पार्टनर- व. पू. काळे पुस्तक समीक्षण | Partner- V. Pu. Kale Marathi book review

पुस्तक पार्टनर लेखक व. पु. काळे
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या १६० मूल्यांकन ५ /५

व. पू काळे हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव. प्रत्येक नवोदित लेखक व वाचकांसाठी त्याचं लेखन ही एक अमूल्य देणगी आहे. त्यांचं पूर्ण नाव हे वसंत पुरुषोत्तम काळे आहे. २५ मार्च १९६२ ते २६ जून २००१ असा त्यांच्या जीवनाचा प्रवास. माणसाचं आयुष्य संपतं पण त्याचा आत्मा अमर असतो असं म्हणतात, तसंच व. पुं. च्या बाबतीत ही आपल्याला झालेलं दिसतं. आज भले ही ते आपल्यात नसतील परंतु त्यांच्या लेखनाने त्यांना अजरामर बनवलं आहे हे खरं! आणि याचंच एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे व. पू. काळे यांची पार्टनर ही कादंबरी होय. 

पार्टनर:- आयुष्याचा जोडीदार, ज्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं त्याच्या नावा व्यतिरिक्त त्याची किंवा तिची असणारी ओळख म्हणजे पार्टनर. पण पार्टनर म्हणजे केवळ आयुष्याचा जोडीदार का हो? ज्याच्यासोबत लग्नबंधनात अडकून, अपत्यांना जन्म देऊन वृद्धापकाळापर्यन्त साथ देऊन अखेर ज्या व्यक्तीचा आपण आधार बनून आपण जगतो ती व्यक्ती म्हणजे पार्टनर? खरं सांगायचं तर हो, ती व्यक्ती म्हणजे पार्टनर जीच्यासाठी आपण सर्वस्व त्याग करू शकतो. जिच्या सुखात असो वा नसो पण दुखा:त मात्र आपण कायम साथ देऊ शकतो. निस्वार्थी प्रेम म्हणजे पार्टनर. आपल्या समाजात ना पार्टनर म्हणजे केवळ “आयुष्याचा जोडीदार” अशी संकल्पना सर्वमान्य आहे. आणि याच संकल्पनेला हलकासा तडा देऊन पार्टनर म्हणजे नेमकं कोण? हे व. पू. काळे यांनी आपल्या पार्टनर कादंबरीत सांगितलं आहे.  

    एक जोडपं, त्यांची प्रेमकथा आणि पार्टनर. होय, पार्टनर! पार्टनर हा दूसरा तिसरा कोणी नसून कादंबरीतील नायकाचा मित्र आहे. एक असा मित्र ज्याच्या खांद्यावर हक्काने डोकं ठेवून हमसून हमसून रडता येतं, ज्याला आपल्या सुख दुखा:च्या साऱ्या व्यथा बिनदिक्कत सांगता येतात. अशा या पार्टनर बद्दल लेखकांनी आपल्याला सांगितलं आहे. यातलं माझं एक वाक्य अत्यंत आवडीचं आहे. ते म्हणजे 

“तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्याच नावाने. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं”   

या एका कडव्यातूनच लेखक आपल्याला आयुष्याचं मर्म सांगतात. आपली वेगळी ओळख निर्माण होते खरी. पण जग आपल्याला आपल्या देहाच्या नावानेच तर ओळखतं. आपली ओळख ही आपल्या नावानेच! 

एकूणच या कादंबरीचा केंद्रीय विषय हा आहे की आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती असणं आवश्यक आहे जिच्यावर आपण स्वतःपेक्षा ही जास्त विश्वास ठेवू शकतो. अशी व्यक्ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच की जिच्या सोबत नातं आहे पण बंधन नाही, विश्वास आहे संशय नाही, मन मोकळं करायला शब्दाची गरज नाही, आणि जिच्यासमोर आपल्याला जग शून्य वाटतं. यामुळेच व. पुं. चं लेखन हे आपल्याला जास्त जवळचं वाटतं, कारण ते तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडीत आहे किंवा संबंधित आहे. मी या कादंबरीत नक्की काय झालं किंवा काय घडतं हे सांगणार नाही कारण त्यातील कथा जाणून घेण्यासाठी कादंबरी वाचणंच न्याय्य ठरेल. 

लेखकाच्या लेखन शैली बद्दल ही इथे जाणून घेणं आवश्यक आहे. व. पू. काळे यांचं लेखन हे आलंकारिक असलं तरीही वाचायला सोप्पं आहे. सोप्या भाषेत आयुष्याचं मर्म सांगणे ही एक कला आहे जी त्यांना अवगत आहे, आणि म्हणूनच सोपी भाषा असूनही त्यांना लेखनाद्वारे जो संदेश द्यायचा आहे तो वाचकांबद्दल पोहोचतोच. लेखन रटाळवाणं नाहीये, त्यामुळे वाचन करताना वाचकाला वेळेचं भान राहणार नाही. त्यांचं लेखन हे वास्तवदर्शी आहे, ज्यामुळे कादंबरी जरी नवीन असली तरी पात्र ओळखीची वाटतात. 

या कादंबरीतून अनेक गोष्टी शिकायला मिळतात, जसे की: आपल्याच माणसांची माया न मिळाल्याने आणि त्यांच्या स्वार्थी वागणुकीमुळे होणारी मनाची कुचंबणा, आपल्याच लोकांना दुखवल्याने होणाऱ्या वेदना, आपल्या जोडीदाराचा सन्मान करावा की शारीरिक सुखाचा त्याग? आणि या साऱ्या दिव्यातून जाऊनही मनाला चटका लावून आपली प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाणे. माणसाच्या आयुष्यात सुख एकटं येत नाही तर त्यासोबत हजार दुख:ही येतात हे आपल्याला या कादंबरीतून समजतं. 

यासोबतच नात्यांमध्ये विश्वास हा अत्यंत गरजेचा असतो. जगात कोणतं ही नातं असो, मग तर मैत्रीचं असो वा नवरा बायकोचं, आई- मुलाचं असो वा प्रियकर-प्रेयसीचं विश्वास हा गरजेचाच असतो. त्या विश्वासाला तडा गेला की ते नातं पोकळ बनतं, त्या नात्यात जीव राहत नाही. ते नातं जर आपल्याला प्रिय असेल तर आपल्याला एकमेकांशी एकनिष्ठ रहावंच लागतं हे ही आपल्याला या कादंबरीतून समजतं. पण केवळ विश्वासच गरजेचा नसतो तर त्या नात्यासोबत, त्या व्यक्तीसोबत  प्रामाणिक असणं ही गरजेचं असतं. विश्वास आणि प्रामाणिकपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे दोन्हीही गरजेच्या आहेत. यातही एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे भावनिक ओलावा होय. माणूस हा एक भावना प्रधान प्राणी आहे आणि यामुळेच त्याचं प्रत्येक नातं हे भावनेच्या आधारावर जोडलं गेलं आहे, नात्यात भावना नसेल तर नातं शून्य बनून राहतं हे आपल्याला या कादंबरी मधून शिकायला मिळतं. 

पण या सगळ्यात आपल्या भावना, आपली मतं, आपले विचार समजून घेणारा पार्टनर आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे. कारण अशा पार्टनर शिवाय आयुष्य अपूर्ण आहे. मग तो कोणीही असो मित्र असो वा जोडीदार, किंबहुना तुम्ही स्वतः ही स्वतःचे पार्टनर बनू शकता. पण आपल्या आयुष्याला अर्थ देणारा, पूर्ण करणारा पार्टनर हा आयुष्यात हवाच! 

या कादंबरीची काही वैशिष्ट्ये ही आहेत जसे की तुम्ही तुमच्या नात्यांची तुलना या कादंबरीशी करू शकता. कारण ही कादंबरी आपल्याच आयुष्याची एक कथा आहे, ज्याच्याशी आपण आपला सहसंबंध सहज जोडू शकतो. कादंबरी समाजाला आरसा दाखवायचं काम करते, त्यामुळे आपण जे काही शिकलो तसे आपण वागायला ही पाहिजे. 

शेवटी मला हे बोलायला आवडेल की, आशेच्या मागे निराशा ही येतेच, पण आपला आशावाद ढळू न देता पुन्हा जगण्यासाठी उभारी देणारा पार्टनर हा प्रत्येकाच्या आयुष्यात हवाच. जिथून सुरुवात तिथून शेवट. या कादंबरीचाही आणि आपल्या आयुष्याचाही. 

१५० पानांची ही कादंबरी तुम्हाला आम्हाला आयुष्याचे मर्म अतिशय सहजतेने सांगते. 

धन्यवाद!  

Leave a Comment