| पुस्तक | दादरायण | लेखक | सुनील भातंब्रेकर |
| प्रकाशन | संस्कृती प्रकाशन | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | ११२ | मूल्यांकन | ४ /५ |
“खूप काम केलं आज, मानसिक आणि शारीरिक थकवा ही आलाय. मला माझं कौतुक आहे, पण स्वतःचं कौतुक करून करू काय? जोवर जगाला माझ्या कामाची किंमत नाही, जो वर जग माझ्या कामाला आणि कष्टाला दाद मिळत नाही तोवर माझ्या एकूणच कष्टाला अर्थ राहणार नाही” असं आपणा सर्वांनाच वाटतं! म्हणजे जोवर दाद नाही तोवर त्याला अर्थच प्राप्त नाही असं सर्वमान्य आहे, म्हणजे अगदी घर असो वा ऑफिस सगळीकडेच ही गोष्ट लागू पडते. आणि याच गोष्टीची जाणीव मला झाली दादारायण या सुनील भातंब्रेकर यांच्या ललित साहित्यातून.
ललित साहित्य वाचायची ही माझी पाहिली वेळ होती, त्यामुळे ललित साहित्य म्हणजे काय आणि यात नक्की काय दडलंय? याचे कुतूहल मला होतेच. या ललित साहित्यात लेखकाने मनुष्य जीवनाचे, रोजचे घडणारे छोटे मोठे प्रसंग व अनुभव याचे विनोदी भाषेत आणि अत्यंत सुंदर असे रेखाटन केलेले आहे. याची एक खासियत म्हणजे याची प्रस्तावना ही मंगला गोडबोले या मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिद्ध लेखिका यांनी केलेली आहे, त्यामुळे तुम्ही हे ललित साहित्य का वाचवं? ते आपल्याला कळतं!
तर आता आपण पाहुयात की या ललित साहित्यात नेमकं काय आहे ते. सर्वप्रथम आपण पाहुयात ते या पुस्तकाच्या नावात नेमकं काय दडलं आहे ते. तर आपण रामायण किंवा पारायण हे शब्द ऐकले आहेत पण दादरायण हा शब्द माझ्यासारखे बहुतांश लोकं पहिल्यांदाच ऐकत असतील. तर हे पुस्तक वाचताना मला जेवढा समजला तेवढा याचा अर्थ आहे की एखाद्या गोष्टीचे किंवा व्यक्तीचे कौतुक करणे होय. दाद देणे आयुष्यात खूप गरजेचे असते मग ती व्यक्तीला असो वा निर्जीव वस्तूला. हे सर्व आपल्याला या पुस्तकाच्या पहिल्या लेखातच जाणवतं. यात एकूण १० लेख आहेत, जे वाचताना वाचकाला कधी हसू येईल तर कधी काही गोष्टी या विचार करायला भाग पाडतील. मला इथे लेखकाचं एक खास वैशिष्ट्य सांगायला आवडेल की या प्रत्येक लेखामध्ये तुम्हाला चित्र सापडतील, ही चित्र छापील नसून ती हाताने काढली आहेत, त्या त्या लेखाच्या संबंधित चित्र यात आहेत आणि ही सर्व चित्रे ही लेखकानेच काढली आहेत. यातून उपहास आणि हास्य यांचा एक मेळ निर्माण होतं, यामुळे वाचक याकडे आकर्षित होतात.
आपण थोडंसं पुस्तकात असलेल्या लेखांबद्दल किंवा निबंधाबद्दल बोलूयात. तर या प्रत्येक लेखांमध्ये लेखकाने गोष्टी अत्यंत साध्या भाषेत सांगितल्या आहेत, भाषा ही बोलकी आहे म्हणजे गोष्टी आपल्या भोवतीच घडत आहेत की काय असं आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. भाषा ही रटाळवाणी नसून बोलकी आहे, यातील पात्र आपल्याशीच संवाद करत आहे की काय असंच आपल्याला वाटतं. यामध्ये लेखकाने विविध प्रसंग, विविध गोष्टींचे वर्णन केलेले आहे पण याचीही एक खासियत आहे की हे सर्व त्यांनी विविध उपमा देऊन तसेच विनोदी छटा देऊन या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. जसे की, यामधील क्रमांक दोनचा एक लेख आहे “एक(मेवा) द्वितीय सुका मेवा” नावावरूनच कळले असेल की यात त्यांनी सुक्या मेवा या विषयाबद्दल लिहिलं आहे. काजू, बदाम, अक्रोड, इत्यादि बद्दल ते यात बोलतात. मनूक्याबद्दल त्यांचं मत पूढीलप्रमाणे आहे:-
“मनुका मला नेहमी आयुष्यभर “रांधा-वाढा-उष्टी-काढा” करत काबाडकष्ट करून, खंगून गेलेल्या, पण तरीही सर्वांवर मनापासून माया करणाऱ्या वृद्ध आजीसारखी वाटते. म्हणूनच की काय, बहुतेक आज्या नातवाच्या हातात मनुका ठेवत असाव्यात”
यात लेखक मनूक्याला वृद्ध आजीची उपमा देताना आपल्याला दिसतात, जे थोडं विनोदी ही आहे! अशा कितीतरी दैनंदिन जीवनातील गोष्टी लेखकाने उपमा देऊन, उदाहरणे देऊन सांगून आपल्याला आयुष्याचे तत्व हास्यात्मक स्वरूपात सांगितल्या आहेत. एकूणच त्यांच्या या ललित साहित्यातून आपल्याला मुख्य पाच गोष्टी कळतात. पाहिली गोष्ट म्हणजे यातून लेखक आपल्याला शहरी जीवनाचा आरसा दाखवतात, यातून आपल्याला एक गोष्ट कळते की शहरी जीवन सोईमूळे सुख तर पुरवतं तितकंच ते धकाधकीचं ही असतं; हे आत्ताच्या काळातील लिहलेलं साहित्य आहे म्हणून आपण यासोबत सहज स्वतःचा संबंध जोडू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे माणसाचा स्वभाव हा कधीच सारखा नसतो, दोन भावंडे एकाच पालकांची अपत्ये असतात पण तरीही त्यांचा स्वभाव हा वेगळा असतो. आणि या पुस्तकात ही याच गोष्टी सांगितल्या आहेत की माणसाचा स्वभाव स्थिर नसतो, एकसारखा नसतो आणि तो सतत बदलत असतो आणि याद्वारे आपल्याला मानवी स्वभावाचे पैलू समजतात. याशिवाय हास्य आणि उपहास, नात्यांमधील भावनिक ओलावा, आणि जीवनदृष्टी या गोष्टी ही आपल्याला कळते.
आता आपण बोलूयात या लेखकाच्या वैशिष्ट्याबद्दल. तुम्हाला या पुस्तकात अनेक नवीन म्हणी तसेच वाक्यप्रचार यात असलेले आढळतात, जसे की “दाम करी काम” यापासून बनवलेला वाक्यप्रचार “बदाम करी काम” यासोबतच भरिपणा दाखवणाऱ्या “द” पासून बनलेले शब्दांचा उल्लेख ही लेखकाने खास केलेले आहेत. याशिवाय हिंदीमधील कौतुक करतानाचे शब्द आपण मराठीत वापरले तर किती हशा उठेल हे ही लेखक आपल्याला सांगतात जसे की “मार डाला” ला च “मारून टाकलंत” असं आपण म्हणू शकतो. यातूनच आपल्याला लेखकाची विनोदी शैली किती छान आहे ते कळते. पण खरं सांगायचं तर प्रत्येक पुस्तक हे आपल्याला काही ना काही शिकवून जाते, काही पुस्तक तुम्हाला जीवन किती गूढ आहेत ते शिकवतात तर काही पुस्तकं तुम्हाला आयुष्य का आहे ते सांगतात. या पुस्तकातून मला खऱ्या अर्थाने जीवन कसं जगावं हे शिकवलं. म्हणजे पहा ना, आपल्या आयुष्यात असंख्य प्रकारचे ताणतणाव असतात, किती तरी गोष्टींमुळे आपण विचारात गुंतलेलो असतो. पण आपण या सगळ्यामुळे किती अरसिक होतो ना! आयुष्याची मजा घ्यायला विसारतोच जणू. या पुस्तकाद्वारे आपण छोट्या छोट्या गोष्टीतून एकही रुपया खर्च न करता जीवनाचा आनंद घेऊ शकतो ही गोष्ट शिकायला भेटते, आणि मला वाटतं की सध्याच्या यांत्रिकी जगत ही गोष्ट अत्यंत गरजेचे आहे. या पुस्तकाच्या भाषेबद्दल बोलायचं राहिलं तर भाषा अत्यंत हलकी फुलकी आहे, वापरायचे म्हणून जड शब्द नाही वापरले त्यामुळे अगदी नववाचक सुद्धा अत्यंत सहजपणे हे पुस्तक वाचू शकतो. ही भाषा प्रत्येकाला समजणारी, रुचणारी आणि पचणारी भाषा आहे. मुख्य गोष्ट म्हणजे हे पुस्तक वाचताना तुम्हाला कंटाळा येत नाही, याचं कारण की यातील सर्वच वर्णन तसेच मांडलेले प्रसंग हे आधुनिक काळातील म्हणजे आजच्या काळातील आहे त्यामुळे तुम्ही ओळखीच्याच पण थोड्या अनोळखी जगात प्रवेश करता. पुस्तक केवळ ११२ पानांचं आहे, त्यामुळे एक दोन बैठकीत ते तुम्ही नक्की संपवू शकता.
तर आता प्रश्न असा आहे की की मग हे पुस्तक वाचायचं कोणी? तर ज्याला कोणाला आधुनिकतेचा स्पर्श असलेले विनोदी, पण आयुष्याचे तत्व सांगणारे ललित साहित्य वाचायचं आहे त्यांनी दादरायण हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. हे पुस्तक सध्या बूकगंगा वर उपलब्ध आहे, त्याची लिंक मी खाली जोडली आहे. धन्यवाद!
अगदी खरं आहे.. विनोदातूनच नवीन शब्द वाक्प्रचार आणि नवीन दृष्टी लेखकाने दिली आहे त्यामुळे हे सगळेच लेख वाचनीय आहे हसता हसता किंवा मनातल्या मनात हसताना आपण अंतर्मुख होतो हे लेखकाचे वैशिष्ट्य आहे लेखकाला साध्या साध्या गोष्टी खूप सुंदर अर्थ दिसतात 1970 ते 2025 या अतिशय वेगाने बदलणाऱ्या संस्कृतीबद्दलही त्यांच्या लेखात विचार केला आहे.
होय, अगदी खरं बोललात! आणि हेच लेखकाचे वैशिष्ट्य आहे!
फार सुंदर पुस्तक आहे लेखक श्री सुनील यांचे मानवी मनाचे विलक्षण अवलोकन आहे. बारकाईने मनुष्य मनाचा अभ्यास आहे. फार मजा येते दादरायण वाचायला.
होय अगदी बरोबर आहे! लेखकाने मानवी मनाचा अचूक ठाव घेतला आहे!