सखाराम बाइंडर – विजय तेंडुलकर l Sakharam Baindar – Vijay Tendulkar l Marathi Book review

पुस्तक सखाराम बाइंडरलेखक विजय तेंडुलकर
प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या ९१ मूल्यांकन ५/ ५

मराठी साहित्य म्हणजे केवळ कथा, कादंबऱ्या किंवा ललित साहित्य नाही; मराठी साहित्यातील आणखीन एक महत्वाचा प्रकार आणि मला असं वाटतं की याच्याशिवाय ना तर केवळ मराठी साहित्यक्षेत्र तर किंबहुना कलाक्षेत्र ही अधुरं किंवा अपुरं आहे. आणि तो साहित्य प्रकार म्हणजे “नाटक.” आणि आपण पहिल्यांदाच नाटक या साहित्याबद्दल आपल्या ब्लॉगवर बोलणार आहोत. शेक्सपियरचं हॅम्लेट असो वा कालीदासांचं अभिज्ञानशाकुंतलंम असो; प्राचीन, मध्ययुगीन काळात किंवा अगदी एकोणीस-विसाव्या शतकात ही नाटक हे मनोरंजनांचे साधन असे. नाटकाद्वारे ना तर केवळ मनोरंजन होते, तर समाजातील विविध घटकांचे वर्णन किंवा महितीद्वारे ज्ञान आपल्याला प्राप्त होते.

२० व्या शतकातील असेच तत्कालीन समाजाचे परखडपणे आणि तडफदार भाषेत वर्णन विजय तेंडुलकर यांनी आपल्या “सखाराम बाइंडर” या नाटकात केले आहे. या पुस्तकाबद्दल मला सर्वप्रथम माहिती मिळाली ती दिल दोस्ती दुनियादारी या मराठी मालिकेतून, याच्या एका प्रसंगातील एक पात्र हे पुस्तक वाचत असते, आणि विजय तेंडुलकर यांच्या या पुस्तकाबद्दल कौतुक करत असते. मग माझ्या मनात हे पुस्तक वाचायचा विचार आला आणि हे पुस्तक विकत घेतलं आणि म्हटलं की चला काहीतरी नवीन वाचायला मिळणार! आणि हे नाटक आहे ते त्यांनंतर कळलं.

खरंतर कथा- कादंबऱ्या वाचून माझ्याभोवती “जग किती सुंदर आहे, मोहक आहे, आणि दोन जीवांचं मिलन हेच परमसुख” अशा कल्पनेचा फुगा तयार झाला होता. आणि तोच फुगा फोडला या नाटकाने, या नाटकातील पात्रांनी. जसं मी आधीच सांगितलं की विजय तेंडुलकरांनी अगदी परखडपणे आणि तडफदार भाषेत समाजाचं एक विद्रूप स्वरूप समोर आणलं आहे. त्यामुळे या पुस्तकातून “साखर भाषेतील संवादाची अपेक्षा करू नये” अपेक्षाभंग होण्यापेक्षा हे मी आधीच नमूद करत आहे. या नाटकात तुम्हाला सर्व प्रसंग हे “सखाराम” “लक्ष्मी” आणि “चंपा” यातील पात्रांभोवती फिरते. याशिवाय “दाऊद” आणि “चंपाचा नवरा” ही दोन पात्र ही आहेत. पण चंपा, लक्ष्मी आणि सखाराम यांचा स्वतःचाच असा एक त्रिकोण आहे. एकाला दुसरं टोक, दुसऱ्याला तिसरं टोक, आणि तिसऱ्याचं टोक पहिल्याला जोडलेलं. एकमेकांशी जोडलेले असे तिघे. एकाचा विनाश हाच सर्वांचा नाश!

या तिघांच्या स्वभावाबद्दल आपण थोडं बोलूयात:-

सखाराम बाइंडर माझ्यामते खूपच वेगळे किंवा जे आत्ताच्या समाजात सहसा अस्वीकार्य असणाऱ्या स्वभावाचा पुरुष समाजाच्या नैतिक- अनैतिक गोष्टींच्या भानगडीत न पडणारा, कोणाचेही वर्चस्व न स्वीकारणारा, मनमर्जी व मनमानी आयुष्य जगणारा पुरुष आहे. या व्यक्तीला लग्न-जोडीदार यात काही स्वारस्य नाही असं दिसून येतं. पण, ही असामी अशा महिलांना आश्रय देते ज्या महिलांना त्यांच्या नवऱ्याने किंवा सासरच्यांनी हाकललं आहे. थोडक्यात, नवऱ्याने टाकून दिलेल्या बायकांना आश्रय देऊन त्याबदल्यात तो त्याच्या “शारीरिक, भावनिक तसेच घरगुती गरजा पूर्ण करून घेतो.” त्यामुळेच समाजासाठी नैतिक- अनैतिक जे असो ते असो पण त्याच्यासाठी या साऱ्याला महत्व नसतं.

लक्ष्मी ही अशीच एक स्त्री, जिला तिच्या नवऱ्याने टाकून दिलं. हिचा स्वभाव अत्यंत भित्रा, सहनशील दाखवला आहे. आणि याउलट “चंपाचं व्यक्तिमत्व” जिने नवऱ्याला टाकलेलं आहे. अत्यंत वेगळा आणि बंडखोर असा तिचा स्वभाव आहे. या दोन स्त्रियांच्यामध्ये अडकलेला “सखाराम” सरतेशेवटी कुणाचा होणार, कुणाचा नाही किंवा तो स्वतःचाच राहणार नाही. असे विचार वाचकांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.

आपण कथा- कादंबऱ्याचे समीक्षण करताना त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेतो, पण इथे आपण त्याची बलस्थाने जाणून घेऊयात. कारण हे केवळ लिखित स्वरूपात बंदिस्त नाही, तर प्रेक्षकांना तास- तासभर स्तब्ध करण्याची ताकद ही नाटकात असते. तर चला पाहुयात या नाटकाची बलस्थाने:-

१) समजातील विद्रूप रुपावर प्रकाश:- आपला समज हा अत्यंत दुटप्पी आहे. नीती- अनीतीच्या चौकटीत सर्वच अडकलेत, पण त्यांच्या व्याख्या या त्यांच्यानुसार बदलतात. अशीच सखारामच्या नैतिकतेची व्याख्या आहे, ज्यात स्त्री ही केवळ एक उपभोगाची वस्तु आहे. त्याच्यासाठी हीच त्याची नैतिकता. सखारामचं वागणं ही तसंच. त्याचा “संस्कार” “पाप-पुण्य” या गोष्टींवर विश्वास नसलेला दिसतो. आणि याच गोष्टींच्या अगदीच विरुद्ध तो वागलेला दिसतो. आणि तेंडुलकरांनी ही समाजातील दुटप्पीपणा दाखवून, त्याच्या विद्रूप रुपावर प्रकाश टाकला आहे. म्हणजे मला हे नाटक वाचताना असं वाटलं की कोणत्या भ्रामक कल्पना आपण मानत आहोत आणि का? म्हणजे लेखकाने ज्या काळात नाटक लिहिलं तो काळ खूप वेगळा होता, पण तरीही आजचा समाज आणि तेव्हाचा समाज यात मात्र काहीच अंतर नाहीये! जरी हे नाटक समाजातील विद्रूप रुपावर प्रकाश टाकत असेल, तरीही हा प्रश्न मात्र कायम ज्वलंत राहील की आपण जी नैतिक-अनैतिकतेची चौकट आखली आहे ती खरंच योग्य आहे का? की ती केवळ स्वार्थ म्हणून आपल्या सोयीनुसार आखली आहे.

२) स्त्री-पुरुषांची वैयक्तिक गरज आणि त्यातून झालेला विध्वंस:- या नाटकात लक्ष्मी ही भित्री, चंपा बंडखोर आणि सखाराम हा जुलमी आणि पुरुषी अहंकाराचा एक ज्वलंत पुतळा आहे. या तिघांचा स्वभाव परस्परविरोधी ही आहे. त्यामुळेच त्यांच्या वैयक्तिक गरजाही वेगळ्या आहेत. त्यामुळे झालेला संघर्ष आणि विश्वासातून झालेला विध्वंस याचं चित्रण लेखकाने या नाटकात केलेले आहे. माणसाचा स्वभाव त्याच्या विनाशाचं कारण आहे, हे यामुळेच सिद्ध होतं. लेखकाने या तिन्हीही पात्रांचं रेखाटन इतक्या उत्कृष्ट पद्धतीने केलं आहे की तुम्ही जेव्हा या नाटकाच्या शेवटाला पोहोचता तेव्हा काही प्रश्न मनात घोंगावतात. जसे की लक्ष्मीची चूक काय? तिने केलेलं प्रेम चुकीचं की सखारामचा पुरुषी अहंकार? त्याची वासना चुकीची की चंपाने केलेले बंड? म्हणजे नेमकी चूक कोणाची आणि योग्य कोण? हे तिघे एकमेकांमध्ये कळत नकळत इतके गुंतले आहेत की त्यातूनच त्यांचा सर्वस्वी विनाश झालेला दिसतो!

३) लेखकाची भाषाशैली:- तेंडुलकरांनी आपल्या नाटकात गोड-गुलाबी साखर भाषेचा वापर केलेला नाही. भाषा ही त्या त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार वापरली आहे. संवाद कितीही सरळ असले तरीही त्यातली तडफ आणि तिखटपणाच संवादाला आणखीन प्रभावी बनवतात. हे नाटक वाचताना कधी कधी वाटतं की मीच लक्ष्मी आहे किंवा मीच चंपा आहे, कधी कधी वाटतं की कदाचित मी सखाराम आहे. या आधी कथा कादंबऱ्या वाचल्या असल्या कारणाने, नाटक हा प्रकार माझ्यासाठी अत्यंत नवीन होता. यात लिहिलेले बारकावे, घराचे आणि व्यक्तींचे केलेले वर्णन हे तुमच्या डोळ्यासमोर उभे राहते.

या सगळ्यामुळे काय होतं की जो जो रंगमंचावर हे नाटक सादर करतो, त्याची व्यक्तिरेखा ही आपोआपच जिवंत वाटते. ती व्यक्ती काल्पनिक न वाटता, ती आपल्या समाजातीलच आहेत असं वाटतं. खरंतर सखारामचा हा तिखट स्वभाव काहींना आवडणार नाही, पण विजय तेंडुलकरांचा “सखाराम” हा असाच आहे. कारण त्याची उद्विग्नता, तिखट स्वभाव हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.

तर आता हे नाटक कुणी वाचावं? तर ज्याला कुणाला नाटक क्षेत्रात तथापि नाटक या साहित्यात रस आहे, त्याने हे नाटक नक्कीच वाचवं.

हे नाटक तीन अंकी आहे. अगदी ९१ पानांचं आहे. यापूर्वी १० मार्च १९७२ ला शिवाजी मंदिर, दादर येथे या नाटकाचा प्रयोग ही झाला होता. मुख्य पात्र “सखाराम” ची भूमिका निळू फुले यांनी बजावली आहे. यावरूनच या नाटकाची श्रेष्ठता कळते. त्यामुळे हे नाटक नक्की वाचा!

धन्यवाद!

Leave a Comment