| पुस्तक | फुटकं डोरलं | लेखक | भगवान कुलकर्णी |
| प्रकाशन | अनघा प्रकाशन | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | १२८ | मूल्यांकन | ४ / ५ |
भारताला स्वातंत्र्य मिळून आता ७८ वर्ष झाली. जग प्रगती करत आहे, अधूनकितेकडे जात आहे, तंत्रज्ञानाच्या युगात आपले स्थान निर्माण करत आहे. भारत देश ही याचाच प्रयत्न करत आहे, देश पुढे जायला पाहिजे तर राज्य महत्वाचं, राज्यासाठी शहर, शहरासाठी तालुका, आणि तालुक्यासाठी गाव! देशाला प्रगतिपथावर जायचं असेल तर या प्रत्येक घटकावर लक्ष द्यावं लागतं. आपल्या भारतात जसे विविध राज्य आहे तसेच महाराष्ट्राचेही विविध भाग असलेले आपल्याला दिसतात जसे की खांदेश, कोकण, देश, विदर्भ आणि मराठवाडा. आणि याच मराठवाड्याची कथा आणि त्यासोबत मांडलेली व्यथा ही भगवान कुलकर्णी यांनी आपल्या फुटकं डोरलं या कथा संग्रहात मांडली आहे. कथासंग्रहाबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण लेखकाबद्दल जाणून घेऊयात.
भगवान कुलकर्णी हे एक अभ्यासू लेखक, व समाजाचे निरीक्षण करणारे एक उत्तम निरीक्षक असल्याचे आपल्याला दिसून येते. पू. ल. देशपांडे म्हणतात “की पोटा पाण्यासाठी केलेला व्यवसाय तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला तुम्ही का जगायचं? हे सांगून जाईल” आणि हेच वाक्य किंवा हेच विचार लेखकाने प्रत्यक्षात आणलेले दिसतात. लेखक हे पेशाने शिक्षक आहेत, त्यामुळेच लिहिताना ही लेखकाची चिकित्सक वृत्ती आपल्याला जाणवते.
तर आता आपण जाणून घेऊयात फुटकं डोरलं या कथासंग्रहाबद्दल. या कथासंग्रहाचा मुख्य विषय आहे तो म्हणजे मराठवाड्याचे सामाजिक जीवन. म्हणतो की मराठवाडा हा इतरांपेक्षा मागासलेला का आहे किंवा तिथे प्रगती का नाही? तर त्याला जितके प्रशासन जबाबदार आहे तेवढेच त्या लोकांचे विचार जबाबदार आहे. लोकं याला जबाबदार नसून त्यांच्या वर ज्या विचारांचा पगडा आहे ते कारणीभूत आहे त्यामुळे इथे कोणचीही भावना मला दुखवायची नाही, असो! या कथासंग्रहात एकूण २३ छोट्या मोठ्या कथा आहेत. प्रत्येक कथा ही आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवते, नवीन बोध देते.
यामधल्या काही कथा ह्या हृदय हेलवणाऱ्या आहेत. जसे की “फुटकं डोरलं” नामक एक कथा यात आहे. याचा मुख्य विषय हा मुलीचे लग्न हा एक वैयक्तिक प्रश्न नसून तो सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, त्यामुळे मुलाच्या हातात हुंडा टेकवून मुलीला त्याच्या हवाली सोपवा. मग त्या मुलीचे नशीब आणि ती! इतका निर्घृण विचार हा स्वतःच्याच आई वडिलांचा असल्याने, बिजवर पुरुषाची बायको असलेली कोवळ्या वयाची शांता जेव्हा स्वतःचं आयुष्य संपवते त्यावेळी अखेर तिच्या वडिलांना आपल्या चुकीची जाणीव होते की का आपली मुलगी संसार करायला नाही बोलते आणि माघारी येते. समजा परिस्थिति उलट असती तर? दुसरी एक कथा आहे जी समाजातील जाती प्रथेवर उजेड पाडते ती म्हणजे “चंदी” ज्यामध्ये महार असेलला गेनू अमृत या गावकऱ्याचा विहिरीत उतरून जीव वाचवतो, गेनूने जरी मध्यपाण केले असले तरीही तो केवळ महार होता म्हणून त्याकडे कामपूरतेच लक्ष दिले, आणि नंतर तो जिवंत आहे की नाही याची कोणाला परवा नसल्याचे आपल्याला दिसते. यातून जातीवाद , अस्पृश्यता यासारख्या कुप्रथा या २१ व्या शतकात अजूनही रूढ आहेत. नक्कीच यामुळे काळीज हेलावेल याची शाश्वती आहे. “फारकत” ही एक अशी कथा आहे ज्यामध्ये केवळ आई वडिलांच्या स्वार्थी वृत्तीमुळे एका निष्पाप मुलाला पोरकेपण येऊन त्याच्या नशिबाला भोग येतात. जिथे लहान मुलाची सुटका नाही तिथे आपल्या सारख्यांची काय कथा?
आता तुम्ही असे समजू नका की यात केवळ दु:ख आणि संघर्षाच्याच कथा आहेत. परंतु यात अशाही काही कथा आहेत ज्या तुम्हाला उर्मी देतात, प्रेरणा देतात. उदाहरणार्थ “कुलबाची चाबी” ही अशी कथा आहे ज्यात उमाकांतला त्याच्या परिस्थितीमुळे वाईट मार्गावर जावं लागतं, चोरांचा साथीदार होऊन कुलपाच्या चाव्या तो बनवतो. पण आपली चूक लक्षात येताच तो हा मार्ग सोडून सरळमार्गी आयुष्य जगतो, आपल्या गावासाठी आणि आपल्या लोकांसाठी तो त्याचं आयुष्य समर्पित करतो ते ही आपली ओळख सांगू न देता. “झडगं” ही एक अशी कथा आहे ज्यात जनाच्या शिक्षणासाठी त्याची आई खस्ता खाते, प्रसंगी गावकऱ्यांनी केलेला चारित्र्यावरचा चिखलाचा मारा ही सहन करते, नवऱ्याकडून काही अपेक्षा न ठेवता मुलाला शिकवायचा ध्यास घेते आणि अखेर चांगले शिकून तो प्राण्यांचा डॉक्टर होतो व त्याला नोकरी मिळते. यातून आपल्याला आईचं महात्म्य कळतं. शेवटची कथा आहे ती म्हणजे “अंगार” की जी अंधश्रद्धेवर उजेड पाडते, की कसे अंगारे धुपारे आता लोकांच्या आयुष्याचा एक सर्वसाधारण भाग आहे. काही कथांमधून शेतकरी बांधवांचे हलकीचे जीवन, दुष्काळ, अशा गहन विषयाबद्दल ही लेखन केलेले आहे.
पण या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे शाळा आणि शिक्षण. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक असतात. ते शिकले तरच समाज प्रगती करेल. पण गावातील काही मंडळींना हा विचार पटत नाही, कारण त्यांना त्यांचे वर्चस्व कमी होण्याची भीती असते. पण या सर्वांना न जुमानता एक तरुण व तडपदार शिक्षक जेव्हा शिक्षणाचा वसा हाती घेतो तेव्हा त्याला कोणी रोखू शकणारं नसतं कारण त्याचा हेतु हा अतिशय शुद्ध असतो. अशाच तरुण व तडपदार शिक्षकाची कथा “आणि शाळा हसू लागली” मध्ये आहे. असा शिक्षक जो मुलांना जीव लावतो, त्यांच्यावर उत्तम संस्कार करतो, आणि त्यांना शाळेवर व शिक्षणावर प्रेम करायला शिकवतो; अशा शिक्षकाची बदली ही भल्याभल्यांना रडवते. (कदाचित ही खुद्द लेखकांच्या आयुष्यावर आधारित किंवा त्यांचीच कथा असावी असे मला जाणवते). ज्या शाळेत मुले येत नसत, शिकत नसत, शिक्षणाचा गंध जिथे नव्हता, अशा शाळेचं गोकुळ या शिक्षकाने केले. आणि शाळा हसू लागली! ही कथा मन अतिशय प्रफ्फूलित करते.
अशा अनेक कथा या कथासंग्रहात आहेत. शिक्षणाच्या अभावामुळे, जनजागृतीच्या कमतरतेमुळे, अंधश्रद्धा व कुप्रथा या साऱ्या गोष्टींमुळे हा समाज किती पोखरून निघाला आहे याचे वास्तववादी दर्शन आपल्याला होते. या कथासंग्रहाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लेखकांनी त्या त्या भागातील स्थानिक ग्रामीण भाषेचा वापर केला आहे. एक एक मैलावर भाषा बदलते, त्याप्रमाणेच मराठवड्याची भाषा ही मराठी असली तरीही सगळ्यात वेगळी आहे. आणि या भाषेचा गोडवा ही काही औरच आहे. पण यामुळेच हा कथासंग्रह हा वाचवा वाटतो, तिथली भाषा कशी आहे हे आपल्याला कळतं, भाषेतील नावीन्य आपल्याला कळतं त्यामुळेच वाचताना आपल्याला कंटाळा येत नाही. यासोबत बहुतांश कथा या तीन ते चार पाणी छोट्या आहेत, त्यामुळे वाचताना ही तुम्हाला कंटाळा येणार नाही. स्थानिक ग्रामीण भाषा जारी वापरली असली तरीही ती एकूणच सर्वांना समजेल-उमजेल इतकी साधी सोप्पी आहे.
त्यामुळे जर तुम्हाला मराठवाडा भागातील सामाजिक, सांस्कृतिक, स्थानिक व ग्रामीण, इत्यादि बद्दल जाणून घ्यायचं असेल तर हा कथासंग्रह तुम्ही नक्की वाचा!
खास टीप:- हा कथासंग्रह सध्या केवळ बूकगंगा या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इतर ठिकाणी उपलब्ध झाला तर त्याची लिंक पुरवली जाईल!
धन्यवाद!