ठिकरी-व. पु. काळे l Thikari- V. Pu. Kale l Marathi Book Review

पुस्तक ठिकरी लेखक व. पु. काळे
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या ८० मूल्यांकन ५/५

जन्म का झालाय? माहीत नाही! मृत्यू कधी येणार? माहीत नाही! मग आयुष्याचं ध्येय नेमकं काय? आता म्हणू नका की माहीत नाही. असं म्हणतात की ८४ लक्ष जीवयौनीच्या फेऱ्यातून अखेर मनुष्य जन्म झालाय, खरं खोटं काय ते माहीत नाही पण ज्या अर्थी मनुष्य जन्म मिळालाय त्यामागे नक्कीच काहीतरी असतो.

आपण ठिकऱ्या आहोत, कधी या घरात तर कधी त्या घरात पडणाऱ्या. आयुष्य स्थिर असतं कुठे माणसाचं? आपल्याला मालिका आणि चित्रपटांमधून मुख्य भूमिकेतील नायिका किती स्वच्छंदी व आनंदी आहे हे दाखवलं जातं. पण कुणी संघर्षाबद्दल बोलतंच नाही. आपल्या आयुष्यातील मुख्य भूमिका आपणच पार पाडतो, पण आपल्या आयुष्यात किती संघर्ष आणि किती यातना असतात याबद्दल बोलताना माणूस कचरतो. आपल्या सुख आयुष्यात येत असतं, पण त्याचा उपभोग घेतो न घेतोच की च दु:ख येतं. कधी संघर्ष तर कधी विश्रांती. ठिकरी जशी या घरातून त्या घरात पडते, तसंच आपल्या आयुष्याचं ही होतं.

आणि याची नेमकी जाणीव व. पु. काळेंच्या ठिकरी या कादंबरीला वाचल्याननंतर होते. आपल्या आयुष्यात स्थिरता कधीच नसते. सतत संघर्ष, सततच्या वेदना, त्यानंतर थोडसं सुख आणि काही क्षणाची विश्रांती. या भोवतीच आपलं आयुष्य फिरत असतं आणि हे आपल्याला व. पुं. नी सांगितलं आहे. या कादंबरतील मुख्य नायिका “सोना” हीचं आयुष्य ही असंच आहे. कधी सुख, कधी दु:ख, थोडी शांतता आणि मग अस्थिरता. संघर्षाच्या एका घरातून दुसऱ्या घरात पडणारी केवळ एक ठिकरी. हीचं आयुष्य स्थिर नाही, सुख वाट्याला येतं खरं पण त्यासोबत तिचं आयुष्य अमाप दु:खांनी भरून जातं. ही कादंबरी वाचताना तर नियतीचा राग तर येतोच, आणि हा ही प्रश्न पडतो की का एखाद्याच्या वाट्याला एवढं दु:ख येतं? का एखाद्याच्या वाट्याला एवढ्या वेदना याव्यात? त्या व्यक्तीला सुख उपभोगायचा थोडा ही हक्क नाही का? असे नानाविध प्रश्न आपल्याला ही कादंबरी वाचताना पडतात.

या कादंबरीतील नायिका सोना ही तिचं आयुष्य फारसं सावरताना दिसत नाही, कारण ती त्याच चौकटीत वैयक्तिक कारणासाठी अडकलेली दिसते. परंतु अशाच काही ठिकऱ्या आपली चौकट सोडून भलत्याच चौकटीत पडल्या आहेत, त्यांना सावरायचं काम सोना करते. सोनाला मग वाटतं की यांच्याप्रमाणे आपणही वाट चुकून चुकीच्या चौकीटीत तर नाही ना आलोय? का त्यांच्याप्रमाणे आपणही एक अशीच ठिकरी आहोत जी सुखाच्या चौकटीत जाण्याऐवजी संघर्षाला कवटाळते? अशा कितीतरी प्रश्नांनी तिच्या मनात तिच्या मनात काहूर केला तरी नवीन वेदनांपेक्षा आहे त्या वेदनेच्या चौकटीत जगण्यातच तिने धन्यता मानली. सोनाने भलेही स्वतःच्या आयुष्याला सावरण्याचा विचार केला तरी ही तिला तिचा भूतकाळ भविष्यकडे जाऊ देत नव्हता, व ती वर्तमानाचा स्वीकार करून आपलं आयुष्य व्यतीत करते. ८० पानांची ही छोटीशी कादंबरी वाट चूकलेल्यांना मार्गदर्शन करायचं काम करते.

या कादंबरीची किंवा लेखकाची वैशिष्ट्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात

या कादंबरीमध्ये तुम्हाला लेखकाची भावनात्मक शैली दिसून येते. या कादंबरीमधील नायिका सोना हीचं आयुष्य आजच्या भाषेत सांगायचं राहिलं तर खूप कॉम्पलीकेटेड आहे. म्हणजे दु:खातून जितकं बाहेर यायचा ती प्रयत्न करते, त्याच्या कैकपटीने ती त्यात ओढली जाते. त्यामुळे नवीन वेदना मिळण्यापेक्षा आहे त्यातच सुख तिने मानलेले दिसते. या सगळ्यामध्ये केवळ तिचीच नाही तर तिच्याशी संबंधित व्यक्ति किंवा जवळची माणसं यांची भावनिक गुंतागुंत झालेली आपल्याला दिसते. खरंतर यातून एकच जाणीव होते की आपण स्त्री असो वा पुरुष, आपली व्यथा ही सोनासारखीच आहे! आपण केवळ ठिकऱ्या आहोत, ज्या या चाकोरीबद्ध जीवनातच धन्यता मानून, स्वतःच्या सुखासाठी यत्किंचितही प्रयत्न करत नाही. ही भावनात्मक शैली असलेली कादंबरी वाचकांच्या हृदयात एक वेगळं स्थान बनवून जाते. पण मग केवळ भावनात्मक शैली असणं म्हणजेच कादंबरीला पूर्णत्व येतं का? तर अजिबात नाही! कादंबरी ही वाचण्याजोगी तेव्हा होते जेव्हा तिचा आणि वास्तविक जीवनाचा एकमेकांशी कणभर का होईना संबंध असेल. जसं मी या आधीच सांगितलं की आपण खरे तर आपल्या आयुष्यात “सोना” हे पात्र निभावत आहोत, चूक काय- बरोबर काय याचा विचार करण्यात आपण बराच वेळ घालवतो आणि शेवटी जैसे थे ही परिस्थिति येते. त्यामुळेच या कादंबरीचा मनुष्याच्या वास्तविक जीवनाशी अत्यंत जवळचा संबंध आहे, यामुळे ती पूर्णत्व प्राप्त करते. या आधी आपण “पार्टनर” या कादंबरीचा रिव्यू पहिला आहेच. त्यामुळे जर भाषाशैली बद्दल बोलायचं राहिलं तर अगदी नाव वाचकांना ही समजेल उमजेल अशा साध्या आणि बोलक्या भाषेत व. पुं. नी ही कादंबरी लिहिली आहे. सोनाच स्वतःची कथा यात स्वतः चित्राली या एका पात्राला सांगते, त्यामुळे सोना आपल्याशीच बोलते की काय असा भास ही निर्माण होतो. कादंबरी अर्थात आलंकारिक आहे, पण भाषा ही आलंकारिक नसून बोलकी आहे. उगाच अवघड शब्द वापरुन कादंबरीला कशाला नटवा? साधेपणात सौन्दर्य असतं! त्याप्रमाणेच ही कादंबरी आहे.

ही कादंबरी वाचताना मला सोना या पात्रा बद्दल असं वाटतं की “ती हुशार आहे, कर्तुत्ववान आहे, धोरणी आहे आणि धाडसीही, पण तरीही स्वतःच्या वैयक्तिक कारणांमुळे असो किंवा आलेल्या परिस्थितीमुळे ती अचानक लाचार बनते. किंवा परिस्थिति तिला लाचार बनवते.” पण यात एक गोष्ट मला खटकली की आहे त्या परिस्थितीत ती धन्यता मानते, स्वतःच्या सुखासाठी ती तिचा भूतकाळ सोडू शकत नाही, याउलट त्यातच ती तिचं सुख शोधून जीवनापुढे हात टेकते! सोनाने किमान प्रयत्न करायला हवा होता असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे! कदाचित व. पुं. ना त्यांच्या नायिकेच्या या कथानकातून हेच सांगायचं असेल की प्रत्येक जण अशी धडाडी नाही मारू शकत. असो!

ही कादंबरी एका बैठकीत संपणारी आहे. अगदी तुम्ही वाचनाची नुकतीच सुरुवात जरी केली असेल, तरीही तुम्ही ही कादंबरी वाचू शकता. ही कादंबरी वाचताना किंवा वाचल्यानंतर तुम्ही सोनाच्या जागी असता तर काय केलं असतं? याचा विचार नक्की करा. कारण व. पुं. चे प्रत्येक पुस्तक हे तुम्हाला विचार करायला भाग पाडतेच.

कादंबरी विकत घेण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून घेऊ शकता. धन्यवाद!

Leave a Comment