तीन हजार टाके- सुधा मूर्ती l Teen Hajar Take- Sudha Murthy l Marathi book review

पुस्तक तीन हजार टाके लेखक सुधा मूर्ती l अनुवाद: लीना सोहोनी
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या १५२ मूल्यांकन 4.५/५

प्रत्येक कथासंग्रह आपल्याला आयुष्य जगायला शिकवतो, आपण जगत असतो खरे पण जिवंत आहोत का नाही याचं एक फुस्सट उत्तर आपल्याला त्यातून मिळतं. आयुष्य सगळ्यांच्या वाट्याला येतं, पण प्रत्येकाचं नशीब सारखं नसतं कारण प्रत्येकाची जीवन जगायची पद्धत आणि तत्व वेगवेगळी असतात. होय, मी सुधा मूर्ती यांच्या तीन हजार टाके या कथासंग्रहाबद्दल आज बोलणार आहे ज्याने न तर केवळ मला आयुष्य काय आहे हे सांगितलं किंबहुना शेवटच्या श्वासपर्यंत आपण कसं जगलं पाहिके हे ही सांगितलं. सुधा मूर्ती यांचे तीन हजार टाके हे पुस्तक समाजातील विविध घरातील लोकांच्या आयुष्याचे वास्तव दाखवते. या पुस्तकाद्वारे आपल्याला मानवी मूल्य, जीवन, भावना इत्यादींचे संकलन केलेले दिसते. थोडक्यात, या कथासंग्रहात लेखिकेच्या व्यक्तिगत आयुष्यातील विविध प्रसंगांची, त्यांच्या अनुभवांची मांडणी अतिशय सोप्या भाषेत केलेली आहे.

या पुस्तकात तुम्हाला एकूण ११ कथा मिळतील, ज्याला तुम्ही निबंधही म्हणू शकता. या प्रत्येक कथेमध्ये किंवा निबंधामध्ये एक वेगळा अनुभव, तसेच प्रसंगांचे केलेले वेगळेच वर्णन तुम्हाला आढळेल. यातील काही कथांमध्ये समाजातील जाचक रूढी-परंपरा किंवा सामाजिक प्रश्नांवर हात घातलेला दिसेल. परंतु सर्वच कथा या अशा धीर-गंभीर नाही तर काही कथा या हलक्या फुलक्या आहेत, तसेच काही प्रवासकथा ही आहेत. याशिवाय प्रत्येक कथेत किंवा निबंधात लेखिकेने स्वतःच्या वैयक्तिक आठवणींवर किंवा अनुभवांचा आधार घेऊन लेखन केलेलं आहे. कथासंग्रह वाचताना वाचकाच्या मनात विविच भावना प्रकट होणे साहजिकच आहे. उदाहरणार्थ हास्य, गंभीर विचार, आयुष्यकडे पाहण्याची सहजता, आसवे आणणारे तसेच समाधान वाटू देणारे काही प्रसंग, इत्यादि. या भावना आपसूकच प्रकट होतात हेच लेखिकेचं वैशिष्ट्य आहे.

आता आपण बोलूयात या कथासंग्रहातील मुख्य कथांबद्दल. या पुस्तकात एकूण ११ कथा आहेत. सर्वच कथा यात मुख्य आहेत, पण मी यामध्ये मी तुम्हाला केवळ दोनच कथांबद्दल सांगणार आहे. जेणेकरून तुम्हाला हे पुस्तक वाचायचं की नाही ते कळेल.

पहिली कथा आहे “तीन हजार टाके.” पुस्तकाचे नाव व त्या नावाचीच कथा. सुधा मूर्ती यांनी ज्यावेळी “इन्फोसिस फाऊंडेशन” ची स्थापना केली, त्यावेळी त्यांचं ध्येय हे समाजातील विविध घटकांना, जे मूलभूत सुख- सुविधांपासून वंचित आहेत अशा वर्गांना मदत करणे हे होते. असाच एक वर्ग समाजात होता, तो म्हणजे “देवदासी” वर्ग. या शब्दाचा अर्थ नावातच दडलाय. म्हणजेच देवाची दासी किंवा देवाची सेवा करणारी स्त्री होय. आपल्या समाजात स्त्रियांना काही ठिकाणी देवी मानून पूजतात. पण काही ठिकाणी अजूनही समाजात स्त्रीला उपभोगाची वस्तु मानतात. एखाद्या लहान मुलीला किंवा स्त्रीला अस्वच्छतेमुळे किंवा काही कारणांमुळे केसांमध्ये जटा निर्माण होतात. तेव्हा ती जट कापण्याऐवजी त्या मुलीला किंवा स्त्रीला देवाची सेवा करण्यासाठी तिचे स्वतःचे आई वडीलच अर्पण करतात. समाजाचा काही वेळा त्यांच्यावर दबाव असतो, की जर त्यांनी अशा स्त्रीला किंवा मुलीला अर्पण केले नाही तर देवाचा किंवा देवीचा कोप होईल. अशा या गरीब निरागस मुलींचा किंवा स्त्रियांचा फायदा समाजातील पुरुष वर्गाकडून घेतला जाई. यामुळे त्यांचे आयुष्य दु:ख व दारिद्रय यामुळे भरले जाते. अशा वर्गाला समाजातून केवळ तिरस्कारच भेटत. अशा स्त्रियांना नवीन आयुष्य देण्याचे सुधा मूर्ती यांनी ठरवले व त्यासाठी त्यांनी शिक्षण या दुधारी तलवारीचा वापर करण्याचे ठरवले. अर्थात सुरुवातीला त्यांना विरोध झाला, त्या स्त्रिया त्यांच्याशी बोलत नसत, किंवा बोलण्याचे टाळत असत. याचे एकच कारण होते की त्यांना आलेले वाईट अनुभव. पण सुधा मूर्ती यांनी हार न मानता अथक प्रयत्न करून त्यांना सर्वप्रथम मूलभूत आरोग्याविषयी माहिती दिली. शिक्षणाचं महत्व पटवलं. त्यांना मदत करून देवदासी या कुप्रथेपासून दूर करून नवीन काम-व्यवसाय करायला मदत केली. त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देऊन शिष्यवृत्तीसाठीही मदत केली, व अशा प्रकारे या स्त्रियांची या कुप्रथेपासून सुटका करण्यात आली. या महिलांनी पुढे जाऊन स्वतःची एक बँक उभारली व त्याच कार्यक्रमात त्यांनी सुधा मूर्ती यांना एक हाताने शिवलेली रजई भेट दिली. ही शिवताना त्या प्रत्येक महिलेने त्याला शिवलं जिला सुधा मूर्ती यांनी मदत केली. एकूणच तीन हजार टाके असलेली ही रजई त्यांना भेट दिली व आपली कृतज्ञता व्यक्त केली.

दुसरी कथा म्हणजे “मुलांवरती मात” या कथेत त्यांनी आपल्या प्रारंभिक अभियांत्रिकी शिक्षणाचा अनुभव सांगितला आहे. लेखिकेने ज्या काळात हे शिक्षण घेतलं तो काळ असा होता की “मुलांनी अभियांत्रिकी व मुलींनी मेडिकलचं” शिक्षण घ्यावे असे विचार प्रत्येकाचेच होते. अगदी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचेही. त्यांच्या कुटुंबाचा त्यासाठी फारसा विरोध नसला, तरी काळजी मात्र होती. कारण संपूर्ण महाविद्यालयात एकही मुलगी नव्हती, केवळ मुलेच होती. सुरुवातीला त्यांना “पुरूषांचे वर्चस्व” असणाऱ्या या महाविद्यालयात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जसे की मुलींसाठी कोणतीही आरामाची खोली नसणे, मुलांनी काढलेल्या खोड्या, इत्यादि. परंतु या सगळ्या समस्यांमुळे न डगमगता त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले व त्या अव्वल आल्या. यामुळेच का होईना, मुलांच्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला. आज त्या जेव्हा जेव्हा महाविद्यालयात भेट देतात, तेव्हा तेव्हा त्यांना त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण येते. तिथल्या विद्यार्थिनी त्यांना भेटतात, त्यांच्या सोबत फोटो काढतात. ही त्यांच्या अढळ राहण्याचीच पावती आहे.

अशाच इतरही प्रकारच्या कथा कथासंग्रहात आहेत. प्रत्येक कथा ही मनाला भावणारी आहे, तुम्हाला काही न काही शिकवून जाते. लेखिकेच्या लेखनाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं राहिलं तर प्रत्येक कथा ही अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी लिहिल्या आहेत, ज्या वाचताना वाचकांना अजिबात कंटाळा येत नाही. लेखन हे वास्तवाला धरून आहे . प्रत्येक कथा ही स्वतःच्या अनुभवाच्या आधारे लिहिली आहे, त्यामुळेच त्यात माणुसकी व आपुलकीचा गंध जाणवतो. या कथांमधून त्यांनी मानवी जीवनासाठी त्यांनी मानवी जीवनासाठी उपयुक्त असणाऱ्या शिकवणी यासोबतच सकारात्मकतेचा संदेशही दिला आहे.

त्यामुळे त्या प्रत्येकानेच हा कथासंग्रह वाचावा, ज्यांना सुधा मूर्ती यांच्या अनुभवाच्या आधारे नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. धन्यवाद!

खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता.

Leave a Comment