| पुस्तक | दोस्त | लेखक | व. पु. काळे |
| प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | मराठी बूक कट्टा |
| पृष्ठसंख्या | १९२ | मूल्यांकन | ५/ ५ |
व. पु. काळे म्हणजे मराठी साहित्य विश्वातील गाजलेलं नाव. ज्यांनी कुणी मराठी साहित्य वाचनाचा प्रवास सुरू करताना व. पुं. चं एकही पुस्तक वाचलं नसेल तर ते नवलच म्हणावं लागेल. व. पु. काळेंचं व्यक्तिमत्व हे नववाचकाला व नवलेखकाला नक्कीच प्रेरित करतात. त्यांच्या दोन कादंबऱ्या जसे की ठिकरी आणि पार्टनर याचे समीक्षण आपण आधीच केले आहे. या दोन्ही कादंबऱ्यामध्ये आपण नात्यांच्या गुंतगुंतीमुळे आयुष्याला कसे वेगळे तथापि किचकट वळण भेटते हे लेखकाने आपल्याला सांगितले आहे. त्याप्रमाणेच दोस्त याचा शब्दश: अर्थ सांगणारा दोस्त हा कथासंग्रह नात्यांच्या जवळकीचे महत्व आपल्याला अतिशय मार्मिक शब्दांत सांगतात. यातून मला आत्तापर्यंत एक गोष्ट जाणवली की व. पुं. च्या पुस्तकाचं जे नाव असेल मग ते कादंबरीचं असो वा कथासंग्रहाचं, वैचारिक असो वा ललित असो, त्याच्या प्रत्येक कडव्यात आणि प्रत्येक वाक्यात त्या शब्दाचा अर्थ जाणवतो.
असाच व. पुं. चा आणखीन एक कथासंग्रह जयबद्दल आपण जाणून घरणार आहोत तो म्हणजे “दोस्त.” जशी आयुष्यात प्रत्येक नाती महत्वाची असतात, जसे की प्रियकर-प्रेयसी, पालक-मुलं, नवरा-बायको, गुरु-शिष्य, शेजारी-आप्त-हितचिंतक तसंच मैत्रीचं नातं ही तितकंच महत्वाचं असतं. मैत्रीमधल्या आणा-भाका, वचनं व गमतीने उडवलेली खिल्ली, सगळंच पवित्र असतं. अर्जुन-श्रीकृष्ण असो वा द्रौपदी-श्रीकृष्ण असो, शुद्ध मैत्रीची ही मूर्तिमंत कथा ज्यात त्यांनी नात्यांच्या सूक्ष्म पैलुंवर लेखन केलं आहे.
या कथासंग्रहात “दोस्त” या नावाप्रमाणे केवळ मैत्रीचीच भावना व्यक्त केली आहे का? तर नाही. मैत्री मर्यादित नसते, तो एक वेगळाच जिव्हाळ्याचा संबंध असतो. त्यात संवाद असतात, समज-गैरसमजही असतात, प्रसंगी वाद ही असतात. महत्वाचं म्हणजे मैत्रीत प्रेम ही असतंच! या सगळ्या भावना व. पुं. नी प्रत्येक कथेमधून व्यक्त केल्या आहेत. मैत्री जरी या कथासंग्रहाचा केंद्रीय विषय असला तरी प्रत्येक नातं किती वेगळं असतं, ते कसं उलगडतं हे आपल्याला या कथानकांतून कळतं.
या कथासंग्रहात विविध लघुकथा आहेत. ज्या वास्तवदर्शी, रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या आहेत त्यामुळे आपल्याला या कथांबद्दल आपुलकी तर वाटतेच पण या कथा वाचकांच्या थेट मनाशी जोडल्या जातात. याशिवाय लेखकांनी अतिशय क्लिष्ट किंवा किचकट भाषा न वापरता अतिशय साधी व बोलकी भाषा वापरली आहे. यामुळे होतं काय की त्या कथेतील व्यक्ती आपणच आहोत व आपण कोणाशीतरी किंवा कुणीतरी आपल्याशी बोलतंय असं वाटतं. जसं मी आधी सांगितलं की कथा या वास्तवदर्शी आहेत, त्यामुळे त्याचा सहसंबंध हा आपण आपल्या आयुष्याशी अगदी सहज जोडू शकतो.
आता आपण कथांचा आशय जाणून घेऊ. लेखकाच्या लेखनाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे या कथा वास्तवाशी घट्ट नातं जोडणाऱ्या आहेत. यातून आपल्याला आयुष्यातील तीन प्रकारच्या मैत्रीची किंवा दोस्तीची जाणीव करून देते. निरागस असणारी पाहिली बालपणीची मैत्री, या मैत्रीत कोणासाठी काही वैर भावना नसते, केवळ मैत्रीची शुद्ध भावना असते, कोणाविषयी ही किंतु परंतु नसतं. दुसरी मैत्री म्हणजे उम्मेदिच्या काळातील, स्वप्न पूर्ण करायला आकाशात उंच उडण्यासाठी पंख बळकट असतात करणारी अशीच तरुणपणातील मैत्री दुसरी मैत्री; या मैत्रीत असते ती गोड स्पर्धा, एकमेकांचा हात धरून पुढे जाण्याची धडपड, खकलो तर एकमेकांना सावरण्याची ताकत. तिसरी मैत्री म्हणजे संसारी माणसांची, जबाबदारी व करियर सांभाळणारा माणूस, अशा माणसाला आधार देणारी व खंबीर वाटणारी प्रौढत्वातील मैत्री. संसारातील सुख-दु:खाच्या वार्ता, एकमेकांजवळ जिथे मन मोकळं केल्याशिवाय राहवत नाही अशी मैत्री आपण आपल्या इतरत्र पाहतोच.
माझ्यामते वृद्धापकाळातील मैत्री ही अतिशय हळवी असते, कारण संपूर्ण आयुष्य तो एकाकी काळ असतो जिथे आपण काय गमावलं, काय मिळवलं याचा हिशोब आपण करतो. वेळ निघून जातो, नाती मागे सरतात आणि सोबत राहते ती केवळ मैत्री. अगदी नवरा-बायकोचं नातं असो, मैत्री ही अग्रगण्य ठिकाणी आहे. कथासंग्रहातील काही कथा गंभीर असल्या तरी काही कथा या सोप्या भाषेमूळे हलक्या-फुलक्या वाटतात. कथा वाचताना त्या परक्या वाटणारच नाहीत इतक्या त्या वास्तव आयुष्याशी समांतर आहेत.
हा कथासंग्रह वाचताना एक गोष्ट लक्षात राहते ती म्हणजे आयुष्यात किती ही नाती असली तरीही मैत्रीच माणसाला जिवंत ठेवते. नातं मग ते आई-वडिलांचं असो, नवरा-बायकोचं असो, किंवा सह-कर्मचारी यांचं असो, प्रत्येक नातं जिवंत राहतं आणि घट्ट राहतं मैत्रीमूळे. थोडक्यात, मैत्रीच माणसाचा श्वास बनून त्याला जिवंत ठेवते.
लेखकाच्या लेखनशैलीबद्दल बोलायचं राहिलं तर अर्थातच भाषा अतिशय सोपी आहे. क्लिष्ट, किचकट भाषा वापरुन लेखन अलंकारिक करण्याचा अट्टहास केला नसल्याने नववाचकास हा कथासंग्रह वाचताना अवघड वाटणार नाही. व. पुं. ची भाषाच त्यांच्या साहित्याला उच्च पातळीवर पोहोचवते. कथानकातील व्यक्ती तुम्हीच आहात असा भास निर्माण होणे वास्तवादर्शी लेखणामुळे साहजिकच आहे. मुख्य म्हणजे अतिअलंकारिक भाषा वापरुन त्यांनी कथेत कृत्रीमता न आणता प्रत्येक प्रसंग हा नैसर्गिक वाटावा अशा प्रकारे लिहिला आहे. कथा केवळ धीर-गंभीर किंवा निव्वळ विनोदी नाहीत तर दु:ख, आनंद, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, इत्यादि भावनांचा सुंदर मेळ प्रत्येक कथांमध्ये दिसतो.
कथेतील लोकं ही तुमच्या- आमच्यासारखीच सामान्य माणसं आहेत. कथांमधून भावनिक जवळीक निर्माण होऊन मैत्री किती महत्वाची आहे हे समजतं. कितीही गंभीर कथा असो, पण त्यातील विनोद विनोदी छटा ही या कथांना हलकंफुलकं बनवते. मानवी वर्तनातील परिवर्तनाची जाणीव ही आपल्याला होते.
या कथांमध्ये तुम्हाला विविध स्वभावाची माणसं भेटतील. काही हट्टी, काही हेक्ट, काही सुखी तर काही जिद्दी, परिस्थितीवर मात करणारी माणसं! बंड हा माणसाचा स्वभावधर्म तेव्हा बनतो, जेव्हा परिस्थिति त्याला झुकवते. पण अशी ही काही माणसं असतात जी परिस्थितीला ही शरण न जाता त्याचाही विरुद्ध बंड करणारी असतात. माणसाच्या नाजूक स्वभावाची बाजू जशी या कथासंग्रहात आहे तशीच चाकोरीबद्ध जीवनाला कंटाळणारी, आणि त्याचीच गुलामी झुगारण्यासाठी अशी माणसं बंड करतात अशा लोकांच्या कथा ही कथासंग्रहात आहे.
एकीकडे चेहऱ्यावर हसू तर दुसरीकडे डोळ्यात आसवे आणणारा, मैत्रीशिवाय आयुष्य किती पोकळ आहे याची जाणीव करून देणारा, व मित्र मैत्रिणींबद्दल प्रेम निर्माण करणारा हा कथासंग्रह प्रत्येकाने वाचायलाच हवा. हा कथासंग्रह वाचताना मला माझ्या आयुष्यातील अनेक जुन्या प्रसंगांची आठवण झाली, ती तुम्हाला ही होईल. हा कथासंग्रह तुमच्या आमच्या हृदयाच्या जवळचा बनतो, इतक्या मार्मिकतेने व. पुं. नी लेखन केलेलं आहे. त्यामुळे मैत्री म्हणजे गरजेपुरती एकमेकांना साथ देणं नाही, तर एकमेकांप्रती समर्पण भावना असते, हे ज्यांना जाणून घ्यायचं आहे त्यांनी हा कथासंग्रह नक्की वाचवा!
तुम्हाला याबद्दल काय वाटतं? ते कमेन्टमध्ये आम्हाला नक्की सांगा!