रिच डॅड पूअर डॅड- रॉबर्ट टी. कियोसाकी l Rich Dad Poor Dad-Robert Kiyosaki l Marathi self help book review

पुस्तक रिच डॅड पूअर डॅडलेखक रॉबर्ट टी. कियोसाकी l अनुवाद: अभिजीत थिटे
प्रकाशन मंजुल पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या २०१ मूल्यांकन 4.५/५

पैसा ही एक अशी गोष्ट आहे की जितकं कमवू तितकं कमीच आहे. पैसा हा वाईट कधीच नसतो, तर पैशाच्या गैरवापरामुळे पैसा बदनाम झाला आहे हे आपण मान्य तर केलंच पाहिजे. परंतु एक गोष्ट खरी आहे की जर आयुष्य व्यवस्थित घालवायचं असेल, स्वतःच्या छोट्या मोठ्या सगळ्या गरजा पूर्ण करायच्या असतील पैसा हा अत्यंत महत्वाचा आहे. आता सध्याच्या जगात महागाई इतकी वाढली आहे की एकापेक्षा अनेक ठिकाणाहून पैसा कमावणे गरजेचे आहे. थोडक्यात तुम्ही नोकरी करत असाल तरीही जोड धंदा किंवा पार्ट टाइम इन्कम कमावणे गरजेचे आहे. सध्याच्या जगात केवळ एकाच उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहण्यापेक्षा एकापेक्षा अनेक उत्पन्नाचे साधन असणे गरजेचे आहे. याचा अर्थ तुम्ही पैशासाठी लोभी आहात का? तर अजिबात नाही. पैसा हा शिक्षण असो वा दवाखान्याचा खर्च असो, कंपड्यालत्त्यापासून ते अगदी चारचाकी वाहनापर्यंत, तसेच शेत-जमीन, घर, इत्यादिसाठी पैसा हा आवश्यक आहे. म्हणजेच काय तर जसं जगण्यासाठी श्वास गरजेचा आहे तसंच पैसा ही आवश्यक आहे. 

पैसा तर कमावता येतोच पण तोच वाढवणं आणि सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. पैसा वाढवायचा की नाही? तो कितपत कमवायचा? आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा कमवायचा की नाही? की हा पैशांचा लोभ आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला रिच डॅड पूअर डॅड या पुस्तकात मिळतात. यामध्ये लेखकांनी आपल्या दोन वडिलांबद्दल म्हणजेच रिच वडील व पुअर वडील यांच्या विचारसरणीबद्दल सांगितलं आहे. यातले रिच डॅड म्हणजे लेखकाच्या मित्राच्या वडिलांच्या विचारसरणीबद्दल तसेच पूअर डॅड म्हणजे त्यांच्या स्वतःच्या वडिलांच्या विचारसरणीबद्दल सांगितलं आहे.

इथे एक गोष्ट मला तुम्हाला सांगावी वाटते ती म्हणजे पैशाच्या किंवा आर्थिक परिस्थितीवरून एकाला श्रीमंत व दुसऱ्याला गरीब म्हटलेले नाही त्यामुळे पुस्तकाच्या नावाबद्दल गैरसमज करून घेऊ नये. मित्राच्या वडिलांचे आणि त्यांच्या स्वतःच्या वडिलांचे पैशानबद्दल काय विचार आहे यावरून पुस्तकाला हे नाव देण्यात आलेलं आहे. रिच डॅड हे एक व्यावसायिक असतात, व पूअर डॅड हे शिक्षक असतात. त्यामुळेच त्यांच्या विचारसरणीमध्ये फरक असावा. रिच डॅडच्या मते पैसे कमावताना प्रयोग करावे परंतु पूअर डॅडच्या मते पैशाच्या बाबतीत सुरक्षा ही अत्यंत आवश्यक आहे.

या पुस्तकात आपल्याला काही गोष्टी शिकायला भेटतात जसे की श्रीमंत व्हायचं असेल तर पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा.आपल्यापैकी जवळपास सगळेच लोक पैशासाठी काम करतात, त्यात चुकीचे काहीच नाही. पण एक गोष्ट आहे की पैशाला स्वतःसाठी काम कसं करायला लावायचं याकडे आपण जास्त लक्ष देत नाही. तर यासाठी तुम्ही एक करू शकता की पैशाच्याद्वारे पैसा कसा कमावता येईल याकडे लक्ष द्या जसे की गुंतवणूक करून किंवा व्यवसाय करून करून किंवा मालमत्तेद्वारे पैसे कमावणे. एवढंच नव्हे तर पैशाबद्दल आपले विचार हे फार संकुचित असतात कारण बालपणापासून पैशाच्या बाबतीत आपल्यावर संस्कारच तसे झालेले असतात. यामुळेच आर्थिकदृष्ट्या साक्षर होणं हे ही तितकंच गरजेचं आहे व महत्वाचं ही आहे. हे पुस्तक वाचून तुम्ही तुमच्या आर्थिक साक्षरतेला सुरुवात करू शकता.

लेखकाने इथे एक खूप महत्वाची सांगितली आहे जी प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे ती म्हणजे की केवळ अशाच गोष्टीवर पैसे खर्च करण्यावर भर द्या की ज्या तुम्हाला फायदा होऊ देतील किंवा पैशाचा अपव्यव करू नका. उदाहरणार्थ घर घेतलं की ते भाड्याने देणे, सोनं घेणे, इत्यादि  जेणेकरून तुम्ही घेतलेल्या वस्तूचा किंवा वास्तूचा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायदा होईल. केवळ आर्थिकच नाही तर अशा वस्तु घ्या की ज्याच्या आयुष्यात तुम्हाला एकूणच चांगला फायदा होईल व तुमचे पैसे वाया जाणार नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की यामुळे तुमच्या दैनंदिन गरजांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये.

आता आपण बोलूयात लेखकाच्या लेखन शैलीबद्दल:-  

आर्थिक ज्ञानाविषयीची पुस्तकं वाचताना बऱ्याच लोकांचा असा संभ्रम असतो की ते पुस्तक अवघड असेल, किचकट असेल. पण लेखकांनी याविषयीची व्याख्याच बदलली आहे. अगदी लहान मूलही हे पुस्तक सहज वाचेल इतक्या सोप्या व सहज भाषेत लिहिले आहे. आजच्या युगात आर्थिक ज्ञान असणे हे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे सोप्या भाषेत लिहिलेले हे पुस्तक वाचकांना नक्की आवडेल; यामुळे अवघड विषय ही सोपा वाटतो. पण आपण जर पुस्तकाच्या लेखनाच्या पद्धतीबद्दल बघितलं तर एक गोष्ट आपल्याला जाणवेल की लेखकाने “या गोष्टी करण्यासाठी या ५ गोष्टी करा” इत्यादि प्रकारचा वापर केलेला नाहीये. याउलट लेखकाने आपल्याला कथा सांगून त्याद्वारे गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये लेखकाने स्वतःच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल आपल्याला सांगितले आहे की त्यांना पैशा पासून पैसा निर्माण करायला काय गोष्टी कराव्या लागल्या. पण तुम्हाला एक गोष्ट आणखीन ही जाणवेल की त्यांनी थेट प्रौढत्वाच्या अनुभवांबद्दल न सांगता सुरुवात आपल्या बालपणापासून करतात. लेखकाने आपले दोन्ही वडील रिच डॅड पूअर डॅड यांच्यासोबत झालेला संवाद, त्यांच्या कडून ते काय शिकले या सगळ्या गोष्टींचं विवरण यामध्ये केलेलं आहे. रॉबर्ट कियोसाकी ही एक मोठी असामी आहे, आणि तिथवर पोहोचायला अथक परिश्रम करावे लागतात, त्यामुळे आर्थिक गोष्टींबाबत त्यांचे स्वतःचे काय अनुभव आहेत, या सगळ्याच गोष्टीबद्दल यात त्यांनी सांगितलं आहे. सेल्फ हेल्प पुस्तक निवडताना माझं असं म्हणणं असायचं की मला असंच पुस्तक हवं आहे ज्यात मला वाचण्यापेक्षा गोष्टी पाहत आहे किंवा कोणीतरी माझ्यासोबत संवाद करत आहे असा अनुभव यायला हवा. या पुस्तकाला निवडताना ही हीच गोष्ट माझ्या मनात होती. सुरुवातीला मला वाटलं होतं की हे पुस्तक अवघड असेल, मला काही कळेल का नाही पण आश्चर्य असं की या पुस्तकात लेखकाने जी संवादात्मक भाषा वापरली आहे त्यामुळे आपण हे पुस्तक वाचत आहोत असे वाटण्यापेक्षा आपला आणि लेखकाचा संवाद चालू आहे की काय असे वाटते. पैसा प्रत्येकजण कमावतो, पण तो कसा वापरावा आणि कुठे वापरावा याचे ज्ञान आपल्याला या पुस्तकातून मिळते त्यामुळे पैसा किंवा अर्थकारण याबाबतचे आपले विचार यामुळे बदलायला नक्कीच मदत होते.

हे पुस्तक तुम्हाला आर्थिक शिक्षण देतं, पण बरेच जण आर्थिक शिक्षण घ्यायला कचरतात कारण त्यांना असं वाटतं की आकडेवारी आणि गणिते यामुळे आर्थिक शिक्षण अजून अवघड बनेल. परंतु हे पुस्तक तुमचा हा भ्रम दूर करेल. नैतिक मूल्य शिकण्यासोबतच आर्थिक ज्ञान घेणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ तरुणांनी किंवा मोठ्या व्यक्ति यांनीन न वाचता लहान मुलांनाही तुम्ही हे पुस्तक वाचायला द्यावे!

धन्यवाद!

Leave a Comment