आमच्या आयुष्यातील काही आठवणी- श्रीमती रमाबाई रानडे l Amchya Ayushyatil Kahi Athavani- Smt. Ramabai Ranade

पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखक श्रीमती रमाबाई रानडे
प्रकाशन वरदा प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या २७२ मूल्यांकन ५/५

१९ व्या शतकातील महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम आणि ब्रिटिश वसाहतीविरुद्ध स्वातंत्ऱ्यासाठीचे आंदोलने. याचाच परिणाम म्हणून काय की महाराष्ट्रात दोन विचार असलेल्या दोन वेगवेगळ्या गटांचा उदय झाला. पहिला जहालमतवादी आणि दूसरा मवाळमतवादी. जहालमतवाद देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो खरा, पण नवस्वातंत्र्य मिळालेल्या भारताला विकासासाठी सुसंघटित आणि सुशिक्षित समाजाची गरज आहे. समाजात अनेक जाचक रूढी आहेत त्यांना मूळापासून उखडले पाहिजे. असे मत होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे. हे त्यांचे केवळ मत नव्हते तर ही एक क्रांति होती. आणि त्यांच्याच क्रांतीची गाथा त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रमाबाई रानडे यांनी आपल्या पुस्तकात “आमच्या आयुष्यातील काही आठवणी” मध्ये लिहिलेली आहे.

मला अजूनही आठवत आहेत की २०१२ मध्ये उंच माझा झोका ही मालिका लागली की मन प्रसन्न व्हायचं. इतिहास हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळेच की काय ही मालिका ही जवळची वाटायची. इतिहासामध्ये समाजसुधारणेचा वसा अनेकांनी घेतला आणि त्यातीलच एक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि त्यांच्या मृत्यूनंतर श्रीमती रमाबाई रानडे यांनी समाजसुधारणेचा हा वारसा पुढे चालवला. यात आपण दोन गोष्टी जाणून घेणार आहोत, पहिली म्हणजे खुद्द लेखिका नक्की कोण आहेत? आणि त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकात नेमकं आहे तरी काय की प्रत्येकाने हे वाचायलंच हवं. चला तर जाणून घेऊयात.

श्रीमती रमाबाई रानडे यांचा जन्म सातारा येथील देवराष्ट्रात १८६२ मध्ये झाला. त्यांचे माहेरचे आडनाव कुरलेकर होते. त्यांचा जन्म अशा काळात झाला जिथे बाळविवाह ही सर्रास चालणारी प्रथा सर्वसामान्य आणि सर्वमान्य होती. यामध्ये त्यांचे स्वतःचे कुटुंब ही अपवाद नव्हते. त्यांचे वयाच्या अकराव्या वर्षी पुण्याचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याशी लग्न झाले, व त्या त्यांच्या द्वितीय पत्नी होत्या. (त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते)

रमाबाईंचे लग्न अकराव्या वर्षी झाले याचे आपल्याला आत्ता काही वाटत नाही, परंतु त्याकाळी या वयात लग्न होणे म्हणजे मुलीचा काही दोष असावा असे समजले जायचे. सुदैवाने न्यायमूर्ती यांच्यासाठी मात्र या गोष्टीला महत्व नसावे, असे एकूणच आपल्याला जाणवते. स्त्रीसमाज हा शिक्षणापासून वंचित होता, त्यांनी परंपरागत धर्माचे आचरण करावे असा अट्टहास असायचा. आणि यामुळेच स्त्री वर्गाला कायमच दुय्यम वागणूक दिली जायची. स्त्रियांना त्यांच्या मूलभूत सुखासाठी ही अनंत यातना सोसाव्या लागल्या, आणि अशा कित्येक ज्योती समाजाला प्रकाश देण्याआधीच विझल्या. पण तरीही अशा अनुकूल परिस्थितीत, परंपरा आणि रूढी जपणाऱ्या समाजात स्त्री शिक्षणाचा वसा घेणारे न्यायमूर्ती रानडे, आणि त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचा हा वारसा पुढे नेणाऱ्या रमाबाई यांच्या आठवणी या पुस्तकात त्यांनी दिलेल्या आहे.

पुस्तकाच्या प्रारंभीच आपल्याला प्रस्तावना वाचायला मिळते, जी सहसा सर्व पुस्तकात असतेच परंतु ही प्रस्तावना थोडी वेगळी आहे. याचं कारण म्हणजे लेखिकेने स्वतः इथवर पोहोचायला सहन केलेल्या यातना. त्यांचा जन्म हा ब्राह्मण कुटुंबामधला, आणि १९ व्या शतकात समाज हा सनातनी ब्राह्मण वर्गाच्या वर्चस्वाखाली होता त्यामुळे अप्रत्यक्ष त्यांच्यावर अनेक नैतिक बंधने होती. ती झुगारून, पतीच्या साथीने त्यांनी शिक्षण घेतले आणि त्याचेच फळ म्हणून आपल्याला हे पुस्तक वाचायला मिळते. त्यामुळेच ही प्रस्तावना सर्वसाधारण नाही, तर त्यांच्या स्वतःच्या यातना आणि कष्ट त्यामागे आहेत हे विसरता कामा नये. या संपूर्ण पुस्तकाचा आशय हा श्रीमती रमाबाई रानडे आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या सहजीवनातील अमूल्य आठवणी हा आहे.

पुस्तकाच्या प्रारंभीक भागात त्यांनी त्यांच्या सासरच्या एकूणच इतिहासाबद्दल सांगितले आहे, त्यानंतर त्यांनी आपल्या लग्नाच्या घटनांचे वर्णन केले आहे. यामुळे जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा जी वेगवेगळी नावे येतात, ती वाचताना आपला गोंधळ होत नाही. यासोबतच त्यांनी त्यांच्या बालपणाचे ही वर्णन केले आहे. जसं आपण आत्ताच जाणून घेतलं की रमाबाईंचे लग्न झाले त्यावेळी त्यांचे वय हे केवळ अकरा वर्षच होते, त्यामुळे ही त्यांच्या बालपणावर परिणाम झाला, कारण त्यावेळी मुलीचे लग्नासाठी वय की किमान ६ ते ७ वर्ष असावे. यावरून त्यांना लहानपणी ही झळा बसल्या असाव्यात. असो!

पण त्यांनी त्यांच्या लग्नाचे ही वर्णन केले आहे. खरंतर त्यांचं लग्न न्यायमूर्ती यांच्या सोबत झाले त्यावेळी त्यांच्या लग्नाला विरोध झाला. तो त्यांच्या कुटुंबाकडून नव्हे तर त्यांच्या सहकाऱ्यांकडून. याचे कारण म्हणजे महादेवराव हे नव विचाराचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले याचा अर्थ ते विदुर झाले, तरीही ते दुसरे लग्न करू शकतात. या न्यायाने एखाद्या स्त्रीला विधवा झाल्यावर तिचे आयुष्य पुन्हा सुरू करायचा अधिकार आहे, ती पुन्हा लग्न करू शकते असे त्यांचे विचार होते. यामुळे उदाहरण म्हणून त्यांनी विदुर असताना विधवेशी विवाह करावा, अशीच अपेक्षा केली गेली. पण याउलट त्यांनी एका अल्पवयीन कुमारिकेशी लग्न केले यामुळे त्यांना विरोध सहन करावा लागला. पिकतं तिथं विकत नाही, असं म्हणतात ते हेच. कारण विधवा विवाहाला त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. रमाबाईंने याचे यथायोग्य वर्णन केले आहे की जिथे लग्न हा सोहळा असतो, आनंदाचा क्षण असतो तिथे महादेवरावांची दोन्ही बाजूंनी कुचंबणा झाली. असे असले तरी वेळ घेऊन यातून सावरून त्यांनी रमाबाईंना सुविद्य, सुशिक्षित करण्याचा निर्णय घेतला.

न्यायमूर्ती यांनी जरी रमाबाईंना शिकवण्याचा ध्यास घेतला तरीही त्यांना विरोध हा सहन करावाच लागला. पण दोघा पती-पत्नींनी चिकाटीने हे व्रत पूर्ण केले. यामध्ये कुटुंबाची नाराजी, वेळप्रसंगी संघर्ष, मने न दुखावता व्रत पूर्ण करायचा अट्टहास या सर्व गोष्टीचे वर्णन यामध्ये त्यांनी केलेले आहे. पण त्यांचा प्रवास हा शिक्षणक्षेत्रापुरताच मर्यादित नाहीये. महादेवराव हे मवाळवादी विचाराचे होते, त्यामुळे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत देश हा विचाराने स्वतंत्र हवा, आणि असे झाले तरच या अथक प्रयत्नांना अर्थ प्राप्त होईल. त्यासाठी सामाजिक सुधारणा आवश्यक आहे, जसे की जातीवाद निर्मूलन, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन, बालविवाहाला विरोध, स्त्रीशिक्षण, इत्यादि. यासाठी त्यांनी जे जे अथक प्रयत्न केले, त्यासाठी त्यांना काय काय विरोध सहन करावा लागला, यासोबतच त्यांना स्वतःला ही वर्णभेद सहन करावा लागला, या सगळ्याचे वर्णन लेखिकेने केले आहे.

या पुस्तकात केवळ त्यांच्या वैयक्तिक आठवणीच नव्हे, तर त्यांनी या समाजासाठी काय काय केले हे ही आपल्याला जाणून घ्यायला मिळते. १००-१५० पूर्वीचा समाज आणि आत्ताचा समाज यातील जमीन आसमानाचा फरक आपल्याला जाणवतो. सरतेशेवटी न्यायमूर्ती यांचा मृत्यू हा आपल्याही जीवाला चटका लावतो. खरंच! कधी कधी वाटतं की काय होती ही माणसं! काळाच्या पुढचा विचार करणारी, सर्वसमावेशक विचार करणारी! अशी क्वचितच माणसं या जगात आहेत.

या पुस्तकाद्वारे आपल्याला हे कळतं की पती-पत्नीचे नाते हे शुद्ध व निर्मळ असते, थोडं तुझ थोडं माझं यात असतं. कोणताच स्वार्थ त्यात नसतो. आयुष्य हेच एक मुळात कठीण व्रत आहे, कोणतंही ही एक चाक आधीच निसटणार म्हणून थांबायचं नाही! आपण घेतलेला वसा हा पूर्ण करायचा! महादेवरावांच्या मृत्यूनंतर समाजसुधारणेचं हे व्रत रमाबाईंनी पूर्ण केलं.

तुम्हाला जर श्रीमती रमाबाई महादेव रानडे आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाबद्दल खरोखर जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. पुस्तकातील एक ओवी, जी डोळ्यात पाणी आणते ती लिहून या समीक्षणाचा समारोप आपण करुयात!

“कई तो दिवस देखेन मी डोळां l कल्याण मंगळामंगळाचे ll १ ll

आयुष्याच्या शेवटी पायांसवे भेटी l कळीवरे तूटी झाल्या त्वरे ll २ ll “

धन्यवाद!

Leave a Comment