फकिरा- आण्णाभाऊ साठे l Fakira- Annabhau Sathe l Marathi Novel Review

पुस्तक फकिरालेखक आण्णाभाऊ साठे
प्रकाशन सुरेश एजन्सी समीक्षण मराठी बूक कट्टा
पृष्ठसंख्या १७६ मूल्यांकन ५/ ५

नुकतीच फकिरा ही कादंबरी वाचली, आणि मनात विचार आला की खरंच आपला समाज हा गुलामीत आहे का? कोणाची तरी हाजी हुजुरी केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही का? स्वतःच्या आयुष्यासाठीच आपण अजूनही लाचारी तर पत्करलेली नाही ना? असे अनेक प्रश्न माझ्या मनात आले. हे प्रश्न पडले कारण आपल्या आजूबाजूला अजूनही विषमता आणि असमानता जिवंत आहेच, आणि त्याच्यावर पडदा टाकते आण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली फकिरा ही कादंबरी.

आण्णाभाऊ साठे यांना आपण लोकशाहीर आण्णाभाऊ साठे म्हणूनही ओळखतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचं अमूल्य योगदान तर आहेच, पण साहित्य क्षेत्रात ही आहे. “वारणेचा वाघ” “आवडी” अशी कित्येक साहित्य त्यांनी लिहिले त्यापैकीच त्यांनी “फकिरा” ही कादंबरी त्यांनी जन्माला घातली जी लोक प्रसिद्धीस पावली. त्यांचा जन्म हा मांग समाजात १ ऑगस्ट १९२० साली झाला. त्यांचा जन्म अशा काळात झाला जिथे जातीव्यवस्थेमुळे अनेक निरपराध लोकांना यातना भोगाव्या लागल्या. अर्थातच यात मांग समाज ही येतोच, पुढे आंबेडकरी चळवळीतून त्यांना अनेक गोष्टींचे अधिकार भेटले. पण तरीही या सर्व काळात या समाजाने यातना भोगल्या हे नाकारता येणार नाही. आण्णाभाऊ साठे यांनी ही परिस्थिति अत्यंत जवळून पाहिली, अनुभवली ही असेल आणि त्यामुळे त्यांच्या फकिरा या कादंबरीमध्ये मांग समाजाला ज्या अनंत यातना भोगाव्या लागल्या त्या वाचल्यानंतर काळीज पिळवटून निघतं हे मात्र खरं. अगदी १९ व्या शतकापासून समाजातील दु:ख हे लेखणीच्या माध्यमातून व्यक्त करायला सुरुवात झाली, त्यात आण्णाभाऊ साठे अपवाद नाही. ही कादंबरी अशाच शोषित-पीडितांचा आवाज संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवते, आणि समाजातील या भेदभावाचे वर्णन करून आपल्याला समाजाचा आरसा दाखवते.

तर आता आपण टप्प्याटप्प्याने या कादंबरी बद्दल जाणून घेऊयात.

फकिरची पार्श्वभूमी

फकिरा ही कादंबरी ही समाजातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मांग समाजावर आधारित कादंबरी आहे, ब्रिटिश राजसत्ता असताना उच्चजातीय लोकांना जिथे मानसन्मान मिळतो तिथे मांग समाजाला मात्र हीन वागणूक मिळते याचं दर्शन या कादंबरीत आपल्याला होतं. या कादंबरीमध्ये प्रामुख्याने मांग समाजाचे होणारे आर्थिक आणि सामाजिक शोषण, जातीव्यवस्थेमुळे होणारे अन्याय, आणि समाजातील होणारी दडपशाही हे प्रमुख विषय आहे. मुख्य म्हणजे ऐकीव कथांवर, किंवा अफवांवर ही कादंबरी लिहिली नाही तर आण्णाभाऊ साठे यांनी स्वतः ज्या यातना सोसल्या त्या ही आपल्याला ही कादंबरी वाचताना जाणवतात. फकिरा हे व्यक्तिमत्व प्रत्यक्ष अस्तित्वात होतं, पण तरीही फकिरा हा दूसरा तिसरा कोणी नसून लेखकच आहे असे वाटते! वास्तवाची किनार या कादंबरीला लाभली आहे त्यामुळे आपल्या मनातील भावना आपसूक छेडल्या जातात!

फकिरा:- मुख्य पात्र

बंड करण्याचा स्वभाव प्रत्येकजण जन्मतः आत्मसात करत नाही, त्याच्या आजूबाजूची परिस्थिति त्याला बंडखोर बनवते. फकिराने या कादंबरीत बंड केले, पण त्यामागे त्याची त्याची कारणं होती आणि ती योग्य होती. त्याने बंड केलं ते अन्यायाविरुद्ध, ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या धोरणामुळे, समाजातील मांग समाजाच्या छळामुळे, आणि पोटाची खळगी भरण्यासाठी केलेले हे बंड आपले डोळे उघडते. या कादंबरीत काही क्षणी फकिराचा मृत्यू होतो की काय असे ही प्रसंग आहेत, अशा वेळी आपलाच जीव वर खाली होतो. फकिरा या कादंबरीचं मुख्य पात्र तर आहेच, पण तो या कादंबरीचा आत्मा आहे. त्याचे बंड, साहस, उदार स्वभाव, बंडखोर वृत्ती आपल्याला ही समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. यामुळे एक जाणीव होते की आपल्या प्रत्येकामध्ये एक फकिरा आहे जो अन्यायाविरुद्ध लढायला सक्षम आहे. परंतु फकिरा हा केवक बंडखोर आहे असा गैरसमज इथे करू नका, कारण फकिरा बंडखोर झाला कारण त्याच्या भोवती परिस्थिति तशी होती, पण त्या व्यतिरिक्त तो प्रेमळ स्वभावाचा, प्रत्येकाला आपलंसं करून घेणारा आहे. फकिराचे व्यक्तिमत्व हे आण्णाभाऊ साठे यांनी अतिशय प्रभावीपणे रंगवले आहे.

तर आता आपण जाणून घेऊयात की या कादंबरीचा मुख्य आशय काय आहे आणि यात लेखकाने कोणत्या मुख्य मुद्यांवर चर्चा केलेली आहे ते.

खरं सांगायचं राहिलं तर मी ज्यावेळी ही कादंबरी घेतली तेव्हा ती केवळ फकिरा ही आण्णाभाऊ साठे यांची एक सुप्रसिद्ध कादंबरी आहे असं मनात ठेऊन घेतली होती. त्यात नेमकं काय आहे आणि काय नाही याचा विचार मी कधी केलाच नाही. आत्तापर्यंत मी जे साहित्य वाचलं त्यात केवळ गोड गुलाबी स्वप्न होती, प्रेम होतं, विरह होता पण विद्रोह कुठेच नव्हता. खरंतर कादंबरी म्हणजे केवळ प्रेमकथा हा एक भ्रामक गैरसमज आहे, आणि प्रेम म्हणजे केवळ प्रियकर प्रेयसी एवढंच नसतं. या कादंबरीमध्ये फकिराचं त्याच्या कुटुंबावर अमाप प्रेम आहे, पोटाची खळगी भरून तो सुखी आयुष्य जगलाही असता. पण त्याचं प्रेम जेवढं त्याच्या कुटुंबावर होतं तेवढंच त्याच्या समाजावर ही होतं. इथे मला फकिराने केलेला बंड आवडण्याचं कारण म्हणजे त्याने समाजातील विषमतेला प्रखर विरोध केलेला आपल्याला दिसतो. यालाही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे की समाजामध्ये केवळ सवर्ण जातींचा वरचष्मा असलेला दिसतो, यामुळे समाजामध्ये ज्या महार, मांग, मातंग यांच्यासारख्या जातींना अस्पृश्य समजून त्यांना हीन वागणूक दिली जायची. ही केवळ जातीय विषमता नव्हती तर ती आर्थिक विषमता ही होती. या विषमतेचं स्तोम ब्रिटिशकाळात मोठ्या प्रमाणावर माजलेलं दिसतं. उच्चवर्णीय लोकांकडून होणारी पिळवणूक आणि ब्रिटिश सत्तेकडून मिळणारी क्रूर वागणूक याचा शीण येऊन फकिराने केलेले बंड हे कोणाला नाही आवडले तर त्यात नवलच म्हणावे लागेल!

फकिराने याच जातीय व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले, ज्यामुळे केवळ तोच नाही तर त्याचा पूर्ण समाज सुखी राहील. ही कादंबरी केवळ फकिराची शौर्यगाथा सांगते तर असं नाहीये, तर या कादंबरीमध्ये त्याच्या कुटुंबाने केलेला त्याग आणि त्याच्या समाजाने त्याला दिलेली साथ याचीही गाथा आहे. त्यामुळे जरी फकिरा मुख्यपात्र असलं तरीही लेखकाने इतर पात्रांवर ही उजेड पाडला आहे. ही कादंबरी वाचताना आपण समाज म्हणून किती सुधारलो आहोत आणि आपण किती सुधारणा करायला हवी हा प्रश्न आपसूकच मनात येतो.

बरं, या कादंबरीमध्ये केवळ विद्रोह किंवा बंड आहे तर असं ही नाही. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या सर्व भावना यात तुम्हाला जाणवतात. कारण या भावनाच फकिराच्या बंडाचा आधार आहे असं मला वाटतं. एकूणच समाजातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार, मातंग, मांग या समाजाचा सवर्ण जातीयांनी केलेला छळ, आणि ब्रिटिशांनी केलेले अमाप अन्याय आणि यातून एकत्र होऊन या सर्वांनी तत्कालीन समजाविरुद्ध पुकारलेलं बंड अतिशय रोमांचकारी आहे. फकिरा केवळ एक साहसी तरुण नव्हता, तर तो एक स्वातंत्र्यसेनानी होता असं मला वाटतं.

आण्णाभाऊ साठे यांची ही कादंबरी दलित साहित्याचं एक उत्तम उदाहरण आहे. फकिराच्यामार्फत त्यांनी तत्कालीन समाजाचे जे वर्णन केले आहे त्यामुळे तुम्हाला ही तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होते. फकिरा हे एक माध्यम आहे, तो साहसी आहे, निडर आहे, सेनानी आहे जो आपल्यालालाही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. आण्णाभाऊ साठे यांनी अतिशय उत्तम शब्दात ही कादंबरी लिहिली आहे, भाषा ही सोपी आहे. मुख्य म्हणजे जरी गाव खेड्याचे वर्णन यात केले असले तरीही शहरी लोकांना ही ती भाषा कळेल इतकी साधी ग्रामीण भाषा यात वापरली आहे.

तुम्ही ही कादंबरी वाचली का? तुम्हाला फकिरबद्दल काय वाटतं? आणि आत्ताच्या काळात अशा फकिराची गरज आहे का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर ही कादंबरी अजून विकत घेतली नसेल तर खालील लिंकवर क्लिक करून नक्की विकत घ्या.

धन्यवाद!

Leave a Comment