | सर जदूनाथ सरकार अनुवाद:- मीना शंभू शेटे |
| प्रकाशन | मधुश्री पब्लिकेशन | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | ४८४ | मूल्यांकन | ५ / ५ |
छत्रपती शिवाजी महाराज! नाव वाचताच स्फुरण यावं आणि रोमारोमात स्फूर्ती यावी इतकं बळ या एका नावात आहे. ज्या नावात इतकं बळ आहे ती व्यक्ती किती बलशाली आहे हे आपल्याला माहितच आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस १६३० ते अगदी आजतागायत त्यांच्या शौऱ्याच्या, धैऱ्याच्या, मुत्सद्देगिरीच्या गाथा आपण ऐकत आलेलो आहोत. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्यदैवत आहे. आत्तापर्यंत किती राजे होऊन गेले, किती तरी युद्ध झाली तरीही त्यांचं नाव अजरामर आहे. इतिहासाचा आढावा घेतला तर प्राचीन इतिहासात सम्राट अशोक असो, चंद्रगुप्त मौर्य असो वा राजा हर्षवर्धन असो, मध्ययुगीन काळात अगदी राणासंग किंवा महाराणा प्रताप असो वा पृथ्वीराज चौहान. त्या त्या काळातील परिस्थितीनुसार त्यांनी त्यांचं राजकीय धोरण बनवलं व त्यांचं प्रशासन चालवलं. पण तरीही ज्यावेळीस परकीय सत्तेविरुद्धच्या कधीही न संपणाऱ्या गोष्टी आपण ऐकतो, अस्मानी सुलतानांना नेस्तनाबूत करायच्या शौर्याच्या गाथा आपण ऐकतो तेव्हा आपल्या ओठांवर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आपसुकच येतं. ते का येतं? तर त्यालाही अनेक कारणं आहेत, जी आपल्याला इतिहासकार सर जदूनाथ सरकार यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज- काळ आणि कर्तुत्व या ऐतिहासिक ग्रंथातून कळतात. त्यांच्या मुळ ग्रंथांचं नाव “छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स” असून हा एक इंग्रजी ऐतिहासिक ग्रंथ आहे, व याचं मराठी अनुवादन हे मीना- शेटे शंभू यांनी केलेलं आहे.
या पुस्तकात असं आहे तरी काय? की ज्यामुळे प्रत्येक इतिहासप्रेमीने हे पुस्तक वाचलं पाहिजे? तर त्याचं उत्तर आहे की लेखकाची भाषाशैली! कारण की बऱ्याच वेक ऐतिहासिक ग्रंथ लिहिताना जर इतिहासकार केवळ एकतर्फी मत मांडत असेल तर त्याचा परिणाम अर्थातच वाचकांच्या विचारशैलीवर पडतो. जदूनाथ सरकार हे एक इतिहासकार व मध्ययुगीन भारतीय इतिहासाचे उत्तम जाणकार असल्यामुळे त्यांच्या लेखनातून आपल्याला तटस्थतेची भूमिका जाणवते. ज्यामुळे खरा इतिहास काय ते कळतो.
या ऐतिहासिक ग्रंथात त्यांनी विविधतम मुद्यांवर चर्चा केलेली आहे. त्यामधला पहिला मुद्दा “भूमी आणि लोकं” हा मला विशेष आवडला. याचं कारण म्हणजे आपल्याला केवळ एवढंच माहीत असतं की शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केलं व अस्मानी सुलतानांच्या आक्रमणापासून, अन्याय- अत्याचारपासून या स्वराज्याला संरक्षण दिलं. पण त्यांनी केवळ महाराष्ट्राचीच भूमी का निवडली? शहाजीराजांकडे असणारी कर्नाटकच्या जहागिरीत स्वराज्य स्थापन न करता केवळ महाराष्ट्रच का? मराठी स्वराज्य म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्र व मराठा म्हणजे नेमकं काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला यात मिळतात. आणखी एक की शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन होण्यापूर्वी महाराष्ट्रात सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव इत्यादि घराण्यांच्या राजकारणाचा नेमका परिणाम या भूमीवर, व लोकांवर कसा झाला? व स्वराज्यासाठी हा इतिहासाचा कालक्रम कसा अनुकूल व प्रतिकूल ठरला हे ही आपणास कळते. अर्थातच, या गोष्टींची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांना होती, व त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच त्यांनी स्वराज्य स्थापन केले व त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक धोरणात आपल्याला दूरदृष्टि असलेली जाणवते, व हेच त्यांच्या स्वराज्याचे वैशिष्ट्य होय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांपेक्षा कित्तेक पटीने अनेक सरदारांकडे जहागिरी होती, पण केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले कारण जहागिरीतील सुखपेक्षा त्यांना राष्ट्रवाद किंबहुना मातृभूमीप्रति असलेलं प्रेम व समर्पण महत्वाचं होतं. गोरगरीब रयतेवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी विविध कार्यक्रम आखले, धोरणे राबवली, किल्ले जिंकले, सैन्य उभे केले, लोकांना एक केले व स्वराज्याचा पालनकर्ता म्हणून वैधानिकता सिद्ध करण्यासाठी त्यांनी राज्याभिषेक केला व म्हणून त्यांनी त्यांचं राज्य कसं चालवलं या सर्वाची माहिती आपल्याला या पुस्तकात मिळते. शिवाजी महाराजांचा जन्म ते मृत्यूपर्यंतची शक्य तेवढी सत्य माहिती आपल्याला या ग्रंथातून मिळते.
आपण थोडक्यात या पुस्तकाची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात:-
१) संशोधनात्मक लेखन:- इतिहासलेखन करणं म्हणजे गम्मत नाहीये, तर टी एक जबाबदारी आहे. सर जदूनाथ सरकार यांनी ही जबाबदारी अतिशय उत्तमरीत्या पार पाडलेली दिसते. त्यांनी या पुस्तकात देशी-विदेशी, मराठी आणि अमराठी अशा कितीतरी साधनांचा वापर करून, संशोधनात्मक आणि चिकित्सक वृत्तीने पुस्तक लिहिले आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला त्या संदर्भ साधनांची यादी ही दिलेली आहे, ज्यावरून हे पुस्तक शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे साधन ठरते.
२) इतर राजसत्तांची माहिती:- मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करताना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्याच धोरणांचा किंवा त्यांच्या विचारसरणीचा अभ्यास न करता इतरही राजसत्तांचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. महाराजांची धोरणे ही या राजसत्तांच्या अवतीभोवती फिरताना दिसतात, त्यामुळेच या पुस्तकात तुम्हाला आदिलशाही, निजामशाही, मुघल सत्ता अशा परकीय राजसत्तांची ही विस्तृत माहिती दिलेली आहे.
३) छत्रपती शिवाजी महाराजांवरील दोष दूर करण्याचा प्रयत्न:- छत्रपती शिवाजी महाराजांवर काही इतिहासकार किंवा पूर्वीचे वसाहतवादी लेखक होते यांनी लुटारू असण्याचा आरोप केला होता. पण सर जदूनाथ सरकार यांनी मात्र हा आरोप खोटा ठरवला आहे, लूट करणे किंवा स्वाऱ्या करणे हा तत्कालीन राज्यव्यवस्थेच्या धोरणाचाच एक भाग होता. या अनुषंगाने विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काहीही चुकीचे केले नाही, उलट परकीय सत्तांनी स्वराज्याचे जे नुकसान केले ते भरून काढण्यासाठी त्यांनी हा मार्ग अवलंबला जो परिस्थितीला धरूनच होता. त्यांनी त्यांच्या लेखनातून निपक्षपातीपणा व तटस्थता दाखवूनच हे दोष दूर केलेले आपल्याला दिसतात.
४) प्रशासन व्यवस्थेचे विस्तृत वर्णन:- सर जदूनाथ सरकार यांनी या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन कसे होते? त्यात कार्य करणारे मंत्री कोण होते? त्यांच्या राज्याभिषेकाचे महत्व, त्यांचे एकूणच धोरण कसे होते याचे विस्तृत वर्णन केलेले आहे. यासोबतच त्यांनी अष्टप्रधान मंडळ, न्यायव्यवस्था, लष्करी प्रशासन अशा महत्वाच्या मुदयांबद्दल लेखन केलं आहे. यातला मला सगळ्यात जास्त भाग आवडला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आरामार प्रशासन होय. या सर्वातूनच छत्रपतींची दूरदृष्टि आपल्याला दिसून येते.
५) भाषाशैली:- इतिहास हा विषय अनेकांना कंटाळवाणा वाटतो, त्याचं कारण त्याच्यात वापरली गेलेली भाषा होय. या पुस्तकाचं हे ही एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही एक संशोधक असाल किंवा एक सर्वसामान्य वाचक, या पुस्तकातील ओघवत्या आणि सोप्या भाषेमूळे हे पुस्तक वाचायला आणि समजायला ही तुम्हाला सोपे जाईल.
एक इतिहासकार म्हणून सर जदूनाथ सरकार यांनी विश्वसनीय भारतीय व परदेशी साधनांचा, कागदपत्रांचा, पत्रांचा, करारनामे, प्रवासवर्णने, इत्यादींचा अभ्यास केला आहे व त्यांचे संदर्भ ही यात जोडलेले आहेत. ज्यामुळे या ग्रंथाची विश्वसनीयता आणखीनच वाढली आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? त्यांच्या आयुष्याची माहिती ही कथा-कादंबऱ्यांतून वाचलेली आहे. पोवाड्यातून ऐकली आहे व चित्रपट, नाटक, मालिकांमधून पाहिली आहे. त्यातली सत्यता किती हे मी सांगू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना समजणं पूर्णपणे अवघड आहे, पण विश्वसनीय माहितीच्या आधारे ते सोपं होईल. त्यांची विचारपद्धती, राजकारणातील डावपेच, युद्धनीती, परकीय संबंध, स्त्रियांबद्दलची त्यांची भूमिका आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय धोरण तसेच अंतर्गत व्यवस्था, मुत्सद्देगिरी समजून घेण्यासाठी सर जदूनाथ सरकार यांचं छत्रपती शिवाजी महाराज- काळ आणि कर्तुत्व हे एक विश्वसनीय साधन आहे; जे प्रत्येक इतिहासप्रेमी आणि विद्यार्थ्या, इत्यादींनी वाचावेच असा माझा आग्रह आहे!
धन्यवाद!